सर्वाधिक फटका तामिळनाडूला केंद्र सरकारने फाडला काँग्रेसचा बुरखा
11-Dec-2024
Total Views | 35
1
मुंबई : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकार आक्रमक झाले असून, त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला पळता भुई थोडी झाली आहे. देशातील अनेक घटनांवर एकामागोमाग एक गौप्यस्फोट करण्याची मालिका सरकारने कायम ठेवत, ‘वक्फ बोर्डा’ने ( Waqf ) ९९४ मालमत्ता अनधिकृतरित्या गिळंकृत केल्याच्या घटनेवर सरकारने प्रकाश टाकला आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारी पक्षाचे आक्रमक रूप पाहून हादरलेल्या काँग्रेसला सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी अजून एक धक्का दिला. ‘वक्फ’च्या काळ्या कारनाम्यांचा बुरखा टराटरा फाडताना केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी एक अहवाल संसदेसमोर सादर केला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी गटाचे नेते जॉन ब्रिटास यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरेन रिजिजू यांनी या अहवालातील माहिती संसदेसमोर सादर केली. त्यानुसार ‘वक्फ बोर्डा’ने देशातील ९९४ मालमत्ता अनधिकृतरित्या बळकावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तसेच ‘वक्फ’च्या आक्रमणाचे सर्वाधिक बळी हे तमिळनाडूतील नागरिक असल्याचे देखील रिजिजू यांनी सांगितले.
हडप केलेल्या ९९४ मालमत्तांपैकी ७३४ मालमत्ता या एकट्या तामिळनाडू राज्यातील असल्याचे देखील सरकरच्या वतीने सांगण्यात आले. तमिळनाडूच्या खालोखाल आंध्र प्रदेशमधील १५२, पंजाबमध्ये ६३, उत्तराखंडमधील ११, तर जम्मू आणि काश्मीर या राज्यातील दहा मालमत्ता बळकावण्यात आल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांनी सादर केली.
त्याचवेळी २०१९ सालापासून केंद्र सरकारने ‘वक्फ बोर्डा’ला एकही जमीन दिली नसल्याचे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर मंत्रालयाने राज्यसभेत स्पष्ट केले. पण, राज्यांनी ‘वक्फ बोर्डा’ला किती जमीन दिली, याची माहिती केंद्राकडे उपलब्ध नसल्याचे देखील केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
भारतीय पुरातत्त्व खात्याला देखील ‘वक्फ’चा विळखा
‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण’ (एएसआय) विभागाच्या २५० मालमत्तादेखील ‘वक्फ’ने हडप केल्या आहेत. पुरातत्त्व खात्याच्या माध्यमातून हा मुद्दा संयुक्त संसदीय समितीसमोर मांडण्यात येणार आहे. पूर्वी ही संख्या १२० असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तपासणीनंतर हा आकडा २५० वर पोहोचला आहे.