नागपूर : अभिव्यक्ती स्वातंत्र आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या कायम बाता मारणारे काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुरातील कार्यक्रमादरम्यान प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. राहूल गांधींकडून कायम संविधानाची हत्त्या केली जात असल्याचेही दरेकर म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे नागपुरात ६ नोव्हेंबरला संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात येत आहे. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. या संमेलनात विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी, सामाजिक संघटनांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी या कार्यक्रमात उपस्थितांना संविधानाचा सन्मान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, एकीकडे राहूल गांधी संविधानिक मुल्यांची गोष्ट करत असताना दुसरीकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारणे ही एकप्रकारे संविधानाची हत्त्याच आहे, असा आरोप दरेकरांनी केला आहे.
काँग्रेसचा छुपा चेहरा समोर
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलवणार असा खोटा प्रचार करण्यात आला होता. आता नागपूरमध्ये होणाऱ्या संविधान सन्मान कार्यक्रमात प्रसार माध्यमांना बंदी घालण्यात आल्याने संविधानाच्या नावाखाली काँग्रेस कुठला वेगळा अजेंडा राबवत आहेत का? असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे. या कार्यक्रमात प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारून काँग्रेस पुन्हा एकदा संविधानाच्या नावावर खोटा प्रचार करत असल्याचेही दरेकरांनी म्हटले आहे.