बांगलादेशी नाट्याची भैरवी?

    08-Nov-2024   
Total Views |

Bangladeshi Hindu
बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर जेव्हा मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकार आले, तेव्हा येथील हिंदू अल्पसंख्याकांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्याचा प्रयत्न, इस्लामिक कट्टरपंथींकडून झाला. तो आजही होताना दिसतो आहे. बांगलादेशी हिंदू आज असुरक्षित असल्याचे दिसत आहेत. यापूर्वी इस्लामिक कट्टरपंथी आणि आता बांगलादेशी लष्कराकडून झालेल्या अत्याच्याराबाबत, जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
 
बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर जेव्हा मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकार आले, तेव्हा येथील हिंदू अल्पसंख्याकांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्याचा प्रयत्न, इस्लामिक कट्टरपंथींकडून झाला. तो आजही होताना दिसतो आहे. बांगलादेशी हिंदू आज असुरक्षित असल्याचे दिसत आहेत. यापूर्वी इस्लामिक कट्टरपंथी आणि आता बांगलादेशी लष्कराकडून झालेल्या अत्याच्याराबाबत, जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे हिंदूंच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचा दबाव भारताने बांगलादेश सरकारवर टाकला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचे पुन्हा नव्याने निवडून आलेले राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात आवाज उठवत, हिंदूहिताच्या रक्षणाची शपथ घेतली आहे. कॅनडामध्ये खलिस्तानींकडून झालेल्या हिंदू मंदिरावरील दहशतवादी हल्ल्यानंतर, बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदूंवरील अत्याचारात वाढ झाली आहे.
 
बांगलादेशातील चितगावच्या भागात एका गैरहिंदू दुकानदाराने इस्कॉन विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करत, त्याचे वर्णन ’दहशतवादी गट’ म्हणून केले होते. त्या वादग्रस्त पोस्टवरून, दोन गटात हाणामारी झाली. यात अनेक लोक जखमी झाले. हजारी गलीमध्ये मुख्यतः हिंदू समाजातील लोक राहतात, जे प्रामुख्याने दागिन्यांची आणि घाऊक औषधांची दुकाने चालवतात. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दोन्ही गटांत रात्रभर चकमक झाली. त्यामुळे त्याठिकाणी लष्कर, बॉर्डर गार्ड, बांगलादेशचे निमलष्करी दल तैनात करण्यात आले आणि यादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमुळे, अनेक जण जखमी झाले. हिंदूंवर झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ, सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यादरम्यान, लष्कराकडून रस्त्यावरून शोध घेऊन, हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्याचे पुरावे काढून नाहीसे करण्यासाठी, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही नष्ट करण्यात आले. हल्ल्यापूर्वी संपूर्ण परिसरात वीजखंडित करण्यात आली होती. जेणेकरून हल्ल्याचा पुरावा सहज मिळणार नाही.
 
हिंदूंवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांबाबत, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारताने ढाकाला कट्टरपंथींवर कारवाई करण्याचे आणि हिंदू समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांचे पडसाद, अमेरिकेतही उमटले आहेत. भारतीय-अमेरिकन खा. राजा कृष्णमूर्ती यांनी ढाका येथे हिंदूंवर पुन्हा झालेल्या हल्ल्यांनंतर, बांगलादेशातील हिंदू सुरक्षेसाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला विनंती केली. काही दिवसांपूर्वी चितगाव जिल्ह्यात, इस्कॉन समुहाचा प्रमुख चेहरा असलेले चिन्मय दास यांच्यावर, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चितगाव येथे आयोजित रॅलीमध्ये, बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोपाखाली, त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. यामुळे एकाअर्थी बांगलादेशातील हिंदू समाजावर वाढत्या अत्याचारामुळे, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्कॉन आणि सनातन धर्मावर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या, मुस्लीम दुकानदाराविरोधात कारवाईची मागणी होत असताना, दोषींवर कारवाई करण्याऐवजी, हिंदू समाजावरच हल्ला करण्याचा संपूर्ण डाव रचला गेला होता असेच दिसते आहे.
 
ऑगस्टपासून हिंदू समुदायावर जवळपास, दोन हजारांहून अधिक हल्ले झाले आहेत. ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावरही याविरोधात आवाज उठू लागला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी, हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी ट्विट करून बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवर होणार्‍या हल्ल्यांचा निषेध केला होता. यावरून बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेच्या प्रश्नावर, ते गंभीर असल्याचे स्पष्ट होते. ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षदावर विराजमान झाल्याने, बांगलादेशातील परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी, अमेरिका आणि भारत मिळून एक मजबूत रणनीती बनवू शकतात, अशी चर्चा सध्या होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या सरकारमध्ये हिंदू हिताकडे विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात बांगलादेशातील कट्टरतावादी आणि युनूस सरकारला, आंतरराष्ट्रीय दबावाला सामोरे जावे लागू शकते यात शंका नाही. त्यामुळे बांगलादेशातील हिंदू विरोधी नाट्याची ही भैरवी आहे का? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक