मुंबई : ९० च्या दशकातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा आवडता सुपरहिरो म्हणजे ‘शक्तिमान’. अभिनेते मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान आजही पुन्हा पाहावासा वाटतो. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ‘शक्तिमान’ हा चित्रपट येणार असे सांगितले जात आहे. पण नेमकी यात शक्तिमान कोणी साकारावा यावरुनही वेगळा वादंग आणि चर्चा सुरु आहे. पण मुकेश खन्ना यांनी स्वत:च दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याचे नाव सुचवले आहे.
सध्या ‘पुष्पा २ : द रुल’ हा चित्रपट प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवत आहे. या चित्रपचाबद्दल आपले मत मांडताना मुकेश खन्ना म्हणाले की, “अल्लू अर्जुनला ‘पुष्पा २’ साठी १० पैकी ८ ते ९ गुण देतो. आणि इथे आवर्जून एक बाब सांगावीशी वाटते ती म्हणजे अल्लू अर्जुन ‘शक्तिमान’ची भूमिका निभावू शकतो, कारण त्याच्यात ती पात्रता आहे”.
पुढे त्यांनी बॉलीवूडवरही टीका केली. त्यांनी साऊथ सिनेमाच्या संस्कृती आणि धार्मिक भावना सन्मानाने हाताळण्याच्या दृष्टिकोनाची तुलना बॉलीवूडशी केली. ते म्हणाले, “साऊथचे दिग्दर्शक धर्माचा सन्मान करतात, तर बॉलीवूड वादग्रस्त गोष्टी करून लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी धर्माचा उपहास करतो.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंग ‘शक्तिमान’ ही भूमिका साकारणार असे सांगितले जात होते. पण मुकेश यांनी तो या भूमिकेसाठी योग्य नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता जर त्यांनी स्वत: अल्लु अर्जुनचे शक्तिमानच्या भूमिकेसाठी नाव घेतले असेल तर भविष्यात अल्लु अर्जुन ‘शक्तिमान’ साकारताना दिसला तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल हे मात्र नक्की.