मुंबई : विधानसभा निवडणूकीचा निकाल हा काँग्रेससाठी अतिशय लाजीरवाणा असून काँग्रेसच्या आमदारांनी भाजपममध्ये विलीन व्हावे, असे वक्तव्य भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली.
आशिष देशमुख म्हणाले की, "महाराष्ट्रातील २८८ विधानसभेच्या जागांपैकी काँग्रेसच्या फक्त १६ जागा निवडून आल्या आहेत. केवळ ५. ५५ टक्के जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. संपूर्ण देशात हीच परिस्थिती आहे. जवळपास १८ राज्यांमध्ये काँग्रेसच्या १० टक्क्यांपेक्षाही कमी जागा निवडून आल्या. महाराष्ट्रात १६ जागांपैकी १० जागा या विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत. त्यामुळे उरलेल्या १८० जागांपैकी फक्त ६ जागा निवडून आल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे."
"काँग्रेसचे नेते फक्त मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीत भांडत होते. त्यांच्यात कुठेही समन्वय दिसला नाही. प्रचारातही काँग्रेसची यंत्रणा फेल दिसली. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले नेते पराभूत झाले आहेत. प्रदेशाध्यही फक्त २०८ मतांनी वाचले. त्यामुळे काँग्रेससाठी हा अतिशय लाजीरवाणा निकाल आहे. त्यामुळे सर्व काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावे. आपल्या विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी यावे," असे ते म्हणाले.