मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यामधून रविवार दि. १५ डिसेंबर रोजी १२ फूट अजस्त्र अशा 'किंग कोब्रा' सापाचा बचाव करण्यात आला (king cobra rescued from sindhudurg). स्थानिक वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांच्या मदतीने बांबर्डे येथे लोकवस्तीनजीक आढळलेल्या सापाचा बचाव करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले (king cobra rescued from sindhudurg). मात्र, यानिमित्ताने गेल्या वर्षभरात दोडमार्ग आणि चंदगड मिळून पाच किंग कोब्रा सापांना जीवदान देण्यात आले आहे. (king cobra rescued from sindhudurg)
'किंग कोब्रा' सापाला 'नागराज' असे म्हटले जाते. दोडामार्ग तालुक्यात त्याला 'डोम' किंवा 'काळा साप' म्हणतात. हा साप विषारी असून तो लांबीने साधारण १९ फूटांपर्यंत वाढू शकतो. कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये हा साप प्रामुख्याने आढळतो. पश्चिम घाटामधील 'किंग कोब्रा'च्या अधिवास क्षेत्राची उत्तरेकडील सीमा ही दोडामार्ग आणि चंदगड तालुका आहे. या तालुक्यांमधून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'किंग कोब्रा'च्या नोंदी आहेत. हा साप मोठा असल्याने त्याला मारून टाकले जाते. त्यामुळे सहजा दोडामार्गमध्ये त्याला जीवदान दिल्याच्या घटना घडत नाहीत. मात्र, रविवारी सकाळी बांबर्डे गावातील रहिवासी राजाराम देसाई यांच्या घराशेजारी अजस्त्र किंग कोब्रा साप आढळून आला. लोकवस्तीनजीक हा साप आल्याने वन विभागाने स्थानिक वन्यजीव बचाव कार्यकर्ते लाडू गवस यांच्या मदतीने या सापाचा बचाव केला. त्यानंतर रात्री त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मात्र, हा साप अशक्त आणि भुकेला होता. बऱ्याचदा लोकवस्तीनजीक आढळलेल्या सापांना वैद्यकीय तपासणी न करताच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते. त्यामुळे बचाव करण्यात आलेले किंग कोब्रा सापांची वैद्यकीय तपासणी करुनच यापुढे त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे, अशी मागणी सर्पप्रेमींकडून होत आहे.
नुकतेच भारतातील सरीसृप शास्त्रज्ञांनी 'किंग कोब्र'ाच्या मूळ प्रजातीचे विभाजन करुन या सापाच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणाऱ्या 'किंग कोब्रा' सापाला 'वेस्टर्न घाट किंग कोब्रा' असे सामान्य नाव देण्यात आले असून त्याचे नामकरण 'आॅफिओफॅगस कलिंगा', असे करण्यात आले आहे. शिवशकंराच्या गळ्यातील साप हा काळा असतो आणि त्याला कानडी भाषेत 'कलिंगा' म्हणतात. पश्चिम घाटात आढळणारा किंग कोब्रा हा काळसर रंगाचा असल्याने संशोधकांनी त्याचे नामकरण 'आॅफिओफॅगस कलिंगा', असे केले आहे. पश्चिम घाटात आढळणाऱ्या 'किंग कोब्रा'चे विभाजन नव्या प्रजातीमध्ये केल्याने महाराष्ट्रामध्ये आढळणारा 'किंग कोब्र'ा देखील आता 'आॅफिओफॅगस कलिंगा' या नावानेच ओळखला जातो.