कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे आणि २७ गावामधील नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीणचे नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ‘एमआयडीसी’ ( MIDC ) विभागाचे सीईओ आणि सदस्य सचिव पी. वेलारासू यांची भेट घेतली. यावेळी पाणी प्रश्नावर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर पी. वेलारासू यांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे.
या बैठकीत १४ गाव आणि २७ गावांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर झालेल्या सखोल चर्चेनुसार पुढील कालवधीत ‘अमृत योजने’चे काम वेगाने मार्गी लावण्याबरोबरच या भागासाठी स्वतंत्र पाणी कोटा मंजूर करत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन यावेळी पी. वेलारासू यांनी दिल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले.
यावेळी ग्रामीण भागातील शिवसेना विधानसभा संघटक बंडूशेठ पाटील, ज्येष्ठ समाजसेवक व शिवसैनिक दत्ता वझे, उपतालुका प्रमुख गणेश जेपाल, उपतालुका प्रमुख विकास देसले, विभागप्रमुख किसन जाधव, विभागप्रमुख अनिल म्हात्रे, हितेश गांधी यांच्या शिष्टमंडळासह आमदार मोरे यांनी ‘एमआयडीसी’च्या सीईओची भेट घेतली.
आमदार राजेश मोरे यांनी केली मागणी
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत. याची सविस्तर माहिती घेतानाच नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याबरोबरच या भागातील वाढणार्या लोकसंख्येची गरज म्हणून या भागातील पाणी कोटा वाढविण्याची मागणी मोरे यांनी केली.