आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पर्वत राव यांचे निधन
13-Dec-2024
Total Views | 47
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पर्वत राव ( Justice Parvat Rao ) (वय ९०) यांचे बुधवार, दि. ११ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे निधन झाले. गेला काही काळ ते आजारीच होते. त्यांची मृत्यूशी झुंज अखेर बुधवारी थांबली.
पर्वत राव यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची क्षेत्र संघचालक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. अविभाजित आंध्र प्रदेशातील उंगुतुरू गावात दि. २६ नोव्हेंबर १९३५ रोजी जन्मलेले पर्वत राव लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होते. त्यांनी विजयवाडा येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मद्रास लोयोला महाविद्यालयामधून ‘बीएससी’ पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते इंग्लंडला गेले.
१९५४ मध्ये त्यांनी ‘ऑक्सफर्ड विद्यापीठा’तून भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. मायदेशी परतल्यानंतर त्यांनी चेन्नईमधून कायद्याची पदवी पूर्ण केली आणि हैदराबादमधील दुव्वुरी येथे १९६१ सालापासून त्यांनी स्वतंत्रपणे कायद्याचा सराव सुरू केला. राव यांची दि. १६ मार्च १९९० रोजी प्रथमच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि दि. २६ नोव्हेंबर १९९७ रोजी ते निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळातील अनेक ऐतिहासिक निर्णयांसाठी ते ओळखले जातात.
पर्वत राव एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
पर्वत राव हे एक संघसमर्पित आणि अत्यंत ज्ञानी कार्यकर्ते होते. ते सर्वांसाठी मार्गदर्शक होते. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो.
दत्तात्रेय होसबळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