कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता, पिढीजात उपजत कलेद्वारे कलाक्षेत्रात स्वतःचा अमीट ठसा उमटवणारे दत्तात्रेय खराटकर यांच्याविषयी...
कल्पक कलोपासक दत्तात्रेय खराटकर यांचा जन्म दि. २९ एप्रिल १९७६ साली ठाणे शहरात झाला. आई-वडील, तीन बहिणी आणि दोन भाऊ असे सात जणांचे कुटुंब. घरात शेंडेफळ असल्याने दत्तात्रेय यांचे बालपण अगदी मजेत गेले. सुरुवातीला खराटकर कुटुंब ठाणे स्थानकाजवळील गावदेवी परिसरात वास्तव्यास होते. नंतर पाचपाखाडी, टेकडी बंगला येथे स्थलांतरित झाले. कुटुंबाच्या सान्निध्यात मौजमस्ती करण्यात आनंदाने खेळत बागडत दत्तात्रेय यांचे बालपण गेले. दत्तात्रेय यांचे प्राथमिक शिक्षण ‘आर्य क्रीडा मंडळ’ तसेच नामदेववाडी शाळेत तर, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि ज्ञानसाधना महाविद्यालय येथे बारावी पर्यंत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
संस्कृतमध्ये ‘कल्प’ म्हणजे इच्छा, आकांक्षा आणि ‘तरु’ म्हणजे वृक्ष. त्यामुळे नारळाला ‘कल्पवृक्ष’ म्हणून संबोधले जाते. मानवी गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेमुळे नारळाला ‘कल्पतरू’देखील म्हणतात. नारळाच्या टाकाऊ करवंटीपासून कल्पक असे महालक्ष्मी देवीचे सुबक व सुंदर मुखवटे बनवण्याची मूर्तिकला खराटकर कुटुंबीयांची ओळख बनली आहे. कल्पक मूर्ती कलेचा हा कलात्मक वारसा दत्तात्रेय यांना कुटुंबीयांकडून मिळाला. खराटकर कुटुंबात त्यांच्या आई, मोठी बहीण कलावतीताई यांच्याकडून सुरू झालेली ही कला पुढे दत्तात्रेय आणि त्यांचा मोठा भाऊ मंगेश यांनी पुढे नेत अधिक सुबक केली. हा केवळ व्यवसाय नाही, तर कलेची आवड तसेच परमेश्वराने दिलेल्या या कलेचा समाजासाठी तसेच गृहिणींना कसा उपयोग होईल, या दृष्टीने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या श्री महालक्ष्मी व्रतासाठी लागणार्या देवीच्या मुखवट्याची संकल्पना प्रत्यक्षात आली.
तीन दशकांपूर्वी चाळीतील घरात दत्तात्रेय यांच्या मोठ्या बंधूंनी नारळाला आकार देत त्यावर शाडू माती, रंगकाम आणि आभुषणे चढवून महालक्ष्मीची मूर्ती सर्वप्रथम घरात मार्गशीर्ष पूजेसाठी ठेवली. या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दर गुरुवारी आजूबाजूच्या महिला येत, त्यांनाही या मूर्तीची भुरळ पडली आणि त्यांनीही नारळाच्या मूर्तीची मागणी केली. सुरूवातीला चार-पाच मुखवटे बनविणारे दत्तात्रेय खराटकर आता या व्यवसायात चांगलेच स्थिरावले आहेत. कोणत्याही फाईन आर्ट कला केंद्रात प्रशिक्षण न घेता, उपजतच कला जोपासाणारे दत्तात्रेय खराटकर ठाणेकरांमध्ये ‘कल्पक कलोपासक’ म्हणून आता सुपरिचित.
घरातील प्रत्येक सदस्य या कलेत आपापली जबाबदारी पार पाडतात. देवीच्या मूर्तीला हिरे तसेच, खडे लावण्याचे काम घरातील मातृशक्ती आणि बच्चे कंपनी करतात. सुट्टीच्या दिवशी तर संपूर्ण कुटुंबच या मूर्तिकामात सहभागी होते. नारळाच्या करवंटीवर सुंदर सुबक देवीचा मुखवटा तसेच रंगकाम करताना कलाकुसरीचा कस लागतो. आजकालच्या व्यस्त जीवनात तयार मूर्ती पूजेला मिळणे ही एक प्रकारची सुविधाच दत्तात्रेय खराटकर आणि त्यांचे कुटुंबीय पुरवितात.
नवरात्रौत्सवात तर खराटकर यांच्या नारळातील देवीच्या मूर्तीला चांगली मागणी असते. त्याचबरोबर गणेशोत्सवात गणपतीची, तर नवरात्रौत्सवात देवीची आरास तसेच विविध मंगलकार्यातील सजावट आणि सार्वजनिक उत्सवात विविध कलाकृतींसह देवदेवता व महापुरुषांची भव्यदिव्य रांगोळी काढण्यातही दत्तात्रेय यांचा हातखंडा. या सर्व सजावटीचे काम ‘टाकाऊतून टिकाऊ’ असे इकोफ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून केले जात असल्याने कलेतून एकप्रकारे निसर्गाची जोपासना करण्याचे काम करीत असल्याचे दत्तात्रेय सांगतात. आपली ही कल्पक मूर्तिकला दत्तात्रेय यांना व्यापक स्तरावर पोहोचविण्याची मनिषा आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात महालक्ष्मीची नारळातील प्रतिकृती जावी, हे माझे स्वप्न असून हीच ईश्वराकडे मागणी असल्याचे ते सांगतात. आर्थिक अडचणीमुळे अनेकदा जास्त उत्पादन करता येत नाही, अशी खंतदेखील ते व्यक्त करतात.
मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी देवीची पूजा करण्यात येते. सुहासिनींना देवीची सुबक मूर्ती किंवा मुखवटा अनेकदा मिळत नाही. पण, खराटकर यांनी तयार केलेला नारळाचा सुरेख आणि रेखीव मुखवटा ठाण्यात सहज मिळतो. मुखवटा तयार करण्यासाठी दत्तात्रेय खराटकर हे वर्षभर तयारी करत असतात. हा मुखवटा बनवताना त्यात नारळाचा वापर करण्यात आल्याने देवीचे चार गुरुवार पूजन झाल्यावर उद्यापन करून मग हा देवीचा मुखवटा पाण्यात विसर्जित करता येतो.
युवा पिढीला संदेश देताना खराटकर म्हणतात की, “तुमच्याजवळ जी कला असेल, ती केवळ आवडीपुरती मर्यादित न ठेवता, त्या कलेचे व्यवसायात रूपांतर कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील राहा. परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालून आपल्यातील कलेला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कामात सातत्य आवश्यक असून शॉर्टकट न निवडता, स्वावलंबनाच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर’ होण्याचा प्रयत्न करा, उद्योग निर्माण करण्यासाठी शिक्षणाला कौशल्याची जोड देत नवनवीन कल्पना साकारा,” असा सल्लाही ते युवा पिढीला देतात. अशा कल्पक कलोपासक दत्तात्रेय खराटकर यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!
दीपक शेलार
(अधिक माहितीसाठी संपर्क-८१०८२२८२८९)