नाशिक : ( Pravin Darekar )लोकसभा निवडणुकीत संविधानाचा खोटा नरेटिव्ह सेट करून दिशाभूल करणारा अपप्रचार केला. आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत अशाच प्रकारे अपप्रचार करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत मतदान मिळवता येईल या उद्देशाने राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे काम सुरू आहे. हातातील संविधानाच्या पुस्तिकेचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते वापर करत असून पवित्र अशा संविधानाचा वापर करण्यास निवडणूक आयोगाने त्यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, लोकसभेत जनतेची दिशाभूल झाली हे निवडणुकीनंतर स्पष्ट झाले. संविधान हा भाजपसाठी सर्वोच्च पवित्र असा राष्ट्रीय धर्मग्रंथ असून त्याला कधीही आम्ही धक्का लावू देणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. उलटपक्षी काँग्रेसने १०७ वेळा घटनादुरुस्ती करत केवळ आपली सत्ता टिकवण्यासाठी घटनेचा ढाचा बदलण्याचे पाप केले आहे. आज संविधानाच्या नावाने पुन्हा एकदा खोटी संविधानाची पुस्तिका घेऊन जो अपप्रचार होत आहे त्याला बंधन लागले पाहिजे.
काँग्रेस, मविआकडे आता कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाहीत. महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा कालावधी आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन वर्षाचा कालावधी याची तुलना विकासाच्या दृष्टीने केली तर पूर्णपणे अपयशी ठरलेले महाविकास आघाडीचे सरकार दिसेल. उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पांना केवळ स्थगिती देण्याचे काम केले आणि महाराष्ट्राचा विकास ठप्प करून ठेवला. दुसरीकडे शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार असल्याने प्रगती गतीने होत आहे. दोन वर्षात रेकॉर्डब्रेक अशा प्रकारचे निर्णय महायुती सरकारने घेतलेले दिसतील.
दरेकर पुढे म्हणाले की, सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारतर्फे १५०० रूपये बहिणींना प्रति महिना दिले जातात. यामुळे सर्वसामान्य बहिणीच्या आयुष्यात मोठा हातभार, दिलासा मिळतोय. ही योजना आली, लोकप्रिय झाली आणि महाविकास आघाडीचे धाबे दणाणले असल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला. तसेच या योजनेच्या विरोधात विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. योजनेसाठी पैसे कुठून आणणार विचारू लागले. एका बाजूला योजनेला विरोध करणार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वचननाम्यात दीड हजाराचे ३ हजार देणार. मग तुम्ही काय पैशाचा पाऊस पाडणार आहात का? असा सवालही दरेकरांनी उपस्थित करत याच महिला भगिनी आपला आशीर्वाद महायुतीला देऊन पुन्हा वाढीव रक्कमेसहित आपल्याला मिळणारी रक्कम शाश्वत करणार असल्याचा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
दरेकर पुढे म्हणाले की, महिला, युवकांसह शेतकऱ्यांनाही आपण मदत करतोय. वीजबिल माफीचा कृषी पंपाचा निर्णय फडणवीसांनी घेतला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ६ सिंचन प्रकल्पांना सुप्रमा होत्या. पाटबंधारेमध्ये जवळपास १०६ सुप्रमांना फडणवीसांनी मंजुरी देत गती दिली. हे सरकार कामगार, रिक्षा वाले, गरिबांसाठी काम करतेय. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक या सरकारच्या माध्यमातून राज्यात येतेय. ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झालीय. त्यामुळे जनतेच्या आशा वाढल्या असून दोन वर्षात प्रगतीकडे जाणारा आपला महाराष्ट्र आणखी गतीने पुढे जावा यासाठी महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे आम्हाला पाठबळ देईल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
नवाब मलिक यांना आमचे समर्थन नाही
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांच्या रॅलीवर बोलताना दरेकर म्हणाले की, अजित पवार त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. नवाब मलिक यांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. महायुती म्हणून भाजपने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महायुतीचे, भाजप म्हणून मलिक यांना आमचे समर्थन नाही. आम्ही त्यांचा प्रचारही करणार नाही. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे.