जग्गजेता डी. गुकेश झाला करोडपती, 'एवढ्या' कोटींचे मिळाले बक्षीस
विजय मिळवत केला विश्वविक्रम
13-Dec-2024
Total Views | 193
नवी दिल्ली : भारताच्या गुकेश डोम्मराजूने (D. Gukesh) सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गुरूवारी १२ डिसेंबर २०२४ रोजी इतिहास रचला आहे. १८ वर्षीय गुकेशने अंतिम फेरीत डिंग लिरेनला पराभवाची धूळ चारली आहे. आतापर्यंत सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून त्याने जागतिक पातळीवर विक्रम केला आहे. मात्र आता याच गुकेशला किती बक्षीस मिळाले याची आता अनेकांना उत्सुकता लागली आहे.
क्रीडा जगतात बुद्धिबळ स्पर्धेत सर्वाधिक रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. डी. गुकेशने जेतेपद मिळवत ५.०७ कोटी रुपये बक्षीस मिळवत करोडपती म्हणून त्याची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. इतर खेळांच्या तुलनेत बुद्धिबळ या खेळामध्ये बक्षीसांचे गणित हे वेगळे असते. बुद्धिबळ या खेळासाठी एकूण बक्षीसाची रक्कम ही अंदाजे २१ कोटींइतकी असते. यामध्ये बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या FIDE च्या नियमनानुसार, अंतिम सामना खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामना जिंकण्यासाठी १.६९ कोटी रुपये दिले जातात. अशाचप्रकारे डी. गुकेशने एकूण तीन सामने जिंकत त्याला ५.०७ कोटी रूपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तर डी. गुकेशचा प्रतिस्पर्धी असलेला खेळाडू डिंग लिरेनने दोन सामन्यात विजय मिळवत त्याला ३.३८ कोटी बक्षीस देण्यात आले.
दरम्यान, २०१२ साली विश्वनाथन आनंद यांनी विजय मिळवला होता. मात्र आता त्यानंतर गुकेशने विजय मिळवत मानाचा तुरा रोवला आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर आता जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू म्हणून त्याने लक्षवेधी विक्रम केला आहे.