नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंदूंवर ( Hindu ) होणार्या अत्याचार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ सिव्हिल सोसायटी ऑफ दिल्लीतर्फे मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात साध्वी ऋतंभरा यांची विशेष उपस्थित होती.
बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांवर तेथील सरकारच्या आश्रयाने होत असलेल्या अत्याचार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात दिल्लीतील नागरी समाज आणि २०० हून अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी निदर्शने करून निषेध मोर्चा काढला. पंतप्रधान संग्रहालय, तीन मूर्ती चौक ते चाणक्यपुरी पोलीस ठाणे असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती आणि संस्था सहभागी झाल्या. यावेळी हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत मौन बाळगल्याबद्दल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थांवरही उपस्थित लोकांनी प्रश्न उपस्थित केला.
यावेळी साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, “गृहयुद्धाच्या बाबतीत, ऋषी, संत आणि स्त्रियांना सर्वात जास्त त्रास होतो. बांगलादेशात चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी महाराजांसारख्या संत-मुनींना तुरुंगात टाकले जात आहे. महिलांवर सामूहिक बलात्कारासारख्या घटना घडत आहेत.” यावेळी त्यांनी मानवी हक्कांसाठी काम करणार्या आंतरराष्ट्रीय संघटनांवरही प्रश्न उपस्थित केले. लहानमोठे मुद्दे मांडणार्या या संघटना आज हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला.
यासंदर्भातील निवेदनही दिल्लीच्या सिव्हिल सोसायटीने बांगलादेशच्या उच्चायुक्तांना सादर केले. भारत आणि बांगलादेश यांच्यात मजबूत सौहार्दपूर्ण संबंध आहेत आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतातील लोक एकजुटीने उभे आहेत याची आठवण या निवेदनात करण्यात आली आहे. १९७१ सालच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान, भारतीय सैनिक बांगलादेशी लोकांसोबत लढले आणि पाकिस्तानने केलेल्या हिंसाचार, शोषण आणि नरसंहारापासून बांगलादेशला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तथापि, अलीकडच्या वर्षांत, बांगलादेशातील परिस्थिती विशेषत: धार्मिक अल्पसंख्याकांच्या संरक्षण आणि अधिकारांच्या संदर्भात लक्षणीयरित्या खालावली आहे, यावर निवेदनात विशेष भर देण्यात आला आहे.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांची परिस्थिती दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजीनंतर झपाट्याने खालावल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांना शांततापूर्ण सहजीवनाचा अधिकार मिळावा आणि त्यांच्याविरुद्ध सुरू असलेला हिंसाचार संपला पाहिजे. त्याचप्रमाणे बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी दिल्लीच्या सिव्हिल सोसायटीने निवेदनाद्वारे केली.
विविध क्षेत्रांतील नागरिकांची उपस्थिती
साध्वी ऋतंभरा, इस्कॉनचे केशव मुरारी, ‘इंडिया सेंट्रल एशिया फाऊंडेशन’चे संचालक रमाकांत द्विवेदी, दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव, बांगलादेशातील भारताच्या माजी उच्चायुक्त वीणा सिकरी, बौद्ध धर्मगुरू राहुल भंते, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील प्रियदर्शिनी, लेखक-अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते रुद्रनील घोष आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भाजप खा. अभिजीत गांगुली मोर्चात सहभागी झाले.