पाकिस्तानच्या वाटेवर...

    28-Nov-2024   
Total Views | 70
belarus officials paksitan tour
 

सध्या बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको पाकिस्तानच्या दौर्‍यावर आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लुकाशेंको यांचे निर्धारित असलेल्या प्रोटोकॉलपेक्षाही जास्त उत्साहाने स्वागत केले आणि लागलीच ‘काश्मीर भारत’ मुद्द्यावर ते बोलू लागले. त्यावर लुकाशेंको शरीफला थांबवत म्हणाले, “मी उद्योग-व्यवसाय संदर्भात बोलायला आलो आहे. काश्मीरबद्दल मी काही बोलणार नाही.” बेलारूसच्या राष्ट्रपतींची इतकी खातीरदारी केल्यावरही ते बधले नाहीत. पाकिस्तानच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. दुसरीकडे पाकिस्तानी पंतप्रधान काश्मीर मुद्द्यावर बोलत असतानाच, त्यांचे सहकारी काश्मीर मुद्द्यावर भलतेच बोलतात. सध्या पाकिस्तानमध्ये अभूतपूर्व गदारोळाची परिस्थिती आहे.

भारताचे तुकडे होण्याची स्वप्न पाहणारा पाकिस्तान आता सर्वच आघाड्यांवर सैरभैर झाला आहे. माजी पंतप्रधान इमरान खान तुरूंगात आहेत. त्यांची सुटका करावी म्हणून इमरान यांची पत्नी बुशराबीबी यांनी पाकिस्तानभर आंदोलने सुरू केले. ती आंदोलने पाकिस्तानी सरकारने चिरडली. पण, या आंदोलनामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील लोकही दिसले. यावर पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षाचे म्हणणे, काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही. त्यामुळे तिथल्या लोकांनी इमरानच्या समर्थनार्थ इस्लामाबादला यायचे कारण नव्हते. आंदोलकांना विरोध करता करता पाकिस्तान सरकारने पाकच्या उगाचच ठोकलेल्या दाव्याने काश्मीरच्या भूभागालाही ‘विदेश’ म्हटले. अर्थात, पाकिस्तानला त्यांचा स्वत:चाच भूभाग सांभाळताना मारामार आहे. त्यात पूर्वी कधीतरी बळकावण्याचा प्रयत्न केलेल्या काश्मीरला ते काय सांभाळणार? पाकिस्तानमध्ये महागाई, दहशतवाद, अंधश्रद्धा आणि फुटीरतावादाचा नंगानाच सुरू आहे. हे कमी की काय म्हणून भरीसभर तिथे आता सुन्नी-शिया दंगलीही सुरू आहेत.

पाकिस्तानचा कुर्रम जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा. इथे शिया मुसलमानांच्या माडेखेल जनजाती आणि सुन्नी मुसलमानांच्या मडगी कलाया जनजातीचे वास्तव्य आहे. काही दिवसांपूर्वी माडेखेल जातीचा कबिला जात असताना त्याच्यावर मडगी कलाया जमातीने अंदाधुंदी गोळीबार केला. त्यात शियापंथीय 80 आदिवासी मृत्युमुखी पडले. पुढे या शिया पंथीयांनी सुन्नी आदिवासींवर हल्ला केला. त्यात 60च्यावर सुन्नी पंथाचे मडगी कलाया आदिवासी मारले गेले. इतके मृत्यूचे थैमान का? तर शियापंथीय माडेखेल जमातीने बोशहारा परिसरातील एक कृषी जमीन मडगी कलाया जमातीला शेती करण्यासाठी करारावर दिला होती. जुलै महिन्यात तो करार संपला. मात्र, करार संपल्यावर ही मडगी कलाया समाजाने शेतजमिनीवरचा ताबा सोडण्यास नकार दिला. त्यांनी त्या जमिनीखाली बंकर बांधायला सुरुवात केली. हे कळल्यावर शिया पंथीय माडेखेल जमातीने मडगी कलाया समाजाला विरोध केला. पुढे वाद वाढले आणि त्याचे रूपांतर हिंसेत झाले. पण, या दोन जमातींमधला संघर्ष दोघांतच न राहता पाकिस्तानमधील इतर सुन्नी आणि शियांनीही या वादात उडी घेतली.

पाकिस्तान हा सुन्नी मुस्लीमबहुल देश आहे. कुर्रम जिल्ह्यात शिया मुसलामांनाची संख्याही जास्त. इराण हा शिया मुसलमांनाची सत्ता असलेला देश. कुर्रम जिल्ह्यातील शिया मुसलमांनाना इराण सहकार्य करतो आणि पाकिस्तानच्या सुन्नी मुसलमानांविरोधात उकसवतो, असे पाकिस्तानला वाटायचे. त्यामुळे जिया उल हक यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुर्रम जिल्ह्यात अफगाणिस्तानातील निर्वासित सुन्नी मुसलमानांना आणून वसवले. त्यानंतर मात्र, इथे सुन्नी आणि शियांचा संघर्ष सुरूच राहिला. हिंसा सुरूच राहिली. ही हिंसा पाकिस्तानच्या नशिबी कायमच असावी. पाकिस्तानच काय, त्यातून विभाजित झालेल्या बांगलादेशाचेही काही वेगळे नाही. तिथे सत्ता पालटली. मात्र, देशात हिंसेचे थैमान कायम आहे. तिथे लोक महाविद्यालये पेटवत आहेत.

हिंदू आहेत, म्हणून तिथल्या अल्पसंख्याकांना नरकयातना देत आहेत. बांगलादेशात नैसर्गिक आपत्ती आल्यावर ज्या ‘इस्कॉन’ने भुक्या बांगलादेशी मुसलमानांना अन्नपाणी पुरवले, त्या ‘इस्कॉन’लाच बांगलादेशच्या सरकारने देशद्रोही ठरवले. इस्कॉनच्या स्वामी चिन्मय कृष्ण दास यांना अटक केली. अर्थात, पाकिस्तान आणि बांगलादेश यांना कृतघ्नतेचाच वारसा आहे. पाकिस्तानच्या वाटेवर बांगलादेश चालला आहे.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
पाक हे दहशतवादी...; संयुक्त राष्ट्राच्या बैठकीमध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल

"पाक हे दहशतवादी..."; संयुक्त राष्ट्राच्या बैठकीमध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल

(India Criticizes Pakistan at UN) पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून जगभरात पाकिस्तानला लक्ष्य केलं जात आहे. भारतातून या हल्ल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी भारतीयांकडून केली जात आहे. या हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी पाकिस्तान गेल्या ३० वर्षांपासून दहशतवादाला पोसत आहे, अश्या आशयाचे वक्तव्य केले होते. याची क्लिप भारताने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पुरावा म्हणून म्हणून सादर करत पाकिस्तानवर तोफ डागली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121