दिग्गज कलाकार व भारतीय चित्रपटातील बहुमूल्य योगदान देणार्या राज कपूर यांच्या जन्माला आज दि. १४ डिसेंबर रोजी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा धावता आढावा आणि राज कपूर यांच्या सिनेस्मृतीला उजाळा देणारा हा लेख...
सुरत से पहचाने
मुझको जमाना
आवारा छलिया
अनाडी दिवाना...
हिंदी चित्रपटात ‘आवारा’, ‘छलिया’, ‘अनाडी’ अशी छबी असणारा रणबीरराज कपूर उर्फ राज कपूर. ५० ते ६०च्या दशकात राज कपूर हे रशियासाठी भारताची ओळख ठरले. रशियातील साधारण व्यक्ती भारताला ‘पं. नेहरू व राज कपूरचा देश’ म्हणून ओळखायचे. देश स्वतंत्र झाला होता. देश हिंदुस्थान झाला होता. नद्या तुडुंब जलाने भरल्या होत्या. छोटे छोटे ओहोळ, नाले स्वातंत्र्याने जणू हर्षभरित होऊन अल्लडपणे वाहत होते. जंगल, शेत हिरवेगार होते. लोकसंख्या काबूत होती. भारतीय संस्कृती टिकली होती. लोकं ‘ट्रॅजिक’ चित्रपटांबरोबर, नवीन विचारांचे, उत्साही, संकेतात्मक आणि रोमॅन्टिक चित्रपट पसंत करत होते. भारतीय जनजीवनावर आधारित कथानकाचे चित्रपट व कलाकारांबद्दल रसिकांमध्ये आत्मीयता वाढली होती.
राज कपूरनेही या वातावरणात संकेतात्मक चित्रपट काढले. गरीब, फुटपाथवर जगणार्यांचे जीवन मार्मिकतेने प्रदर्शित केले. नर्गिस सोबत जो रोमान्स त्याने वेळोवेळी पडद्यावर उजागर केला, तो केवळ उच्चवर्गीय वर्गासाठी ‘एरिस्टोक्रॅटीक’ नव्हता, तर गरीब व मध्यमवर्गीय युवकांच्या भावनांनाही तो स्पर्श करायचा. त्यांच्या गरिबीतील तंगी व मजबुरीवर आधारित कथानके रंगवून नवीन ‘पॅनोरमा’ यशस्वी केला.
भारतातील ७० टक्के दर्शकांना ते चित्रपट आपलेच वाटायचे. उच्च कोटीचे मधुर संगीत, लोकगीते, समूहगीत, भारतीय तत्कालीन प्रथेवर आधारित कथानक व गावखेड्यातील मानसिकतेचे अभिनयातून प्रत्यक्ष यथार्थ दर्शन, या सर्व गोष्टी राज कपूर आवर्जून दाखवायचा. खर्या अर्थी ‘सैगल युग’ संपविण्याचे श्रेय राज कपूरला. खिलाडी व मार्मिक छबीचा राज कपूर, आपल्या चेहर्यावरील बोलक्या हावभावाने प्रसंगातील परिणाम साधायचा. हसत हसत उच्चारलेल्या संवादातून तो रडवायचा. त्याच्या नेत्रात कारुण्याची झालर झळकायची व तो संवाद दर्शनातून हृदयाचा ठाव घ्यायचा. तो स्वतः संगीताच्या परिणामाचा उत्कृष्ट जाणकार होता.
संगीतकाराकडून भरपूर मेहनत घेऊन त्याला पूर्ण योग्य वाटेल तेच संगीत तो प्रदर्शित करायला लावायचा आणि म्हणूनच राज कपूरच्या प्रत्येक चित्रपटाचे संगीत किती प्रासंगिक आणि दर्जेदार होते, याची साक्ष पटते.
राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे दिग्गज कलाकार आणि एक फार मोठे प्रस्थ होते. त्यांनी केदार शर्मा या महान निर्माता-दिग्दर्शकाकडे राजला सोपवले. केदार शर्मा यांनी या हिर्याला पैलू पाडले. १९३५ सालापासूनच मिळेल ते काम करून १९४३ साली ‘बॉम्बे टॉकीज’च्या ‘हमारी बात’मध्ये बालकलाकार म्हणून राजने काम केले. १९४७ साली ‘नीलकमल’ चित्रपटात मधुबालाबरोबर चक्क नायकाची भूमिका मिळाली. हाच नायक म्हणून राज कपूर यांचा पहिला चित्रपट होता.
