मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS on Bangladesh Violence) 'बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवावेत आणि श्री चिन्मय कृष्णा दास यांची तुरुंगातून सुटका करावी', असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेश सरकारला केले आहे. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी यासंदर्भात एक पत्रक जारी केले असून बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.
हे वाचलंत का? : बांगलादेशात १७ हिदूंच्या बँकांची खाती गोठवण्याचे निर्देश केले जारी
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, "बांगलादेशातील हिंदू आणि इतर अन्य अल्पसंख्याकांवर इस्लामिक कट्टरवाद्यांकडून होणारे हल्ले, खून, लूटमार, जाळपोळ आणि महिलांवर होणारे अमानुष अत्याचार हे अत्यंत चिंताजनक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचा निषेध करतो. हे थांबवण्याऐवजी सध्याचे बांगलादेश सरकार आणि इतर यंत्रणा केवळ मूक प्रेक्षक बनल्या आहेत. बांगलादेशातील हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठवलेला आवाज दाबत त्यांच्यावरच अन्याय आणि अत्याचार होताना दिसत आहेत. अशा शांततापूर्ण आंदोलनात हिंदूंचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण दास यांना बांगलादेश सरकारने अटक करणे हे देखील अन्यायकारक आहे."
सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारत सरकारला या पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्याच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलावीत. या महत्त्वपूर्ण वेळी भारत आणि जागतिक समुदाय व संघटनांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून आपला पाठिंबा व्यक्त केला पाहिजे. यासाठी आपापल्या सरकारांकडून शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. अशी मागणी करणे जागतिक शांतता आणि बंधुभावासाठी आज आवश्यक आहे."