नवी दिल्ली : राज्यसभा सभापतींच्या विरोधात महाभियोग प्रस्तावाच्या मुद्द्यावरून सोमवारी राज्यसभेत गदारोळ झाला. यावेळी सभापती जगदीप धनखड ( Vice President ) आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापतींच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित झाल्याने गदारोळ झाला. भाजपचे खासदार राधामोहन दास अग्रवाल यांनी सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेल्या महाभियोग प्रस्तावात नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप केला. महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी १४ दिवसांचा अवधी दिला जातो आणि त्यानंतर सभागृहात त्यावर चर्चा होते. मात्र, काँग्रेसतर्फे त्याआधीच माध्यमांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्यसभा सभापतींचा काँग्रेसने कधीच आदर केला नसल्याचाही आरोप अग्रवाल यांनी केला. काँग्रेस नेत्यांनी समाज माध्यमा उपराष्ट्रपतींविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप राधामोहन दास अग्रवाल यांनी केला. भाजप खासदारांनी उपराष्ट्रपतींचे कौतुक केले. यावरून विरोधक संतप्त झाले.
विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यावर सभापतींनी नाराजी व्यक्त केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सभापतींवर टिप्पणी केल्यानंतर सभापती संतप्त झाले. आपण शेतकऱ्याचा पुत्र असून कणत्याही परिस्थितीत आपण कमकुवत होणार नसल्याचे ठणकावून सांगितले. यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, सभा परंपरा आणि नियमांनुसार चालेल आणि निःपक्षपातीपणे चालेल. आम्ही सभापतींची स्तुती ऐकण्यास आलो नसवल्याचेही खर्गे यांनी म्हटले. यानंतर झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.