कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर ( Durgadi Fort ) ‘मजलिस ए मुशावरीन ट्रस्ट’ या मुस्लीम संघटनेने दावा करून किल्ला ताब्यात देण्याची मागणी केली होती. परंतु, हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कल्याण न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेना, भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत संपूर्ण न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत.
गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळापासून दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीबाबतचा हा खटला सुरू होता. मुस्लीम संघटनेकडून केलेल्या दाव्याच्या आधारे ठाणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किल्ले दुर्गाडी येथील सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाला हरकत घेण्यात आली होती. या दाव्याप्रकरणी यापूर्वी न्यायालयाने जैसे थे आदेश दिले होते. या दाव्यावर मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी सुनावणी झाली, यावेळी न्यायालयाने दावा फेटाळून लावला.
“किल्ले दुर्गाडीची जागा ‘वक्फ बोर्डा’ची आहे. त्या जागेचा ताबा त्यांना द्यावा. त्यांना धार्मिक कामासाठी त्याचा उपयोग करायचा आहे”, असा दावा ‘मजलिस ए मुशावरीन’ या संघटनेने केला होता. यावर, ही जागा सरकारने कल्याण- डोंबिवली महापालिकेकडे वर्ग केली आहे. त्याचा उपयोग त्यांनी कसा करायचा हे त्यांनी ठरवावे. ही जागा ‘मजलिस ए मुशावरीन’यांच्या कायदेशीर मालकीची नाही. त्यांचा त्यावर अधिकार नाही. त्यांनी दाखल केलेला प्रलंबित दावा मुदतबाह्य असल्याने हा दावा फेटाळण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले, अशी माहिती सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिली.
कल्याणचे प्रथमवर्ग दिवाणी न्यायधीश ए. एस. लांजेवार यांनी हा दावा फेटाळून लावला असला, तरी दावेदार अपीलात जाऊ शकतो. दरम्यान, या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर किल्ले दुर्गाडीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील तसेच गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर लढा देणारे हिंदुत्ववादी संघटनेचे दिनेश देशमुख, पराग तेली यांनीही निर्णयाचे स्वागत केले. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि शहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात आरती करत या निर्णयाचे स्वागत केले. शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी सांगितले की, “हा निकाल म्हणजे हिंदूचा विजय आहे. हा दावा काही धर्मीयांनी टाकला आहे. न्यायालयाने हिंदू धर्माला न्याय दिला आहे. सत्याचा विजय झाला आहे.”
हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख म्हणाले, “१९७१ साली ठाणे जिल्हा अधिकार्यांच्या कार्यालयात ही वास्तू मंदिर म्हणून जाहीर करण्यात आली. ही वास्तू मंदिर की मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता. हिंदूच्या बाजूने भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्यारीतीने दावा दाखल केला. मस्जिदला कोणत्या ही प्रकारच्या खिडक्या नसतात. या वास्तूला खिडक्या आहेत. आणि मूर्ती उभी राहण्यासाठी म्हणून जागा आहे. देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरच आहे, हे शासनाने जाहीर केले. १९७६ साली मंदिर नसून मस्जिद आहे, असा दावा ठाणे जिल्ह्यात चालला. त्यानंतर ठाणे जिल्हयातून कल्याण न्यायालयात वर्ग करण्यात आला. त्यानंतर हा ‘वक्फ’ आहे असा ही अर्ज केला होता. हा अर्ज कल्याण न्यायलायाने फेटाळला. या निर्णयाचा आम्हाला आनंद होत आहे.”
याचिकाकर्ते पराग तेली म्हणाले, “दुर्गाडी किल्ला दावा या प्रकरणात सरकारी वकील आणि हिंदू संघटना, हिंदू मंचतर्फे सतत पाठपुरावा करत होते. १९७६ साली सात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हा लढा उभा केला. कालांतराने नवीन कार्यकर्ते जोडले गेले. हिंदूच्या बाजूने निकाल लागला असल्याने आनंद होत आहे.”