मुंबई : अनिल शर्मा दिग्दर्शित वनवास या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यानिमित्ताने दै. मुंबई तरुण भारतने नाना पाटेकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साकारलेल्या अनेक जुन्या कलाकृतींच्या आठवणी नानांनी सांगितल्या.
मेहुल कुमार दिग्दर्शित तिरंगा हा चित्रपट १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी पोलिसाची भूमिका केली होती. या चित्रपटाची एक विशेष आठवण सांगत नाना म्हणाले की, “ ‘तिरंगा’ चित्रपटाची संहिता ज्यावेळी माझ्याकडे आली तेव्हा ती आवडली नव्हती, मला केवळ त्यावेळी पैशांची गरज होती. आणि निर्मात्यांनी ते देण्याचं कबूल केल्यामुळे मी तिरंगा चित्रपट स्वीकारला. ज्यावेळी तिरंगा चित्रपट प्रदर्शित होणार होता त्यावेळी मी गावी जाऊन लपलो होतो. कारण, मला असं वाटलं की माझे मित्र-मैत्रिणी मला काय चित्रपट केला आहेस तु? असं म्हणून मला मारतील. पण आश्चर्याची बाब म्हणजे तिरंगा चित्रपट तुफान गाजला. २५ आठवडे तो चित्रपटगृहात होता. आणि २५व्या आठवड्यातच प्लाझाला बॉम्ब स्फोट झाला होता. पण खरं सांगू का चित्रपटाला नाटक किंवा नायिका नसते तर चित्रपटाचा खरा हिरो ही कथा असते यावर माझा पुर्ण विश्वास आहे. आणि जर का चुकीचे दिग्दर्शक किंवा कथा असेल तर तुमचं मातेरं होऊ शकतं यात काहीच वाद नाही”.
पुढे नानांनी चित्रपटसृष्टीत प्रवास कसा सुरु झाला त्याबद्दल बोलताना म्हटले की, “मी अतिशय व्रात्य माणूस होतो. गुंड झालो असतो पण मला काही माणसं जीवनात भेटली त्यांच्यामुळे मी तो गौरमार्ग न स्वीकारता नाटकांकडे वळलो आणि त्यानंतर बरीच वर्ष नाटकावरच माझं पोट होतं. खरं तर स्मिता पाटील यांच्यामुळे मी चित्रपटांमध्ये आलो. त्यांनी मला सांगितलं की नाटक करत राहा पण चित्रपटांमुळे तु जास्तीत जास्त प्रेक्षकांसमोर पोहोचू शकतोस, तुझं अभिनय कौशल्य पोहोचू शकतं. त्यामुळे चित्रपटसृष्टीत मी स्मिता पाटील यांच्यामुळेच आलो हे ठामपण सांगतो”.
रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.