सद्वस्तू अर्थात परब्रह्म याच्या सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभूतीसाठी समर्थ आपले वाङ्मयीन कौैशल्य पणाला लावून आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी त्याचे विवरण मनाच्या श्लोकांतून देत आहेत. सज्जनांच्या संगतीने ब्रह्मानुभूती सुलभ होते, असे स्वामींचे मत आहे. वेदातील महाकाव्यांचा अर्थ, वेदान्त तत्त्वज्ञान असे कठीण विषय संतसज्जन दृष्टान्तांद्वारा सोपा करून सांगतात आणि ‘शाखा चंद्रकोर’ न्यानाने आपल्याला सत्याची ओळख करून देतात, हे आपण मागील लेखात पाहिले. ज्या ब्रह्माची, सद्वस्तूची अनुभूती घ्यायची त्या विषयाचे महत्त्व आणि त्याचा आवाका स्वामी सांगत आहेत-
दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें।
बरें पाहता गूज तेथे चि आहे।
करीं घेऊं जातां कदा आडळेना।
जनीं सर्व कोंदाटलें तें कळेना॥155॥
म्हणे जाणता ते जनीं मूर्ख पाहें।
अतर्कासि तर्की असा कोण आहे।
जनीं मीपणें पाहतां पाहवेना।
तया लक्षितां वेगळें राहवेना॥156॥
सामान्य माणसाची ज्ञान संपादन करण्याची प्रक्रिया समर्थांनी यापूर्वीही सांगितली होती. येथे पुन्हा पुनरुच्चार होत आहे. कारण, माणूस पूर्वी ऐकलेले विसरतो किंवा मनातील विचार सोडायला मत तयार नसते. म्हणून जे सत्य आहे ते वारंवार सांगावे लागते, अशी स्वामींची भूमिका आहे. माणसे कितीही वर वर ‘मला अहंकार, गर्व नाही’ असे म्हणत असतील, तरी सूक्ष्म अहंकार मनात असतो. तो आपले मत बदलायला सहसा तयार नसतो. आपला सारा भर इंद्रियजन्य ज्ञानावर असतो. डोळ्यांनी जे दिसते तेच खरे आहे, असे मानण्याची मनाला सवय झालेली असते. त्यामुळे चर्मचक्षूंना न दिसणारे आत्मतत्त्व अस्तित्वात आहे, यावर माणसाचा विश्वास नसतो. परंतुु, लोकांना जे दिसत नाही, ते आपल्याला शोधायचे आहे. यातून पारमार्थिक अभ्यासाची सुरुवात होते. सद्वस्तूची अनुभूती मिळवण्यासाठी सर्वप्रथम ‘डोळ्यांना दिसते तेच सत्य’ ही आपल्या मनाची सवय काढून टाकावी लागते. तथापि, प्रपंचात वावरताना मात्र दृष्टीच्या साहाय्याने बाह्य घटना जाणून घ्याव्या लागतात. इंद्रियज्ञानावर आपले बाह्य जीवन जगायचे असते. व्यावहारिक खरे-खोटेपणा ठरवताना ज्ञानेंद्रिये आपल्याला मदत करतात. अशा दृश्यवस्तूंच्या वातावरणात राहून आपल्याला अतीद्रिंयज्ञानाचा, सत्याचा शोध घ्यायचा असतो. हे एक मोठे गूढ रहस्य आहे. या दृश्य जगातील पंचमहाभूतिक वस्तू हातात घेऊन पाहण्याची आपाल्याला सवय असते. तथापि, ब्रह्म हे इंद्रियापलीकडील व तर्कापलीकडील असल्याने ते इतर वस्तूसारखे हातात घेऊन दाखवता येत नाही. ब्रह्म हे विश्वात सर्व ठिकाणी भरून राहिलेले असल्याने वेगळे काढून दाखवता येत नाही. आपल्या मनाला प्रत्येक दृश्यवस्तू हाताळण्याची सवय झाल्याने अदृश्य ब्रह्म हातात घेऊन चर्मचक्षूंनी कसे पाहता येईल? सत्संगाच्या योगे ब्रह्मानुभूती होऊ शकते. सामान्य भाषेत यालाच ‘देव पहाणे’ म्हणतात. दासबोधात स्वामींनी सांगितले आहे की,
जयास वाटे देव पाहावा। तेणे सत्संग धरावा।
सत्संगेवीण देवाधिदेवा। पाविजेत नाही॥ (5.1.23)
