दिल्ली : राजधानी दिल्लीमधील ( Delhi ) तालकटोरा स्टेडियम येथे दि. २१ फेब्रुवारी ते दि. २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार्या ‘98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ परिसरास ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी’ नाव देण्याचे ‘अखिल भारतीय साहित्य महामंडळा’ने, तसेच ‘सरहद’ या आयोजक संस्थेने ठरविले आहे.
तसेच “साहित्य संमेलनाला येणार्या रसिकांसाठी पुणे ते दिल्ली रेल्वेची सोय करण्याबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विनंती केली आहे. अश्विनी वैष्णव यांनीही त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, एका रेल्वेत मर्यादित साहित्य रसिकांना समाविष्ट करणे शक्य असल्याने या रेल्वेवर अवलंबून न राहता, महाराष्ट्रातील साहित्य रसिकांनी आपापल्या भागातून आपले दिल्लीसाठी आरक्षण करावे, म्हणजे ऐन वेळी कोणतीही अडचण येणार नाही,” असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.
‘भारतीय साहित्य महामंडळा’च्या ‘९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना’चे आयोजन पुण्यातील सरहद या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार गट) शरद पवार यांची या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे.