( Image Source : ANI )
नागपूर : आम्ही राज्यात एक सक्षम आणि मजबूत धर्मांतरविरोधी कायदा आणणार आहे, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) दिले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवार, १६ डिसेंबर रोजी ते पहिल्यांदाच विधान भवनात दाखल झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "लव्ह जिहादसंदर्भात यापुढेही असेच काम सुरु राहणार असून धर्मांतर विरोधी कायदा आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेला आहे. भाजपने आजपर्यंत जाहीरनाम्यात दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. आम्ही राज्यात एक सक्षम आणि मजबूत धर्मांतरविरोधी कायदा आणणार, असा शब्द आम्ही जाहीरनाम्यात दिला असून योग्य पद्धतीने अभ्यास करून तो कायदा आम्ही आणू," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "मंत्री म्हणून पहिल्यांदाच विधिमंडळात पाऊल टाकले आहे. माझ्या पक्षाचे नेतृत्व, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्यासारख्या तरूण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. महाराष्ट्र, कोकण, हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करीन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन," असेही ते म्हणाले.
राणे साहेब आमच्या शाळेचे प्रिंसिपल!
"पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर नारायण राणे साहेबांनी नियम आणि अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ते आमच्या शाळेचे प्रिंसिपल आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून नियमांची फार मोठी यादी आलेली आहे. असंख्य विषयांवर आज सकाळपासूनच चर्चा सुरु झाली असून टप्प्याटप्प्याने माझ्या कामात त्याचे प्रतिबिंब दिसेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सगळ्या गोष्टींवर आमचे बारकाईने लक्ष!
"मंत्री झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छा येत आहेत. पण संजय राऊत आणि त्यांच्या मालकांचे मन एवढे मोठे नाही. महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा द्याव्यात, एवढ्या मोठ्या मनाचे ते नाहीत. त्यामुळे अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोत. त्यांनी फक्त यापुढे महाराष्ट्रात नीट वागावे आणि व्यवस्थित तोंड उघडावे. सगळ्या गोष्टींवर आमचे फार बारकाईने लक्ष आहे. आमचे सरकार आहे. त्यामुळे सरकारमध्ये असताना महाराष्ट्राकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत," असे ते म्हणाले.
विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल बोलताना ते म्हणाले की, "विरोधकांनी हेच आंदोलन जर लोकसभेनंतर केले असते तर लोकांना त्यांच्यावर विश्वास बसला असता. वायनाडच्या कुठल्यातरी पायऱ्या शोधून तिथे बसून ईव्हीएमबद्दल बोलल्यास लोकांनी विश्वास ठेवला असता. पण आता हे हिंदुद्वेषाचे राजकारण लोकांनादेखील माहिती आहे. जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा त्यांना काहीही वाटले नाही. तेव्हा ते हिरवा गुलाल उधळत होते. आता हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचारांचे सरकार निवडले आणि हिंदु मतदार म्हणून आपली ताकद दाखवल्याने त्यांना हिरव्या मिरच्या लागत आहेत. त्यामुळे विरोधक जे काही करतात ते हिंदु समाज खुल्या डोळ्याने पाहतो आहे. ईव्हीएमच्या या आंदोलनाला काहीही अर्थ नाही," असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.