भोळ्या, निरागस चेहर्याच्या व कंच्यासारख्या बोलक्या निळ्या डोळ्यांद्वारे भावपूर्ण आशय व्यक्त करणार्या राजने मागे वळून न पाहता, केवळ स्वतःजवळील १३ हजार रुपयांच्या भांडवलावर स्वनिर्मित ‘आग’नावाचा चित्रपट (१९४८) साली काढला. नर्गिस, कामिनी कौशल व नीगार सुलताना या तीन नायिकांना घेऊन काढलेला हा बहुतेक पहिला ‘मल्टीकास्ट’ चित्रपट असेल. अभिनेता, निर्माता व निर्देशक म्हणून केवळ २३व्या वर्षी राज कपूर यांनी ख्याती मिळवली. वडिलांच्या ‘पृथ्वी थिएटर’मधील संगीत विभाग सांभाळणारे राम गांगुलीकडून संगीत केले. ‘जिंदा हू, इस तरह कि गमे जिंदगी नही’ हे मुकेशचे अजरामर गाणे, याच चित्रपटातील आहे.
१९४९ साली चित्रसंस्थेला ‘आर. के. प्रोडक्शन’ असे नाव दिले. सुरुवातीला वडील हे महादेवाच्या पिंडीची पूजा करतानाचे दृश्य देऊन मगच चित्रपटाला सुरुवात व्हायची. ते शिवभक्त होते. या बॅनरखाली १९४९ साली ‘बरसात’ ही प्रेमकथा पडद्यावर आणली. स्वातंत्र्योत्तर काळातील ही प्रेमकथा होती. राज-नर्गिस यांच्या सहजयुक्त अभिनयाने ‘बरसात’ गाजला. ‘बरसात’ हे तत्कालीन तरुण-तरुणींचे रुपेरी स्वप्न होते. राज कपूरमधील आत्मविश्वास, चित्रपट माध्यमावरची पकड, सांगीतिक, अभिनय, निर्मिती, निर्देशन सार्यांचे अव्वल दर्शन ‘बरसात’ मधून घडले. खर्या अर्थाने चित्रपटातील नवीन युग या चित्रपटापासून सुरु झाले.
संगीतातील नवीन युग सुरु करणारे शंकर-जयकिशन यांचा हा पहिलाच चित्रपट. सी. रामचंद्र म्हणाले होते, “बरसात’पासून सुरु झालेले या दोघांचे संगीत पुढे कित्येक काळ मुसळधारेप्रमाणे बरसात राहील.” तसेच, निम्मी, प्रेमनाथ, शैलेंद्र, हसरत जयपुरी यांचाही हा पहिलाच चित्रपट. ‘हवा मे उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमल का, हो जी...’हे लताचे चिरस्मरणीय गाणे कोण विसरेल?
याच वर्षी १९४९ साली, भारतीय कौटुंबिक मूल्यांवर आधारित ‘अंदाज’ हा चित्रपट मेहबूब खानने काढला. राज, दिलीप व नर्गिसला घेऊन काढलेला हा बहुदा पहिला मान्यताप्राप्त मल्टीस्टार चित्रपट असेल. राज-दिलीपच्या अभिनयाची जुगलबंदी यात होती. दोघात कोण श्रेष्ठ? हा चर्चेचा विषय होता.
‘आर. के. ग्रुप’ फॉर्म झाला. राज, मुकेश, शंकर-जयकिशन, शैलेंद्र, हसरत जयपुरी, राघू करमकर इ. त्यात होते. अतिशय मौजमस्तीत व दर्यादिलित या ग्रुपचे आयुष्य खुलले. निरनिराळ्या सहली तसेच आर. के. स्टुडिओत, दरवर्षी होळी धुमधडाक्यात साजरी व्हायची. सितारा देवी ही प्रसिद्ध नर्तिका पण होळीच्या वेळी यायची.
के. ए. अब्बासच्या कथानकावर ‘आवारा’ चित्रपट काढला. तो इतका लोकप्रिय झाला की, भारताबाहेर रशिया, इराण, तुर्कस्तान व मध्य आशियात राजची ओळख ठरली. सज्जनचा मुलगा सज्जन व दुर्जनाचा दुर्जन निघतो, हा सिद्धांत योग्य संस्कार नसेल, तर किती खोटा ठरतो, हा विषय या चित्रपटाद्वारे समर्पकपणे हाताळण्यात आला. या चित्रपटाच्या यशाने राजला चित्रपटाबाहेर ही मानाचे स्थान प्राप्त झाले. एक ‘व्हॅल्यू’ प्राप्त झाली. त्यातील ‘आवारा हूं’ हे गाणे जगभर गाजले.हे गाणे राज कपूरची ओळख बनले.
