मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटामपळे चांगलाच चर्चेत आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. जगभरात या चित्रपटाने ७ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे अल्लूच्या 'पुष्पा २' ची चर्चा सुरु असून दुसरीकडे तो लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशाही चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, यावर आता अभिनेत्याच्या टीमने स्पष्टीकरण दिले आहे.
टीम अल्लू अर्जुन या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “आम्ही सर्व पत्रकार आणि वृत्तसंस्थांना विनंती करत आहोत की, कृपया असत्य असलेली माहिती पसरवू नका. अचूक आणि योग्य माहिती आम्ही या अधिकृत अकाउंटवर दिली आहे, माहिती देण्यासाठी याचाच आधार घ्या.”
पुढे लिहिलं आहे की, “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, अल्लू अर्जुन राजकारणात प्रवेश करणार ही अफवा अत्यंत खोटी आणि निराधार आहे, त्यामुळे खोटी माहिती कोणीही पसरवू नये. तसेच खऱ्या आणि अचूक अपडेटसाठी अल्लू अर्जुनच्या अधिकृत टीमच्या विधानाचा आधार घ्यावा.”
अल्लू अर्जुन गुरुवारी दिल्लीमध्ये आला होता. यावेळी त्याने चित्रपटाच्या यशाबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. ‘पुष्पा २’ चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली आहे. यावर बोलताना तो म्हणाला की, “समोर येणारे आकडे हे तात्पुरते आहेत. मात्र, चाहत्यांचं प्रेम कायमचं मनावर कोरलं गेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की, मोठ मोठे विक्रम हे मोडण्यासाठीच तयार होतात. सध्या मी शीर्षस्थानी आहे. मात्र, पुढील दोन ते तीन महिन्यांत हा रेकॉर्डसुद्धा मोडला जाईल. मग तो दाक्षिणात्य किंवा हिंदी अशा कोणत्याही चित्रपटाने मोडावा, ही आपली प्रगती आहे; याचा अर्थ असा होतो की, भारत पुढे जात आहे.”