‘हिंदू ग्रोथरेट’ सार्‍या जगाला विकासाचा मार्ग दाखवेल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

    14-Dec-2024
Total Views | 51
Devendra Fadanvis

मुंबई : “९०च्या दशकात हिंदू इकॉनॉमीच्या ग्रोथरेटची बर्‍याचदा चेष्टा करण्यात आली. हिंदू ग्रोथरेट ( Growth Rate ) मुंगीच्या पाऊलांनी चालत आहे. तो पुढे जाणार नाही. ती समाप्त होणारी अर्थव्यवस्था आहे, असे बर्‍याचदा म्हटले गेले. मात्र, आज पाहिलेत तर, हिंदू ग्रोथरेट सार्‍या जगाला विकासाचा मार्ग दाखवेल, अशा स्थितीत येऊन पोहोचला आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम’च्या तीन दिवसीय (दि. १३ डिसेंबर ते दि. १५ डिसेंबर) वार्षिक परिषदेचा शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी ‘वांद्रे-कुर्ला संकुला’तील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे शुभारंभ झाला. ‘थिंक इन द फ्युचर, फॉर द फ्युचर’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून विविध उद्योगक्षेत्रांमध्ये सहयोग, इनोव्हेशन आणि प्रगतीला प्रेरणा देण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

उपस्थितांना संबोधत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी न राहता, ती येत्या काळात देशाची फिनटेक राजधानी होईल, असा विश्वास आहे. ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम’ने गेल्या काही वर्षांत भारताच्या आर्थिक, सामाजिक विकासाच्या क्षेत्रात हिंदू ग्रोथरेटच्या आधारावर आपण उज्ज्वल विकास कसा करू शकतो, या संदर्भात बर्‍याच संकल्पना आपल्यासमोर ठेवल्या आहेत. आपण जाणतोच की, पश्चिमी संस्कृती आणि भारतीय संस्कृतीत एक फरक हा आहे. जो ताकदवान तोच जगेल, असे पाश्चिमात्य संस्कृती मानते. परंतु, हिंदू संस्कृतीने हे कधीच स्वीकारले नाही. जो जन्माला येईल, तो जगेल आणि समाजच त्याच्या जगण्याची व्यवस्था करेल. हे हिंदू संस्कृतीने स्वीकारले. भारतीय संस्कृतीने आपल्या पुरुषार्थाच्या जोरावर विकास केला,” असे ते म्हणाले.

“जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थांचा इतिहास आपण पाहिला तर, कुठे ना कुठे शोषण झालेले आपल्याला दिसते. परंतु, भारताची अर्थव्यवस्था पाहिली तर तिचा झालेला विकास हा कधीच शोषणच्या आधारे झालेला नाही. भारताने आर्थिक प्रगतीसाठी कधीच कोणावर आक्रमण केले नाही. जनतेचे कल्याण करणार्‍या राजालाच आपण कायम मोठे मानले. जनसंख्येला मानव संसाधनात परिवर्तित करून विकास केला जाऊ शकतो, सर्वांना एकत्र घेऊन ‘इन्क्लुझिव’ विकास होऊ शकतो, हे भारताने सार्‍या जगाला दाखवून दिले, याचा मला आनंद आहे. याचा पाया देशात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांनी रचला आणि त्यालाच पुढे परमोच्च बिंदूवर घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम’चे संस्थापक स्वामी विज्ञानानंद, वार्षिक परिषदेचे अध्यक्ष राजेश शर्मा, ‘पद्मश्री’ टी. वी. मोहनदास पै, शैलेश त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121