आज तुरुंगाच्या अमानवी चेहर्याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे, सीरियामधील सेडनाया हा तुरुंग होय! अत्यंत भयावह चेहरा असलेला हा तुरुंग, सीरियातील असद यांची सत्ता कोसळल्यानंतर चर्चेचाविषय ठरला आहे. सीरियामध्ये असद यांच्या कुटुंबाची गेल्या 50 वर्षांची सत्ता कोसळली. राष्ट्राध्यक्ष असद गेल्या 14 वर्षांत आपल्या विरोधात आवाज उठवणार्या लोकांना दमास्कसनजीक कुख्यात सेडनाया तुरुंगातील अंधार कोठडीत डांबले जात होते.
तुरुंगवास’ हा शब्दच तसा सामान्यांच्या मनामध्ये धडकी भरवणारा. जगामध्ये अनेक अक्राळविक्राळ रुप असणारे तुरुंग प्रसिद्ध आहेत. ब्रिटिश राजवटीमध्ये भारतातील क्रांतिकारकांनी ज्या असंख्य नरकयातना भोगल्या, त्याचा चेहरा असलेले अंदमानातील सेल्युलर तुरुंगही असेच भयावह चेहर्याचे. पण, आज तुरुंगाच्या अमानवी चेहर्याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे, सीरियामधील सेडनाया हा तुरुंग होय! अत्यंत भयावह चेहरा असलेला हा तुरुंग, सीरियातील असद यांची सत्ता कोसळल्यानंतर चर्चेचाविषय ठरला आहे. सीरियामध्ये असद यांच्या कुटुंबाची गेल्या 50 वर्षांची सत्ता कोसळली. राष्ट्राध्यक्ष असद गेल्या 14 वर्षांत आपल्या विरोधात आवाज उठवणार्या लोकांना दमास्कसनजीक कुख्यात सेडनाया तुरुंगातील अंधार कोठडीत डांबले जात होते.
सेडनाया तुरुंगाचे बांधकाम 1980च्या दशकाच्या सुरुवातीस सुरू झाले. बशरचे वडील, सीरियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हाफीज अल-असद यांच्या राजवटीच्या 16 वर्षांच्या काळात या तुरुंगाने आकार घेतला. या तुरुंगामध्ये दोन महत्त्वाच्या इमारती असून, त्यांना ‘पांढरी इमारत’ आणि ‘लाल इमारत’ अशी नावे देण्यात आली आहेत. यांपैकी पांढर्या इमारतीमध्ये असद यांच्या राजवटीशी बेईमानी करणारा लष्करी किंवा शासकीय अधिकारी यांना डांबले जात असे, तर लाल इमारतीमध्ये असद राजवटीच्या विरोधात काम केल्याचा संशय असलेल्या सामान्यांसाठी या इमारतीची रचना करण्यात आली होती. इंग्रजीतील ‘वाय’ या अक्षराप्रमाणे दिसणारी प्रसिद्ध इमारत ही या लाल इमारतीचाच भाग आहे.
2011 मध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर पांढर्या इमारतीमधील जागा रिक्त करून असद राजवटीविरोधातल्या निषेधामध्ये सहभागी झालेल्या जनसामान्यांना या इमारतीमध्ये तुरुंग प्रशासनाचे नियम डावलून डांबण्यात आले. सीरियामध्ये हा तुरुंग म्हणजे असदचा कत्तलखाना असल्याची भावना जनसामान्यांच्या मनामध्ये होती. या तुरुंगातील कैद्यांना 72 पेक्षा जास्त प्रकारचा छळ केला जात होता. जागतिक मनवतावादी मूल्यांच्या रक्षणासाठी कार्य करणार्या संघटनांनी या 72 शिक्षांचा दस्तऐवजीकरण देखील केले आहे. यामध्ये या तुरुंगाच्या तीन विंग असून, या प्रत्येक विंग वेगवेगळ्या प्रमाणात क्रूरतेसाठी प्रसिद्ध आहेत. बंडखोरांना तुरुंगाच्या एका विंगमध्ये ‘आयर्न एक्झिक्यूशन प्रेस’चा वापर करून चिरडून मारण्यात येते. धातूच्या सळ्यांचा वापर करणे, गनपावडर किंवा ज्वलनशील कीटकनाशकांनी कैद्यांना जीवंत जाळणे, कोठडीची भिंत आणि दारात कैद्याचे डोके चिरडणे, कैद्याच्या शरीरामध्ये असंख्य सुया किंवा धातूच्या टाचण्या खुपसणे, कैद्याच्या गुप्तांगाना विजेचा झटका देणे, फाशी देणे अशा पद्धतीच्या शिक्षेच्या प्रमुख पद्धतींचा अवलंब या तुरुंगामध्ये सर्रास करण्यात येत असे. अशाच प्रकारच्या शिक्षा देऊन, या तुरुंगात 1 लाख, 57 हजारांहून जास्त लोकांना छळ करून मारले आहे. त्यात 5 हजार, 274 लहान मुले आणि 10 हजार, 221 महिलांचाही समावेश आहे.
असदची राजवट उलथावून टाकल्यानंतर बंडखोरांनी या तुरुंगावरदेखील कब्जा केला आहे. त्यानंतर त्यांनी या तुरुंगातील कैद्यांना सोडण्याबाबत घोषणादेखील केली. त्यानंतर पांढर्या इमारतीमधील कैद्यांना सहज सोडण्यात आले. मात्र, लाल इमारतीच्या प्रवेशदाराचा शोध घेणे अजूनही बंडखोरांना शक्य झालेले नाही. तसेच बंडखोरांनी ताबा मिळवल्यानंतर असदचे तुरुंग प्रशासन अधिकार्यांनी लगेचच पळ काढल्याने, लाल इमारतीमधील कैद्यांच्या सुटकेसाठी अडचण निर्माण झाली आहे. तुरुंगाचे नकाशे मिळवून त्यांना बाहेर काढण्याचा मार्ग बंडखोर शोधत आहेत, मात्र त्यांना त्यामध्ये यश अद्यापही आलेले नाही.
मात्र, असदची राजवट संपल्याचा आनंद तुरुंगातील कैद्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्यादिवशी असद यांनी देश सोडून पलायन केले, त्यानंतर काहीच दिवसांत सकाळी बंडखोरांनी या तुरुंगावर ताबा मिळवला. ज्या दिवशी बंडखोरांनी या तुरुंगावर ताबा मिळवला, तेव्हा एका कैद्याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार होती, मात्र ती टळली. अशा या सेडनाया तुरुंगात असदने विनाकारण डांबलेल्या आपल्या परिजनांना घेण्यासाठी संपूर्ण सीरियातून येणार्या कैद्यांच्या नातेवाईकांची गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, या सगळ्यांचा आनंद लाल इमारतीचे कोडे सुटण्यावर अवलंबून आहे.
कौस्तुभ वीरकर