साप्ताहिक विवेक
दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक मुखपृष्ठासह ‘साप्ताहिक विवेक’ने सादर केलेला दिवाळी अंक हा दर्जेदारच म्हणावा लागेल. ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत यांच्या कुंचल्यातून साकारलेले देवी सरस्वतीचे मनमोहक आणि जिवंत भासणारे चित्र, हे सर्वस्वी लक्षवेधी. रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची संघशताब्दीनिमित्त घेतलेली विस्तृत मुलाखत आणि त्यांनी मांडलेली पंचसूत्री, ही सर्वस्वी समाजाला दिशादर्शक ठरावी. त्याचबरोबर रमेश पतंगे यांनी अतिशय सोप्या शब्दात, महाराष्ट्रातील संतपरंपरेची शिकवण समाजात रुजवण्यासाठी काय करायला हवे याचे केलेले अर्थगर्भ चिंतनही वाचनीय. दिलीप करंबेळकर यांचा हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या राजकारणाचे विविधांगी पदर उलगडणारा लेखही, तितकाच वैचारिक भरणपोषण करणारा. त्याशिवाय आदित्य जोशी लिखित ‘सेक्युलॅरिझम-अर्थ आणि अनर्थ’, अहिल्यादेवींवरील लेख, संशोधनमहर्षी डॉ. म. रा. जोशी यांचा व्यक्तिवेध, संघयोगी नाना ढोबळे, मदन मोहन आणि मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्तचे लेख, कोकणातील कातळशिल्पे, वंदे मातरम्वरील लेखही उद्बोधक म्हणावे लागतील. दिवाळी अंकातील परिसंवादाचा ‘रक्षण पर्यावरणाचे, जबाबदारी सर्वांची’ हा परिसंवाद जितका विचारशील, तितकाच कृतिशीलतेलाही चालना देणारा झाला आहे. त्याशिवाय भगवान महावीर यांना समर्पित विशेष पुरवणी, आगामी ‘मु. पो. बोंबिलवाडी’ चित्रपटाविषयीचा उत्कंठा वाढविणारा लेखही दखलपात्र. त्याचबरोबर कथा, कविता आणि खुसखुशीत व्यंगचित्रांमुळेही ‘साप्ताहिक विवेक’चा दिवाळी अंक संग्रही ठेवावा असाच.
संपादक : कविता (अश्विनी) मयेकर
प्रकाशन : हिंदुस्थान प्रकाशन संस्था
पृष्ठसंख्या : ३२६
मूल्य : २०० रुपये
कालनिर्णय
‘कालनिर्णय’चा सांस्कृतिक दिवाळी अंक २०२४ हा दरवर्षीप्रमाणे विविध विषयांनी नटलेला. यामध्ये पर्यावरण, व्यक्तिचित्र, कला, पर्यटन, इतिहास, साहित्य क्षेत्रातील लेखांची मेजवानी वाचकांच्याही निश्चितच पसंतीस पडेल, यात शंका नाही. अतुल देऊळगावकर यांनी ‘आपत्तींची मांडलेली उत्क्रांती’ ही तर, डोळ्यांत अंजन घालणारी आहे. त्याचबरोबर सुनीय लिमये यांनी उलगडलेले मेळघाटचे गूढ निसर्गरंग, जयराज साळगावकरांची युरोपची सफर तितकीच रंजक ठरावी. त्याचबरोबर संपादन-प्रकाशन-मुद्रण या क्षेत्रातील काहीसे अस्पर्शित विषय जसे की, ‘द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’ या पाक्षिकाचे संपादक रॉबर्ट सिल्वर्स यांच्यावरील लेख, तिबेटमधील मुद्रणतंत्राचा सुवर्ण इतिहास, ‘गिल सान्स’ या टाइपफेसच्या निर्मितीची कथा, यांसारखे विषय हे ज्ञानात भर घालणारे आहेत. त्याशिवाय नॉर्मन थेलवेल या ब्रिटिश व्यंगचित्रकाराचे आणि ज्येष्ठ कलावंत यमुनाबाई वाईकर यांचे व्यक्तिचित्र तितकेच उत्कट. पंकज भोसले यांनी बालसाहित्याच्या प्रवासाचा विस्ताराने घेतलेला आढावाही, तितकाच महत्त्वपूर्ण ठरावा. त्याचबरोबर अमरेंद्र धनेश्वर यांनी ‘मारुबिहाग’ रागाची चितारलेली शब्दमैफीलही तितकीच लाजवाब. जर्मन प्रतिभेचा गौरवशाली सांस्कृतिक इतिहास, लेखक जयवंत दळवी यांच्या आठवणींचा दरवळही वाचकांना गुंतवून ठेवणारा. एकूणच वाचकांचे ज्ञानरंजन करणारा असा हा ‘कालनिर्णय’चा दिवाळी अंक.