आत्मवस्तू, ब्रह्म, सद्वस्तू, सर्व काळी सर्व ठिकाणी व्यापून उरली असल्याने लोकात ती ‘कोंदाटली’ असली तरी, ती डोळ्यांनी पाहू शकत नाही. थोडक्यात, आत्मसाक्षात्कार होणे हे सोपे नाही. सद्वस्तू इंद्रियज्ञानाने ओळखता येत नाही, तर्काने जाणता येत नाही. कारण, माणसाच्या ठिकाणी ‘मीपणा,’ देहबुद्धी असल्याने सद्वस्तूचा अनुभव घेता नाही. ब्रह्मानुभूती घेणारा मी ब्रह्माहून वेगळा मानल्याने सद्वस्तू अनुभवू शकत नाही. त्यामुळे मीपणाचा त्याग न करता जर कोणी ‘मी ब्रह्म जाणले’ असे म्हणत असेल, तर तो मूर्ख आहे, असे स्वामी म्हणतात. दासबोधात अज्ञानी, अहंकारी, अविवेकी माणसाकरिता स्वामींनी ‘मूर्ख’ हा शब्द अनेक वेळा वापरला आहे. याचा अर्थ आत्मानुभूती हा अत्मिंद्रिय अनुभव असल्याने देहाभिमानी, अहंकारी, मीपणा बाळगणार्या माणसाने माझ्या डोळ्यांनी मी सद्वस्तू पाहिली, असे म्हणण्याचा मूर्खपणा करू नये, असे स्वामींना सूचवायचे आहे. श्रुती, स्मृती, न्याय, तर्क इत्यादी शास्त्रे शिकून सद्वस्तू दर्शन होईल का? यावर स्वामी म्हणतात,
बहू शास्त्र धूंडाळितां वाड आहे।
जया निश्चयो येक तो ही न राहे।
मती भांडती शास्त्रबोधें विरोधें।
गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें॥157॥
श्रुति न्याय मीमांसकें तर्कशास्त्रे।
स्मृति वेद वेदान्तवाक्यें विचित्रे।
स्वयें शेष मौनावला स्थीर पाहे।
मना सर्व जाणीव सांडून राहे॥158॥
उत्तम शिक्षक ज्याप्रमाणे प्रश्नाच्या सर्व बाजू समजावून सांगतो, त्याप्रमाणे स्वामी आपल्यासारख्या नाठाळ विद्यार्थ्यांच्या मनातील शंका स्वतः जाणून त्याच्या निरसनार्थ उत्तरे देत आहेत. तत्त्वज्ञानातील ज्ञानशास्त्रांची विविधता ही समाजाची प्रगल्भता दाखवते. शास्त्रातील सर्व ज्ञानशास्त्रग्र्रंथांचा अभ्यास करणे जवळजवळ अशक्य आहे. बरं चिकाटीने काही ग्रंथांचा अभ्यास करावा, तर त्यांच्यात मतैक्य नाही. प्रत्येक ग्रंथ आपले वेगळे मत मांडतो. त्यालाही हरकत नाही. पण, एक ग्रंथ दुसर्याचे मत सोडून काढतो. या खंडन-मंडनामुळे जितके अधिक ग्रंथ वाचावे, तितका गोंधळ वाढत जातो. निश्चित मत हाती लागत नाही. दासबोधातही स्वामींनी हाच अभिप्राय दिला आहे.
येक्या ग्रंथे निश्चय केला। तो दुजयाने उडवला।
तेणे संशयोचि वाढला। जन्मवरी॥ (7.9.4)
शास्त्राशास्त्रांत अशी भांडणे लागल्याने खरा अभ्यासक हे सारे बाजूला सारून फक्त सद्वस्तूचा विचार करतो. त्याला खर्या अर्थाने ज्ञानाचा प्रकाश दिसतो. (प्रबोधे) आणि तो आत्मबुद्घीकडे वळतो. एक काळ असा होता की शास्त्रीपंडित शब्दज्ञानाला अति महत्त्व देत. श्रुती म्हणजे चारही वेद, स्मृती म्हणजे पुराणे, तसेच मीमांसा, तर्कशास्त्र, वेदान्त, व्याकरण हे शास्त्रविवरणात्मक वाङ्मय प्रचंड आहे. सहस्त्र जीभांचा शेष, यानेही मौन बाळगून तो स्वस्थ झाला आहे. तथापि, पूर्वी शास्त्रीपंडित शब्दज्ञानात पारंगत होऊन वादात दुसर्याला हरवून हारीपत्र लिहून घेत. ‘गुरुचरित्र’ ग्रंथात असे दोन शुष्कज्ञानी पंडित नृसिंग सरस्वतींकडे वाद घालायला आले. पुष्कळ समजावूनही ते ऐकेनात, तेव्हा नृसिंह सरस्वतींनी रस्त्यावरून जाणार्या एका मातंगाला बोलावले. त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्याकडून पंडित ब्राह्मणांची वादाची हौस भागवली व त्यांच्या औद्धत्याबद्दल 12 वर्षे ब्रह्मराक्षस व्हाल, असे सांगितले. रामदास स्वामींच्या चरित्रातही असाच प्रसंग आहे. समर्थांना श्लोक क्रमांक 158 मध्ये सांगायचे आहे की, सर्व अध्यात्मशास्त्रांचा अभ्यास करून त्या अभ्यासकाला सद्वस्तूचे चांगले शब्दज्ञान प्राप्त होईल. तो उत्तम बोलेल, पण सहस्त्र जिभांचा शेष ब्रह्माचे वर्णन करू शकत नाही, तेथे मानवाची काय कथा! समर्थांचे सांगणे आहे की, यासाठी ‘देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी’ (श्लोक 163) देहबुद्घीचे ज्ञान आत्मसाक्षात्कारासाठी पुरेसे नाही. त्याचा त्याग करून मनाने आत्मबुद्धीचा स्वीकार केला, तर सद्वस्तूची ओळख शक्य आहे. त्यामुळे हे मना, सर्व जाणीव सोडून तू अतींद्रिय ज्ञानासाठी प्रयत्नशील राहा. त्यातच तुझे कल्याण आहे.
7738778322