मराठी भाषेची महती सांगणारा चित्रपट लवकरच तयार करणार: सचिन पिळगांवकर
‘संस्कार भारती’तर्फे आयोजित ‘सिनेटॉकिज’ कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न
14-Dec-2024
Total Views | 29
1
मुंबई : २०२४ मराठी भाषेला ( Marathi Bhasha ) ‘अभिजात’ भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि हेच औचित्य साधून आज सिनेटॉकिजच्या या उपक्रमावेळी जाहीर करतो की, लवकरच मी मराठी मातृभाषेवर आधारित चित्रपट तयार करणार आहे, ही महत्त्वपूर्ण घोषणा अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते सचिन पिळगांवकर यांनी केली. मुंबईत नॅशनल स्टॅाक एक्सचेंजच्या (एनएसई) वास्तूत संस्कार भारतीतर्फे आयोजित सिनेटॉकिज या तीन दिवसीय उपक्रमाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
यावेळी एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजित गोखले, दक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर, ज्येष्ठ सिनेसमीक्षक भारती प्रधान आणि निर्माते अभय सिन्हा उपस्थित होते.
संस्कार भारतीतर्फे भारतीय चित्रपटांवर चर्चा करण्यासाठी आणि चित्रपटाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्यासाठी ‘सिनेटॉकिज-वुड्स टु रुट्स’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम शुक्रवार, दि. १३ डिसेंबर ते रविवार, दि. १५ डिसेंबर हे तीन दिवस एनएसई येथे साजरा होणार आहे.
तसेच, ‘भारतीय सिनेमा- फ्रॉम वुड्स टू रुट्स’ या संकल्पनेवर आधारित विविध चर्चासत्र या उपक्रमात सादर होणार आहेत. या सत्रांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सहभाग घेणार असून सध्या भारतीय चित्रपटांची असलेली स्थिती आणि त्यात भविष्यात काय बदल हवे आहेत. तसेच, चित्रपटांच्या विषयामुळे समाजात काय बदल अपेक्षित आहेत, अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहेत.
मुंबई ही आर्थिक राजधानी तर आहेच. पण, कलेची देखील राजधानी आहे आणि संस्कार भारतीने आयोजित केलेल्या सिनेटॉकिज या उपक्रमात एनएसईचा देखील सहभाग आहे, याचा अत्यानंद आहे. भारतीय चित्रपटाचा गौरव या माध्यमातून होत आहे, हे उल्लेखनीय आहे.
आशिष चौहान, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एनएसई
भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली इतिहास लक्षात घेता सध्या कथा सांगण्याची विविध माध्यम जरी उदयास आली असली, तरी कथा सांगण्याचे प्रभावी माध्यम चित्रपटच असले पाहिजे. त्यासाठी आपली संस्कृती, मूल्य, परंपरा जपणे आणि चित्रपटांमधून ते मोठ्या पडद्यावर साकारणे फार महत्त्वाचे आहे आणि तेच सिनेटॉकिजच्या ‘वुड्स टु रुट्स’ या उपक्रमातून साध्य करण्याचा प्रयत्न आहे.
अभिजित गोखले, अखिल भारतीय संघटन मंत्री, संस्कार भारती