ट्रुडो सरकारकडून कॅनडात दहशतवाद्यांना राजाश्रय : परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर
05-Nov-2024
Total Views | 40
नवी दिल्ली : ( Dr. S. Jaishankar ) कॅनडामध्ये जस्टीन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहशतवाद्यांना ‘राजकीय आश्रय’ उपलब्ध करून देत आहे, अशी टिका परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी केली आहे.
कॅनडातील हिंदू मंदिर आणि हिंदू समुदायाच्या लोकांवर खलिस्तान्यांनी केलेल्या हल्ल्यावर जगभरातून टीका होत आहे. कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान प्रसारमाध्यमांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना कॅनडातील घटनेबाबत प्रश्न विचारला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या हल्ल्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून ही घटना अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले.
परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकाराचे तीन पैलू आहेत. पहिला म्हणजे कॅनडाने कोणतीही विशिष्ट माहिती न देता आरोप करण्याची पद्धत विकसित केली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे कॅनडाने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांवर पाळत ठेवल्याचे कृत्य केले आहे आणि तिसरी बाब म्हणजे कॅनडामध्ये दहशतवाद्यांना राजकीय आश्रय दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेला हल्ला हा अतिशय चिंताजनक असल्याचे मत परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.