जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व

    03-Nov-2024   
Total Views |
dr gangadhar warke


प्रगाध इच्छाशक्ती, अपार मेहनत, कल्पकता, ध्यास आणि बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर आपल्या कर्तृत्वाला हिर्‍यासारखी चमक प्राप्त करून दिले अशा प्रगतिशील उद्योगपती आणि शास्त्रज्ञ डॉ. जीएम अर्थात डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांच्याविषयी...

जळगाव जिल्ह्यातील ’पिळोदे’ येथे जन्मलेल्या डॉ. वारके यांच्या कुटुंबाला वारकरी पंथाची पार्श्वभूमी, त्या वातावरणात त्यांचे संगोपन झाले. त्यांचे शालेय शिक्षण पिळोदे-सांगवी आणि भालोद या गावात झाले. 1966 साली त्यांनी मायक्रोबायोलॉजी या विषयात एम.एस्सी. केले. त्यानंतर बॅक्टेरियॉलॉजी अ‍ॅण्ड फरमेंटेशन मायक्रोबायोलॉजी हा विषय घेऊन त्यांनी ‘पीएचडी’ सारखे उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले. अभ्यासू वृत्ती असलेल्या डॉ. वारके यांना संशोधन क्षेत्राची ओढ होती. ‘पीएचडी’चे शिक्षण घेत असताना त्यांना अनेक शैक्षणिक तसेच, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. संशोधनासाठी आवश्यक असलेली साधन-सामग्री तसेच, अत्यंत दुर्मीळ आणि महाग असलेली कल्चर मीडिया हे संशोधनाच्या मार्गावरील महत्त्वाचे अडथळे होते.

त्यामुळे डॉ. वारके यांनी आपले डॉक्टरेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका खासगी कंपनीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिवसा कंपनीत नोकरी आणि रात्री अभ्यास असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. संशोधक होण्याची तीव्र इच्छा आणि कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्याला शिक्षणासाठी आलेल्या अडचणी भविष्यात इतर विद्यार्थ्यांना येऊ नयेत, यासाठी त्यांनी मनोमन एक निश्चय केला. आपणच आपल्या देशात संशोधनासाठी आवश्यक असलेली सामग्री तयार करायची या निश्चयातूनच त्यांच्या व्यवसायाचा जन्म झाला. आणि ’हायमीडिया लॅब’ ही मायक्रोबायोलॉजी कल्चर मीडिया तयार करणारी कंपनी भारतात उदयास आली.

व्यवसाय करण्याच्या निर्णयानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. राहत्या जागेतच त्यांनी व्यवसायाची सुरूवात केली. मिक्सर ग्राईंडर व्यतिरिक्त व्यवसायाला आवश्यक असलेली अशी कुठलीच सामग्री त्यांच्याजवळ नव्हती. पण, आर्थिक पाठबळ किंवा इतर भांडवलापेक्षा त्यांच्या व्यवसायाला पूरक असलेली बुद्धी, आत्मविश्वास आणि मेहनत करण्याची चिकाटी या गोष्टींचे भांडवल त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात होते. याच जोरावर त्यांनी घाटकोपर इथे आपला लहान भाऊ विष्णू व पत्नी सरोज यांच्या सोबतीने ‘लॅबोरेटरी’ची स्थापना केली. काही गोष्टींसाठी आवश्यक असलेले भांडवल त्यांनी जवळचे नातेवाईक, मित्रांकडून जमा केले. उत्पादन तयार करणे, त्याची विक्री, वितरण या सर्व गोष्टी ते तिघे मिळून करत असत. त्यांच्या हाताखाली चार-पाच माणसे काम करत होती. 1976 साली डोंबिवली (पूर्व) येथे स्वतःचा कारखाना सुरू केला. त्यानंतर दिंडोरी इथे आणखी मोठा कारखाना उभा राहिला. आजच्या घडीला आठ कारखाने तसेच आठ-दहा ऑफिसेस, इतका व्यवसायाचा विस्तार झाला असून, कामगारांची संख्या 1 हजार, 200हून अधिक आहे.

