ठेवा दुर्मीळ पुस्तकांचा; 'बीएनएचएस' आयोजित दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शन

    16-Dec-2024   
Total Views |
BNHS rare book exhibition



‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे ग्रंथालय हे नैसर्गिक इतिहासाला समर्पित असलेले भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक आहे (BNHS rare book exhibition). या ग्रंथालयामधील दुर्मीळ पुस्तकांचा ठेवा वाचकांच्या भेटीला येणार आहे (BNHS rare book exhibition). याच दुर्मीळ पुस्तक प्रदर्शनाविषयी माहिती देणारा हा लेख...(BNHS rare book exhibition)
 
 
'द बर्ड्स ऑफ एशिया’ अत्यंत देखणी चित्रे आणि १५० वर्षांनंतरही चित्रातील रंगाचा टिकलेला ताजेपणा, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. आशियामधील पक्ष्यांचे वैविध्य आणि त्यांची श्रीमंती दाखवणारे तेवढेच समृद्ध असणारे पुस्तक. १८८३ साली स्थापन झालेल्या ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) खजिन्यात दडलेली ’बर्ड्स ऑफ एशिया’सारखी अनेक दुर्मीळ पुस्तक पाहण्याचा योग वाचकांना मिळणार आहे. प्रसंग आहे ’बीएनएचएस’ आयोजित दहाव्या ’हिडन हॅण्ड्स इन कॉलोनियल नॅचरल हिस्ट्रीस’ या दुर्मीळ पुस्तक प्रदर्शनाचा. ’बीएनएचएस’च्या खजिन्यामध्ये १७ व्या आणि १८ व्या शतकातील काही दुर्मीळ ग्रंथ आणि पुस्तकांचा साठा आहे. निसर्ग आणि वन्यजीव यांवर आधारलेला हा दुर्मीळ खजिना आता वाचकांना पाहता येणार आहे. यातील अनेक पुस्तके ही नैसर्गिक जगाचा शोध, अभ्यास आणि संवर्धन यांचा समृद्ध वारसा प्रतिबिंबित करतात. हे प्रदर्शन केवळ वैज्ञानिक शोधाचा इतिहास सांगणार नसून आपले नैसर्गिक जग आणि आपण शतकानुशतके जमा केलेले ज्ञान जतन करण्याच्या महत्त्वावरही भर देणार आहे.
 
 
हे प्रदर्शन तीन विभागांमध्ये मांडण्यात येणार आहे. यामध्ये रसेल पॅट्रिक (सरीसृप वर्ग-१८०१), जॉन गोल्ड (१८५०-१८७३- पक्षीशास्त्र), नॅथॅनियल वॉलिच (वनस्पती शास्त्र-१८३२) यांसारख्या प्रख्यात निसर्गशास्त्रज्ञांच्या दुर्मीळ साहित्याचा समावेश आहे. दुसर्‍या विभागात हाताने रेखाटलेले जॉन गोल्डचे ’द बर्ड्स ऑफ एशिया’, जेम्स फोर्ब्सचे ’ओरिएंटल मेमोयर्स’ (१८१३) आणि नकाशे ही ठळक वैशिष्ट्ये असणार आहेत. तसेच, तिसर्‍या विभागात वनस्पती, जीवजंतू आणि भूगर्भीय रचना दर्शविणारी आणि नैसर्गिक विज्ञानाचा उलगडा करणारी चित्रे बघायला मिळतील. ‘द बर्ड्स ऑफ एशिया’ या पुस्तकात रेखाटलेल्या पक्ष्यांचे रंग पाहताना वाचक हरवून आणि हरखून जातात. एक फुटापेक्षा जास्त लांबी आणि रुंदी असलेल्या या पुस्तकाचे खंड ’बीएनएचएस’ने अत्यंत निगुतीने जपले आहेत. ’सीनरी, कॉस्च्युम्स अ‍ॅण्ड आर्किटेक्चर-चीफली ऑन द वेस्टर्न साइड ऑफ इंडिया’ या पुस्तकात हाताने चित्रे काढलेली आहेत. रॉबर्ट ग्रींडले १८०४ ते १८२० या काळात भारतात होते. त्यांनी ज्या भागाला भेट दिली, तेथील भूप्रदेश, वास्तू, निसर्ग यांची रेखाचित्रे रेखाटली. १९व्या शतकाच्या पूर्वार्धातील जीवन या पुस्तकातून समोर येते. ’ओरिएन्टल मेमवार्स’ हे १८व्या शतकातील दुर्मीळ पुस्तक या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. जेम्स फोर्ब्स हा लेखक १७६५ ते १७८४ या कालावधीमध्ये भारतात होता. त्याने टिपणे आणि रेखाचित्रांसह सुमारे ५२ हजार पानांचे हस्तलिखित तयार केले. १७८१ मध्ये ताजमहालला भेट देऊन त्याचे चित्र काढणारा हा पहिला युरोपीयन लेखक ठरला. त्याचे हे पुस्तक भारतातील संस्कृती, वनसंपत्तीसंदर्भातील महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ’मेमवार्स ऑफ अ मॅप ऑफ हिंदूस्तान’ हे १७८८ मधील पुस्तक आहे. जेम्स रेनेल या लेखकाने बंगालचा अचूक नकाशा काढला होता. हा पहिला अचूक नकाशा मानला जातो. मुंबई शहर इतर काही शहरांपासून किती दूर आहे, अशी काही महत्त्वपूर्ण माहिती या नमूद करण्यात आली आहे, तर ’बॅलड्स ऑफ मराठाज’मध्ये पोवाड्यांचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे. १८३८ मध्ये त्यांनी या पुस्तकावर काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे हे पुस्तक त्या काळाचा आरसासुद्धा आहे.
 
 
शहर, संस्कृती, निसर्ग, पक्षी, वनस्पती, वास्तू यांची माहिती देणारी दुर्मीळ पुस्तके आणि ‘बीएनएचएस’च्या जुन्या जर्नलमधील काही फोटोसुद्धा इथे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. ही पुस्तके हाताळायला परवानगी नाही. यातील अनेक पुस्तके तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जपली जात आहेत. ‘बीएनएचएस’मध्ये एकूण दोन हजार दुर्मीळ पुस्तके आहेत. या खजिन्याबद्दल वाचकांना माहिती मिळावी, असा याचा हेतू असल्याचे ग्रंथपाल निर्मला बरुरे यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे हिवाळ्यामध्ये आर्द्रता नियंत्रणात असल्याने या कालावधीत दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. या पुस्तकांचे एखादे पान जरी वाचकांपर्यंत पोहोचले, तरी त्यातील वेगळेपणा आणि सौंदर्य उलगडते. त्यातून हा खजिना शोधण्याची इच्छाही निर्माण होते, त्यामुळे हे प्रयत्न करण्यात येत आहेत.
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.