विरोधी पक्षांच्या नेत्यांचे वर्तन अशोभनीय : ओम बिर्ला
11-Dec-2024
Total Views | 23
1
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) यांनी मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी संसद संकुलात काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या निषेधाच्या पद्धती अशोभनीय असल्याचे सांगितले. विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे वर्तन संसदीय परंपरेच्या विरुद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अदानी प्रकरणावरून काँग्रेस आणि मित्रपक्षांकडून सातत्याने गदारोळ घातला जात आहे. सभागृहाप्रमाणेच सभागृहाबाहेरही संसदेच्या परिसरात काँग्रेसतर्फे आंदोलन केले जात आहे. मात्र, काँग्रेसच्या आंदोलनाच्या पद्धतीविषयी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “संसद हे पवित्र स्थान असून, या वास्तूची प्रतिष्ठा आहे. ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची सर्वोच्च प्रतिनिधी संस्था आहे. लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा या संस्थेत पूर्ण होतात. सहमती आणि असहमत ही आपल्या लोकशाहीची परंपरा आहे, जी आपण राज्यघटना बनवतानाही व्यक्त केली होती.” “संसदेच्या आवारात ज्या प्रकारची निदर्शने केली जात आहेत, ज्या प्रकारची घोषणाबाजी, पोस्टर्स आणि मुखवटे वापरण्यात येत आहेत, ते केवळ अशोभनीयच नव्हे, तर आपल्या नियम, कार्यपद्धती आणि संसदेच्या विरुद्धही आहे. खेदाची बाब म्हणजे अनेक ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्यांची वर्तणूक आणि वर्तनही संसदीय कार्यप्रणालीस अनुसरून नाही,” असे बिर्ला यांनी म्हटले आहे.
“सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनीही आपापली जबाबदारी ओळखावी,” असे आवाहन बिर्ला यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले, “सर्व पक्षांच्या लोकांनी संसदेची प्रतिष्ठा अणि परंपरा राखली पाहिजे. सदस्यांनी योग्य आचरण करावे, जेणेकरून लोकांमध्ये सकारात्मक संदेश जाईल. लोकशाहीच्या या मंदिरावर लोकांची प्रचंड श्रद्धा आणि विश्वास आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत लोकसभेत चर्चा, संवाद आणि टीका हीच परंपरा आहे,” असेही लोकसभा अध्यक्षांनी नमूद केले.