वसा कीर्तनाचा, ध्यास जनहिताचा

    08-Nov-2024   
Total Views |
 
Vanvasi Kalyan Ashram
 
‘वनवासी कल्याण आश्रम’ आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा पुढे नेणार्‍या नाशिकच्या युवा कीर्तनकार अश्विनी हिरामण चौधरी यांच्याविषयी...
 
नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यामधील आमडोंगरा गावामध्ये, ह.भ.प. अश्विनी चौधरी यांचा जन्म झाला. वडील हिरामण चौधरी शेती सांभाळत कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करतात. तर, आई मीराबाईदेखील शेतीकामात मदत करण्याबरोबर शिवणकाम करते. अश्विनी यांचे इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण, आमडोंगरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यांना खेळाची विशेष आवड होती. माळेगावात इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तेव्हा कबड्डीमध्ये अश्विनी यांनी जिल्हा स्तरावर शाळेचे प्रतिनिधीत्व केले. वडील कीर्तनकार होते. त्यामुळे अश्विनी यांनीही कीर्तनकार व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. अकोले येथील वनिताताई पाटील यांच्या ‘वारकरी शिक्षण संस्थे’त, अश्विनी यांचा प्रवेश निश्चित झाला. येथील दिनचर्या तशी अवघडच होती. पहाटे तीन वाजता उठून नंतर काकडा भजन, नित्यनेम, पाठ करून सकाळी नऊ वाजता शाळेत जायचे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांनी कीर्तनसेवेसाठी आवश्यक सर्व धडे घेतले. भिवंडी येथे हरिनाम सप्ताह संपल्यानंतर, त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तीनाथांच्या यात्रेदरम्यान, त्यांनी पहिले कीर्तन केले. दोन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर, पुढे कोरोनामुळे सगळे काही ठप्प झाले. त्यामुळे घरी आल्यानंतरही, वडिलांनी अश्विनी यांना कीर्तनाचे धडे देण्यास सुरूवात केली. कीर्तन लिहून देणे, पाठांतर घेणे, अभंग, श्लोकांचे पठण वडील करून घेत. कोविडचा जोर ओसरल्यानंतर, ग्रामीण भागात कीर्तनाला सुरूवात झाली. कोपुर्लीतून त्यांनी इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
 
आळंदीमध्ये अश्विनी यांनी मराठी व्याकरण आणि ज्ञानेश्वरीचे एक वर्ष धडे घेतले. श्रीमद्भगवतगीता शिकण्यासाठी त्या वृंदावनलाही गेल्या.
 
जवळपास सहा महिने अश्विनी यांना दीदी नर्मदेश्वरीजी यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या अश्विनी या कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. आदिवासी भागात अनेक पुरूष कीर्तनकार आहेत. मात्र, वनवासी भागातील मोजक्या युवा महिला कीर्तनकारांपैकी अश्विनी या एक आहेत. गुही येथे वनवासी कल्याण आश्रमाची शाळा असून, तिथे प्रभु श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. यावेळी अश्विनी यांचेही कीर्तन होते. ज्याचे ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या पदाधिकार्‍यांनी कौतुक केले. पुढे जिल्हा संघटन मंत्री शिवदास पाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली, अश्विनी यांनीही ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे काम करण्यास सुरूवात केली. अश्विनी यांचे कार्य पाहून त्यांच्यावर पुढे ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या, श्रद्धा जागरण आयामाचे नाशिक जिल्हा प्रमुख म्हणून दायित्व सोपविण्यात आले. गावोगावी हनुमान चालिसा पठण सुरू करणे, गावागावातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा, हरिनाम सप्ताह सुरू करणे, अशी अनेक कामे या आयामामार्फत केली जातात. अश्विनी यांचा महिन्यातील अनेक दिवस, यासाठी गावोगावी प्रवास सुरू असतो. आतापर्यंत अश्विनी यांच्या पुढाकाराने, आतापर्यंत १५ ‘श्रद्धा जागरण केंद्रे’ झाली आहेत. पूर्वी महिला, पुरूष कामावरून घरी परतले की, एका ठिकाणी बसत असत. मात्र, आता तशी परिस्थिती नाही. आता सर्वांचेच टीव्ही किंवा मोबाईलमध्ये लक्ष असते. या सर्वांना एकत्र आणण्याचे निमित्त हनुमानचालिसा पठण ठरते. यानिमित्ताने गावातील समस्यांवर बोलणे होते. एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदानदेखील होते. व्यसनाधीन तरूणांना व्यसनमुक्त करण्यासाठी, या केंद्रामार्फत विशेष प्रयत्न केले जातात. त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी अशा तीन तालुक्यात सध्या ‘श्रद्धा जागरणा’चे काम जोमाने सुरू असून, या कार्यामध्ये अश्विनी यांना तालुका प्रमुख, आयाम प्रमुख, गट प्रमुख यांचे सहकार्य लाभते.
 
अभ्यास, मार्गदर्शन करण्यासह जीवनाची शैलीदेखील, अध्यात्मातून शिकविता येते. आईवडिलांचे नाव मला मोठे करायचे आहे. कीर्तन करू इच्छिणार्‍या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी एक संस्था सुरू करण्याचा, माझा मानस आहे. तसेच ज्ञानेश्वरी, संत साहित्यावर पीएचडी करणार असल्याचे, अश्विनी सांगतात. त्या कीर्तनातून ‘लव्ह जिहाद’, संस्कृती, व्यसनमुक्ती, धर्मांतरण अशा विषयांवर प्रबोधन करतात. राणी दुर्गावतींचे चरित्र सांगत, त्या आदिवासी भागात प्रबोधनाचे काम करतात. ‘महिला मेळावा’, ‘संवाद कार्यक्रम’ असे उपक्रम राबविण्यातही, अश्विनी यांचा पुढाकार असतो. प्रत्येक कार्यक्रमाला सहसा अश्विनी यांच्यासोबत त्यांचे वडील असतात. अनेक तरूणांना अश्विनी यांनी व्यसनमुक्त केले. कित्येक तरूणांनी, गळ्यात तुळशीची माळ घातली. आदिवासी भागातील अतिशय दुर्गम वाड्या-पाड्यांवर अश्विनी आपले शिक्षण सांभाळत, वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य करत आहेत. तसेच, अनेक युवा तरूण-तरूणींना त्या आध्यात्मिक क्षेत्राकडे वळविण्यासाठी, प्रयत्न करत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत, वनवासी ‘कल्याण आश्रमाचे कार्य’ आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वसा पुढे नेणार्‍या, युवा कीर्तनकार अश्विनी चौधरी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.