नवी दिल्ली : अराजकतावादी जॉर्ज सोरोस ( Soros ) आणि सोनिया गांधी यांचे संबंध लपविण्यासाठीच काँग्रेसने राज्यसभेच्या सभापतींविरोधात अविश्वास ठरावाची तयारी केली आहे, असा घणाघात सभागृह नेते आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी केला आहे.
राज्यसभेत गुरुवारीदेखील सोरोस – सोनिया गांधी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेसला धारेवर धरले. ते म्हणाले, अराजकतावादी जॉर्ज सोरोस, काँग्रेसचे नेतृत्व आणि सोनिया गांधी यांच्यातील संबंध हा सध्याचा महत्वाचा मुद्दा आहे. देशाच्या सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेचा हा मुद्दा असून त्यांच्यातील संबंधांची चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे. मात्र, हा विषय भरकटविण्यासाठीच काँग्रेसने राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी केल्याचा आरोप नड्डा यांनी केला.
केंद्र सरकार राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतीय लोकशाहीत ७२ वर्षांनंतर एका शेतकऱ्याच्या मुलाने उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहोचून देशाची सेवा केली आहे. विरोधी पक्षाने प्रारंभापासूनच उपराष्ट्रपतींवर निरर्थक आरोप केले आहेत. मात्र, असे आरोप करणारे हे या सभागृहाचे सदस्य होण्यास लायक नसल्याचा घणाघात रिजिजू यांनी केला. त्याचप्रमाणे उपराष्ट्रपतींविरोधात कोणताही ठराव संमत होण्याचा प्रश्नच नसल्याचेही केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी म्हटले आहे.
काँग्रेस संविधानाचा आदर करत नाही – डॉ. संबित पात्रा
काँग्रेसच्या मनात भारतीय संविधानाविषयी आदर नसल्याचा आरोप भाजप खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी पत्रकारपरिषदेत केला. काँग्रेस आणि इंडी आघाडीचे घटकपक्ष ईव्हीएम आणि केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करणार आहेत. हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवामुळे ते असे करणार आहेत. त्याचप्रमाणे उपराष्ट्रपतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याचीही तयारी त्यांनी केली आहे. सोरोस फाऊंडेशनकडून पैसे घेऊन देश अस्थिर करण्याच्या कटात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि संपूर्ण गांधी नेहरू परिवार सामील आहे. जेव्हा हा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेर उपस्थित केला गेला तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या काही मित्रपक्षांनी या मुद्द्यापासून लक्ष अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न चालवल्याचाही टोला डॉ. पात्रा यांनी लगावला आहे.