विदेशी पर्यटकांत ब्रिटन दुसऱ्या स्थानी; 'एक्सेल लंडन’ येथे केंद्रीय पर्यटन मंत्रालय सहभागी होणार
05-Nov-2024
Total Views | 32
नवी दिल्ली : 'एक्सेल लंडन’ येथील जागतिक पर्यटन बाजारमध्ये भारत सहभागी होणार आहे. दि. ०५ ते ०७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान भरणाऱ्या जागतिक पर्यटन बाजारात केंद्रीय पर्यटन मंत्रालय सहभागी होणार आहे. भारत सहभाग नोंदविताना पर्यटकांमध्ये ब्रिटनमधून येणारे पर्यटक दुसऱ्या क्रमांकावर आहेत, याकडे विशेष लक्ष वेधले आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटन बाजारासाठी ५० जणांचे पथक पाठवले असून त्या पथकात राज्य सरकारांचे, पर्यटन संस्थांचे, विमानकंपन्यांचे, हॉटेल मालकांचे प्रतिनिधी समाविष्ट असून भारताची सांस्कृतिक विविधता, पर्यटनाचे अनेक प्रकार व थक्क करून टाकणारे एकमेवाद्वितीय अनुभवांचे भांडार या जागतिक व्यासपीठावर सादर करण्याची जबाबदारी पथकावर असणार आहे.
ब्रिटनमध्ये भारतीय मूळ असलेले १९ लाख नागरिक असून जागतिक स्तरावर एक दर्जेदार पर्यटन अनुभव देणारा देश म्हणून भारताचे स्थान बळकट करणे व येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. यंदा इंडिया पॅव्हिलिअनचा प्रमुख भर विवाह पर्यटन, एमआयसीई पर्यटन व महाकुंभ मेळा यावर राहणार आहे. भारतीय विवाहसोहळ्याची झलक दाखवणारा एक मंडपही इंडिया पॅव्हिलिअनमध्ये उभारण्यात आला आहे.