१९५३ सालच्या ‘आह’ चित्रपटातील अभिनव कथानक व उत्कट प्रेमाची परिणती त्यागात केल्याने मिळालेला आनंद इतक्या उत्कटतेने मांडला आहे की, या एकच चित्रपटाने त्याची कारकीर्द बुलंद झाली असती. लताने आर्ततेने गायलेले ‘राजकी आयेगी बारात’ हे गाणे आजही अस्वस्थ करते. ‘श्री ४२०’ (१९५४) के. ए. अब्बासच्या अफलातून स्क्रिप्टवरून कथानक फुलवले व आपले दिग्दर्शन चातुर्य पणास लावले. यातील दोन-तीन मनाला चटका लावणारे प्रसंग सांगण्याचा मोह अनावर होतो.
(१) मुंबईतील फुटपाथवरील एक जागा तेथील लोकांना मागतो. ते आठ आणे (आठ आणे) रोज सांगतात. ‘इतने बहुत होते हैं,’ म्हटल्यावर एक जण म्हणतो, ‘अरे वो हवेली सेठ सोनाचंद धर्मानंद कि है. सुबह-शाम जब वो खाना खाते हैं, तो किमती अनाजों की महक यहा आती हैं, उससे आधा पेट तो भर जात हैैं।’
(२) राज अॅण्ड कंपनी काही धनिकांच्या साथीने काढतो. १०० रुपयांत गरिबांना घरे बनविण्याची योजना बनवितात. १०० रुपये घेऊन गरीब लाईन लावतात. आत राज बसलेला असतो, बाहेर ललिता पवारचा नंबर येतो. ती फाटक्या कपड्यातून चिल्लर काढून देते व म्हणते, “बेटा, ये ९७ रुपये १२ आणे हैैं, मेरी जिंदगी भर कि कमाई। थोडे कम हैैं। भलेही मेरे मकान को एक खिडकी कम लगाना’ त्या वेळचा बाहेर ललिता व आत राजचा अभिनय केवळ अप्रतिम होता.
(३) राजला गोळी लागते, तेव्हा नर्गिस विलाप करीत म्हणते, ‘जब बम्बई आया था, मेरा राज ऐसा नाही था। बम्बई वाले ने उसे इमान बेचने लगाया। ये सब ४२० हैैं।’ तेव्हा खोटी गोळी लागल्यामुळे राज उठून बसतो व म्हणतो, ‘ये लोग सिर्फ ४२० नही तो श्री ४२० हैं।’
१९५५ सालच्या लहान मुलामुलींसाठीचा ‘बूट पॉलिश’ आठवा. लहान मुलांचे भावविश्व कथा-कादंबर्यांतून समजायला वेळ लागेल. राजने ते यथार्थपणे चित्रित केले. ‘चाचा क्या होती तकदीर? क्यों हैं एक गरीब चाचा, क्यों हैं एक अमीर?’
जॉन चाचाला (डेविड) याचे उत्तर देता येत नाही. उत्कट प्रसंग. तेथे राज दिसतो. कुठलाही संवाद नसलेला ‘जागते रहो’ केवळ चेहर्यावरील अविर्भाव. शेवटी फक्त ‘पाणी‘ म्हणतो. नर्गिस ‘जागो मोहन प्यारे’ हे गाणे ऐकवत त्याला पाणी पाजते. अमित मित्रा व संभू मित्र यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन. ‘अनाडी’मध्ये मिसेस डीसा(ललिता पवार) बरोबर रंगलेली अभिनयाची जुगलबंदी हृदय हेलावून टाकते. चित्रपट वाटत नाही. वास्तवात रमल्यासारखे वाटते.
राज कपूरच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाचे व दिग्दर्शनाचे जर प्रसंगानुरूप वर्णन केले, तर प्रत्येक चित्रपटासाठी एक स्वतंत्र लेख होईल. कालानुरूप राज बदलला. ‘बॉबी’ नंतर सर्वांना माहितच आहे. १९५३ सालच्या यावर्षी ‘आवारा’साठी ‘प्रिक्स’ पुरस्कारासाठी नामांकन, १९५७ साली कार्लोवी महोत्सवात ‘एक दिन रात्रे’ या बंगाली चित्रपटाला सर्वोत्तम फिल्म पुरस्कार, हाच हिंदीत ‘जागते रहो’ म्हणून निघाला. १९७१ या वर्षी भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’, १९८७ साली ‘दादासाहेब फाळके पुरस्कार.’ याशिवाय बेस्ट अॅक्टर व डिरेक्टरसाठी सहा वेळा ‘फिल्म फेअर अवॉर्ड्स’ मिळाले. अभिनयाच्या व दिग्दर्शनाच्या विद्यापीठाचा कुलगुरू शोभणारा ‘कॉमन मॅन’ साकारणारा हा महान कलावंत दि. २ जून १९८८ रोजी कैलासी रवाना झाला व एक युग संपले.
कल खेल मे हम हो ना हो।
गर्दीश मे तारे रहेंगे सदा
भुलोंगे तुम, भुलेंगे वो।
पर हम तुम्हारे रहेंगे सदा ।
रमेश पोफळी
७७७५९००८२४