‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममतांना देण्यास हरकत नाही; लालूंची भूमिका
11-Dec-2024
Total Views | 58
1
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वावर खुश असलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनाही आता राहुल गांधी नकोसे झाले आहेत. ‘इंडी’ आघाडीचे ( Indi Aghadi ) नेतृत्व ममता बॅनर्जी यांना देण्यास आपली हरकत नसल्याचे वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या दणदणीत पराभवानंतर आता ‘इंडी’ आघाडीमध्येही अन्य पक्षांना काँग्रेसची अडचण झाल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभापासून इंडी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसने सोडून ते तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देण्याची मागणी तृणमूल नेत्यांनी आक्रमकपणे करण्यास आरंभ केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या मागणीस राष्ट्रीय जनता दलाने (राजद) पाठिंबा दिला आहे. राजदचे लालूप्रसाद यादव यांनीदेखील मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी इंडी आघाडीचे नेतृत्व ममतांकडे सोपविण्यास आपली हरकत नसल्याचे सांगितले आहे.
अर्थात, लालूप्रसाद यादव यांच्या बदललेल्या भूमिकेस आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचा संदर्भ आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदची आघाडी आहे. राज्याच्या राजकारणात राजदवर नेहमीच दबाव ठेवण्याची भूमिका काँग्रेसची राहिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दबावाचे राजकारण झुगारून देण्यासाठी लालू यादव यांनी थेट राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.