सध्या भारतात या क्षेत्रात काम करणार्‍या आणखी दोन-तीन कंपन्या आहेत. पण, तीन हजारपेक्षा जास्त डिहायड्रेटेड कल्चर मीडिया इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी त्यांची कंपनी आहे. तसेच, 1 हजार, 500 हायव्हेज मीडिया हे उत्पादन तयार करणारी ’हायमीडिया लॅब’ ही भारतातील एकमेव कंपनी आहे. हायमीडीयाच्या अमेरिका, जर्मनी आणि ब्राझीलमध्ये शाखा आहेत. डिहायड्रेटेड मीडियाचा उपयोग दुग्धोत्पादन, औषध कंपन्या, बायोटेक कंपन्या, सीआरओ, सीएमओ, अन्न निर्मिती, शेती, मच्छीमारी, आरोग्य क्षेत्रात आणि इतर कंपन्यांमध्ये केला जातो. त्यांच्या ’हायमीडिया लॅब’ मध्ये पाच हजारच्या वर मायक्रोबायोलॉजीकल उत्पादन तयार होतात. आपल्या संशोधनाद्वारे देशाच्या विकासात मोठा हातभार लावला आहे. इतकेच नाही, तर ’हायफोलियर’ खताची निर्मितीही त्यांची आहे. खतामुळे पिकाच्या जैविक ऊर्जेची बचत होते.

पिकाला त्वरित अमिनो आम्लांचा पुरवठा होतो. पिकांचा आकार वाढतो. नाश व गळती थांबते. दर्जेदार पीक वाढीसाठी शेतकर्‍यांना मोठी मदत झाली आहे. या व्यतिरिक्त वनवासी लोकांना सीकलसेलवरील तपासणीची औषधे त्यांच्यामार्फत दिली आहेत. बर्न इन्स्टिट्यूट इथे त्यांनी स्कीन रिजनरेशन लॅब बांधून दिली. सी.एस.आर सदराखाली आय.आय.टी आणि आय.सी.टी सारख्या तंत्रज्ञान शिक्षण संस्थांना मौलिक मदत केली आहे. कंपनीचे 95 टक्के उत्पादन हे रुग्णालये, औषध कंपन्या, विद्यापीठ तसेच, इतर संशोधनसंस्थांना पुरवले जाते. आता 50 टक्के निर्यात वाढीमुळे परकीय चलनाची मदतही ’हायमीडिया लॅब’मुळे देशाला होत आहे.

डॉ. वारकेना व्यवसायात कुटुंबाची चांगली साथ लाभली. भाऊ विष्णू हे कायद्यांचे पदवीधर असून ,त्यांचा हायमीडीयाची संपूर्ण विक्री आणि वितरण यंत्रणा उभारण्यात सिंहाचा वाटा आहे. डॉ. वारके यांच्या पत्नी सरोज या इंजिनिअर असून माहिती तंत्रज्ञानात त्यांचा विशेष अभ्यास आहे. कंपनीमध्ये संगणक प्रणाली सुरू करून आता सॅपपर्यंत आणण्याचे श्रेय त्यांना जाते. डॉ. वारके यांचे दोन्ही मुलगे डॉ. विशाल, डॉ. राहुल यांनी तसेच, ज्येष्ठ सून डॉ. प्रीती यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे. त्यानंतर भारतात येऊन सेल कल्चर आणि रेडी प्रीपेर्ड प्लेटस् यांचे उत्पादन सुरू केले आहे. कनिष्ठ सून डॉ. श्वेता संपूर्ण स्टाफच्या वैद्यकीय सेवेकडे लक्ष पुरवतात. याशिवाय त्यांचे मेहुणे विजय चौधरी हे डी.टी.पी क्षेत्रात त्यांना खूप मोलाची मदत करतात. भविष्यात जगातील प्रत्येक कॉन्टिनेंटल स्टेटमध्ये कोलॅब्रेशनची त्यांची इच्छा आहे. परदेशी उत्पादन वितरणाचा दर वाढविण्यासाठी आणखी काही महत्त्वपूर्ण देशात वेअर हाऊस स्थापन करण्याचा, परदेशी कंपन्यांबरोबर संयुक्त उपक्रम करण्याचा त्यांचा विचार असल्याचे ते सांगतात.

वारकेंनी वाचनाची, व्यायामाची आवड लहानपणापासून जोपासली. मैदानी खेळामध्ये अनेक बक्षिसे पटकावली आहेत. मुंबई मॅरेथॉनमध्ये दरवर्षी ते सहभागी होतात आणि आपल्या स्टाफलाही प्रोत्साहन देतात. त्यांच्यातल्या या गुणांमुळे ते नवनवीन आव्हान स्वीकारून यशस्वी करुन दाखवतात.

आपल्याला शिक्षणासाठी आलेल्या अडचणी भविष्यात विद्यार्थ्यांना येऊ नयेत, यासाठी त्यांनी अनेक संशोधनांबाबत पेटंट घेणे शक्य असून, सुद्धा पेटंट घेतली नाहीत, उलटपक्षी आपले संशोधन मॅनुअलच्या रुपात प्रकाशित करून ज्ञानाचे हे दालन सगळ्यांसाठी खुले केले आहे. वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा ते उत्साहाने काम करीत असतात. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. डॉ.गंगाधर वारके यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी दै.‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!