संपादक, प्रकाशक : जयराज साळगावकर
पृष्ठसंख्या : २२६
मूल्य : ३२५ रुपये
द इनसाईट
‘द इनसाईट’च्या टीमचा यंदाचा हा दुसरा दिवाळी अंक. दिवाळी अंकाचे ‘एआय’ तंत्रज्ञानातून साकारलेले मुखपृष्ठ, भविष्यवेधी आणि तितकेच अर्थपूर्ण ठरावे. त्याचबरोबर प्रत्येक लेखासाठीही, ‘एआय’ प्रतिमानिर्मितीचा खुबीने केलेला वापर, विषयनिवड आणि सुसंगत मांडणीचा मेळ साधणारा म्हणावा लागेल. रस्ते हे विकासाचे, प्रगतीचे द्योतक. त्या धर्तीवर महाराष्ट्रातील तीन प्रमुख महामार्गांची निवड करुन, तेथील स्थित्यंतरांचा बारकाईने आढावा घेणारा शार्दुल गानू यांचा रिपोर्ताज, या प्रगतीकडे बघण्याची एक नवीकोरी दृष्टी प्रदान करतो. विनायक पाचलग यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानाविषयी या क्षेत्रातील तज्ज्ञ विवेक सावंत यांची घेतलेली मुलाखत,‘एआय’ तंत्रज्ञानाची व्याप्ती स्पष्ट करणारी ठरावी. तंत्रज्ञान हे मानवी जीवनातील प्रत्येक लहान-मोठ्या घटकांचा अविभाज्य भाग. तेव्हा, तंत्रज्ञान आणि डेटिंग अॅप्स, तंत्रज्ञान आणि खाद्यसंस्कृती, डिजिटल व्यवहार, यांचा उहापोह करणारे लेखही तितकेच वाचनीय. ‘भारताचं स्वॉट अॅनालिसिस’, ‘पिनकोड परिवर्तनाचा’ आणि ‘बाईचं बदललेलं भारीपण’ हे दिवाळी अंकातील लेखही वाचकांना सर्वस्वी ‘इनसाईट’ प्रदान करणारे असेच. त्याशिवाय सचिन परब यांनी घेतलेला महाराष्ट्राच्या राजकारणाचा कानोसा, तुषार कलबुर्गी यांनी मराठा-ओबीसी आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या, आंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीतील मांडलेले जमिनीवरील वास्तवही तितकेच महत्त्वाचे. दिवाळी अंकातील लेखांना दिलेली इन्फोग्राफिक्सची जोडही त्या त्या विषयाचे संदर्भमूल्य वाढविणारी ठरली आहे. एकूणच नवतेला समर्पित हा दिवाळी अंक वाचकांच्याही पसंतीस उतरेल, हे नक्की!
संपादक : सचिन परब
प्रकाशक : विनायक पाचलग
पृष्ठसंख्या : १७८
स्वागतमूल्य : ३०० रुपये