लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताहात? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राहूल गांधींना सवाल

    06-Nov-2024
Total Views |
 
Fadanvis
 
कोल्हापूर : लाल संविधान दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस नेते राहूल गांधींना केला आहे. तसेच राहूल गांधी हे समाजात अराजकता तयार करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी बुधवारी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारत जोडो या समुहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे आणि कामाची पद्धत ही अराजक पसरवणारी आहे. एकीकडे राहूल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानचा सन्मान केला पाहिजे. पण मग लाल संविधान का? लाल पुस्तक दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात?" असा सवाल त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "संविधान आणि भारत जोडोच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून समाजात विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचे काम सुरु आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा काही वेगळा नाही. लोकांची मनं कलुषित करून त्यांच्यात अराजकतेचं रोपण करणे, जेणेकरून देशातील संस्थांवरचा त्यांचा विश्वास उडेल आणि देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल, हा अर्बन नक्षलवादाचा अर्थ आहे. हेच काम राहूल गांधींच्या माध्यमातून होत आहे," असेही ते म्हणाले.