असद घराण्याची पाच दशकांची राजवट संपली; पुढे काय?

    10-Dec-2024   
Total Views |
 
Bashar al-Assad
 
बशर अल असद यांची एकहाती राजवट संपुष्टात आली असून, सीरियाचे पुढे काय होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. पण, प्रश्न केवळ सीरियापुरता मर्यादित नसून संपूर्ण मध्य-पूर्वेत याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यानिमित्ताने सीरियातील संकटाचे परिणाम आणि भवितव्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
सीरयामध्ये अवघ्या दोन आठवड्यांमध्ये सत्तांतर झाले आहे. गेल्या ५३ वर्षांपासून सीरियावर अत्यंत क्रूरपणे राज्य करणार्‍या असद कुटुंबीयांनी पळ काढून रशियामध्ये आसरा घेतल्यानंतर राजधानी दमस्कस प्रतिकाराशिवाय बंडखोरांच्या हाती सापडली. सीरियातील ‘हयात तहरीर अल शाम’ संघटनेचा नेता अबु महम्मद अल जुलानीकडे सीरियाचे नेतृत्व जाईल असे दिसते. दि. २७ नोव्हेंबर रोजी इस्रायल आणि लेबेनॉनमधील ‘हिजबुल्ला’ या संघटनेमध्ये युद्धविराम झाला. २०११ साली यादवी युद्धाला सुरुवात झाल्यानंतर सीरियातील असद राजवट तग धरुन राहिली. त्यामागे ‘हिजबुल्ला’ची भूमिका महत्त्वाची होती. ‘हिजबुल्ला’ आणखी एक युद्ध लढू शकत नाही, हे लक्षात आल्यावर सीरियाच्या वायव्य भागातील हयात ‘तहरीर अल शाम’च्या बंडखोरांनी २०२० साली रशिया आणि तुर्कीच्या मध्यस्तीने झालेला युद्धविराम तोडून बशर अल असद यांच्या सैन्यावर आक्रमण केले. यादवी युद्धामध्ये असद यांची राजवट टिकून राहण्यात ‘हिजबुल्ला’प्रमाणे इराण आणि रशियानेही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
इराणसाठी सीरियामार्गे लेबेनॉनपर्यंत पोहोचता येत होते, तर रशियासाठी सीरिया भूमध्य समुद्राच्या पूर्वेला नाविक तळ आणि बंदरे उपलब्ध करुन देत होता. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत बंडखोरांनी सीरियातील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या अलेप्पोवर विजय मिळवला. दि. ५ डिसेंबर रोजी बंडखोरांनी हमा या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरावर विजय मिळवला. हमा शहरातून भूमध्य समुद्राकडे जाणारा मार्ग जातो. दि. ७ डिसेंबर रोजी सीरियातील तिसरे मोठे शहर होम्स बंडखोरांच्या हातात पडले. दि. ८ डिसेंबर रोजी सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी आपल्या कुटुंबीयांसह पळ काढल्याच्या बातम्या आल्यामुळे सीरियन सैन्याने न लढताच माघार घेतली. बंडखोरांनी राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केल्यानंतर जुलानीने ऐतिहासिक महत्त्वाच्या उम्मियाद मशिदीतून देशाला उद्देशून भाषण केले.
 
जुलानीचे मूळ नाव अहमद हुसेन अल शरा आहे. त्याचे आजी आजोबा गोलान टेकड्यांच्या परिसरात राहायचे. 1967 सालच्या अरब-इस्रायल युद्धात इस्रायलने गोलान टेकड्यांवर विजय मिळवल्याने ते दमास्कस येथे स्थायिक झाले. त्यावरुन त्याने जुलानी हे नाव घेतले होते. २००३ साली जुलानी अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी इराकला गेला आणि ‘अल कायदा’मध्ये सहभागी झाला. तिथे त्याला बॉम्ब ठेवल्याप्रकरणी अटक झाली आणि त्याने पाच वर्षे इराकमधील अमेरिकेच्या तुरुंगात काढली. सुटकेनंतर तो सीरियात आला आणि तिथे २०११ साली बशर अल असद यांच्या राजवटीविरुद्ध आंदोलनात ‘अल कायदा’शी संबंधित ‘जबहाट अल नुसरा’ या इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटनेत सहभागी झाला. इराक आणि सीरियामध्ये ‘इसिस’ची सत्ता आल्यानंतर त्याने ‘जबहाट अल नुसरा’पासून फारकत घेऊन ‘हयात तहरीर अल शाम’ ही संघटना स्थापन केली. त्याने इस्लामिक मूलतत्त्ववादाशी फारकत न घेता शिया, ड्रुझ तसेच ख्रिस्ती अल्पसंख्यांकांबाबत आपली भूमिका सौम्य केली. त्यांनी तुर्कीच्या मदतीने गेली काही वर्षे सीरियाच्या वायव्य भागातील इडलिब भागात स्वतःचे प्रभुत्व निर्माण केले. तुर्कीचा या युद्धामध्ये सक्रिय सहभाग आहे. पहिल्या महायुद्धापूर्वी जर लोकसंख्येनुसार पश्चिम आशियाची वाटणी केली असती, तर कुर्दिस्तान हा सगळ्यात मोठा देश झाला असता. पण, ब्रिटन आणि फ्रान्सने आपल्या हितासाठी या भागाची जी वाटणी केली, त्यात कुर्दिश लोक तुर्की, इराण, इराक, सीरिया, अझरबैजान आणि अन्य मध्य आशियाई देशांमध्ये विभागले गेले. तुर्कीच्या ८.५ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे २० टक्के कुर्दिशवंशीय लोक आहेत. त्यांच्या संघटनांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी तुर्कीविरुद्ध सशस्त्र लढा उभारला आहे. गेली सुमारे १०० वर्षे तुर्कीने कुर्दिश लोकांचा संघर्ष दाबला असला, तरी २१व्या शतकाच्या सुरुवातीला इराकमध्ये आणि त्यानंतर सीरियामध्ये कुर्दिश लोकांनी मोठ्या भूभागात स्वायत्तता घोषित करुन तिथे स्वतःची समांतर सत्ता चालवली आहे. सीरियाचा एक तृतीयांश हिस्सा कुर्दिश लोकांकडे असून, त्यांना पुढे करण्यासाठीच तुर्कीने ‘हयात तहरीर अल शाम’ला मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे.
 
या युद्धामध्ये इस्रायलही उतरला आहे. बशर अल असद यांची राजवट इस्रायलविरोधी असली, तरी स्थिर होती. ती पडल्यामुळे त्यांनी उभे केलेले शस्त्रास्त्रे तळ तसेच त्यांनी जमवलेला रासायनिक अस्त्रांचा साठा दहशतवादी संघटनांच्या ताब्यात पडण्याची भीती आहे. या दहशतवादी संघटना इस्रायलच्या सीमेच्या भागात येऊ नयेत, म्हणून इस्रायली सैन्याने सीरियाच्या ताब्यातील गोलान टेकड्यांचा प्रदेश ताब्यात घेतला आहे. याशिवाय इस्रायलने बशर अल असद राजवटीच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले करुन बंडखोरांच्या हातात दारुगोळा पडणार नाही, याची काळजी घेतली आहे.
 
‘हयात तहरील अल शाम’ सीरियावर विजय मिळवत असताना इराणने त्यांना प्रतिकार न केल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये इराणने सीरियाला मोठ्या प्रमाणवर मदत केली. पण, आता ‘हमास’ पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून, ‘हिजबुल्ला’ला २०२३ सालाएवढी ताकद मिळवायला किमान दहा वर्षांचा अवधी लागेल. ४४ वर्षांपासून असलेले आर्थिक निर्बंध आणि दुसरीकडे अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला विजय यामुळे इराणची सीरियाच्या आघाडीवर लढण्याची इच्छा नष्ट झाली. असे म्हटले जाते की, जुलानीने इराणला आश्वस्त केले की, त्याची संघटना सीरियामधील शिया पंथीयांना लक्ष्य करणार नाही. त्यामुळे इराणने सीरियातील आपले सैन्य माघारी आणले.
 
युक्रेनमधील युद्धात रशियाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. युद्धात मारल्या गेलेल्या, जखमी झालेल्या आणि पकडलेल्या सैनिकांची संख्या सुमारे सात लाख इतकी आहे. त्यामुळे सीरियामध्ये आणखी सैन्यबळ पाठवणे रशियासाठी शक्य नाही.
 
जुलानी यांनी दमास्कस येथील एका महत्त्वाच्या मशिदीत केलेल्या भाषणात सर्वांना सोबत घेण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी ते आणि त्यांच्यासोबत लढणारे बंडखोर पूर्वी ‘अल कायदा’चा भाग असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. ‘हयात तहरीर अल शाम’ या संघटनेच्या हातात सीरियाचा दोन तृतीयांश भाग असून, एक तृतीयांश भागात कुर्दिश लोकांची सत्ता आहे. याशिवाय सीरियात ठिकठिकाणी ‘अल कायदा’ आणि ‘इसिस’शी संबंधित गट कार्यरत आहेत. २०११ सालापासून सुरु झालेल्या युद्धामध्ये सीरियात १.४ कोटी लोक विस्थापित झाले. 60 लाखांहून अधिक लोक सीरिया सोडून पळून गेले. पाच लाखांहून अधिक लोक मारले गेले. आज एकट्या जर्मनीमध्ये सीरियातून आलेले सुमारे दहा लाख शरणार्थी असून, त्यातील अनेकांना जर्मन नागरिकत्त्व मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सीरियातील असद यांची राजवट उलथवून टाकली असली, तरी तेथे शांतता नांदून शरणार्थी परतण्याची शक्यता कमी आहे.
 
अमेरिकेने सीरियाबाबत हात झटकले असून, आखाती अरब देशांनी खिशात हात घातल्याशिवाय सीरियाच्या पुनर्निर्माणासाठी पैसे उभे राहणे अवघड आहे. सीरियापासून भारत लांब असला, तरी भारताचे असद राजवटीशी चांगले संबंध होते. ‘हयात तहरीर अल शाम’च्या बंडखोरांमध्ये पाकिस्तानी लोकांचाही समावेश होता. तुर्कीची इस्लामिक महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा लक्षात घेता, भारतासाठी सीरियातील घटना महत्त्वाच्या आहेत.
 

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.