दीडशे वर्षे जुनी असलेली आणि अनेक दशके देशावर राज्य करणार्या काँग्रेसची गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींची चाचपणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकाही होत राहिल्या आणि काँग्रेसचा पराभव होत राहिला. राहुल गांधी अतिशय सुमार मुद्द्यांवर राजकारण करत आहेत. जातीय जनगणनेच्या मुद्द्याची हवा जनतेनेच काढून टाकली आहे, तर आरक्षण रद्द करण्याचा खोटा ‘नॅरेटिव्ह’ जनतेने सपशेल नाकारला आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दि. 4 जून रोजी दुपारपासूनच हिंदुत्व समर्थकांमध्ये वेगळेच नैराश्य दाटून आले होते. त्याचे कारण म्हणजे, भाजपला अपेक्षित यश न मिळणे. सलग दोनवेळा बहुमत प्राप्त करणार्या भाजपला तेव्हा 250चा आकडाही ओलांडता न आल्याने हे नैराश्य अधिकच दाटून आले होते. त्यामुळेच सलग तिसर्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याचा आनंद समर्थक, कार्यकर्त्यांमध्ये दिसत नव्हता. याचे प्रमुख कारण होते ते ‘भाजप आरक्षण रद्द करणार’ असा राहुल गांधी यांचा खोटा ‘नॅरेटिव्ह.’ मात्र, याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी लहान-लहान बदलांना प्रारंभ केला होता. अशातच हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि लोकसभेतील 99 जागांच्या अपघाती यशाने हवेत गेलेल्या काँग्रेसने आता हरियाणात आपलीच सत्ता आली, असे ठरवून टाकले होते. त्याच्या आसपासच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचाराच्या संदर्भात ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक रहेंगे-नेक रहेंगे’ अशी घोषणा दिली. मात्र, हरियाणाच्या निवडणुकीमध्ये या घोषणेने जादू केली. भाजपच्या ‘मायक्रोमॅनेजमेंट’सह या घोषणेमुळे मतदारांना योग्य तो संदेश पोहोचला आणि भाजपने हरियाणामध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे भाजपच्या पक्षसंघटनेचे मनोबल कमालीचे उंचावले, यात कोणतीही शंका नाही.
हरियाणातील विजयानंतर एकूणच भाजपच्या कार्यशैलीमध्ये पूर्वीसारखा आक्रमकपणा येण्यास प्रारंभ झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे आव्हान होतेच. त्यांपैकी महाराष्ट्रात महायुती सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्यास महाविकास आघाडीच्या ‘नॅरेटिव्ह’ला बर्यापैकी यश आले होते. मात्र, महाराष्ट्रामध्ये सत्ता कायम ठेवायचीच, या इराद्याने ‘सकल हिंदू समाज’ सज्ज झाला. महाराष्ट्रातही प्रथम योगी आदित्यनाथ यांचे ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘एक हैं तो सेफ हैं’ या घोषणा ‘गेमचेंजर’ ठरल्या. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबप्रेमी, अफजलप्रेमी, रझाकारप्रेमी आणि नक्षलप्रेमींना योग्य त्या शब्दांत त्यांची जागा दाखवून दिली. याचा परिणाम म्हणून, महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मोठा विजय झाला. त्याचवेळी झारखंडमध्ये मात्र भाजपला पराभव पत्करावा लागला. अर्थात, झारखंडमध्ये वाढलेले धर्मांतरण, घुसखोरांना देण्यात आलेले मोकळे रान आणि प्रामुख्याने वनवासी भागामध्ये धर्मांतरणाचे वाढलेले प्रमाणही भाजपच्या अपयशासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसते.
दोन राज्यांच्या निकालातील यशानंतर भाजपने पुन्हा हिंदुत्वास केंद्रस्थानी आणळ्याचे स्पष्ट दिसते. भाजपच्या या निर्णयामुळे देशभरात पसरलेल्या अनेक लहान-मोठ्या हिंदुत्ववादी संघटनादेखील पुन्हा पूर्वीसारख्याच सक्रिय झाल्याचे दिसते. याचाच पुढचा भाग म्हणून यंदाच्या हिवाळी अधिवेशनाकडे बघावे लागेल. संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात भाजप जी 15 विधेयके मांडणार आहे, त्यांपैकी एक ‘वक्फ बोर्डा’शी संबंधित दुरुस्ती विधेयक आहे. भाजपने ज्या सहजतेने हे विधेयक जनतेसमोर मांडले आहे, त्यावरून भाजपची तयारी पूर्ण झाल्याचे दिसून येते. याशिवाय, ‘वक्फ बोर्ड’ जमिनी कशा बळकावत आहे, हेही बातम्यांमधून समोर येणार्या घटनांवरून दिसून येते. यावरून भाजप भविष्यात कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आणि भविष्यात त्यांची निवडणूक रणनीती काय असेल, याचीही कल्पना येते. सुमारे दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी मजबूत प्रतिमा घेऊन निवडणुकीत उतरले होते. आता त्याच प्रतिमेकडे भाजप परतत असल्याचे दिसत आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकीनंतर अपेक्षित असे यश न मिळूनही भाजप ट्रॅकवर परतली आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अपघाताने मिळालेल्या 99 जागांनंतर पुन्हा अपयशाकडे वाटचाल करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय आणि विरोधी महाविकास आघाडीच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “काँग्रेस आता परोपजीवी पक्ष बनला आहे.” पंतप्रधानांनी अगदी नेमक्या शब्दांत काँग्रेसची स्थिती विशद केली. कर्नाटक आणि तेलंगण केवळ याच राज्यांमध्ये काँग्रेस भाजपपेक्षा वरचढ असल्याचे दिसते. अर्थात, कर्नाटकातील स्थिती कधीही बदलू शकते. बंगालमध्ये काँग्रेसने प्रदीर्घ काळ राज्य केले, तरी विधिमंडळात त्यांचा मागमूसही उरलेला नाही. ‘इंडी’ आघाडीचा एक भाग असल्याचा दावा करणार्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर बंगालमध्ये काँग्रेसला परजीवीही बनवण्यास तयार नाहीत. इतर राज्यांमध्येही काँग्रेस प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी यांनी आधीच काँग्रेसला दुय्यम बनवून टाकले आहे.
बिहारमध्येही काँग्रेस पक्ष केवळ नावालाच उरला आहे. राजदचा एक भाग म्हणून काँग्रेस उरली आहे. तेथे राजदप्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांचे हरहुन्नरी पुत्र तेजस्वी यादव हेच काँग्रेसच्या जागा ठरवतात आणि उमेदवारही. त्यासाठी यंदाच्या लोकसभेतील पप्पू यादव यांचे उदाहरण बोलके आहे. काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी आपला जनाधिकार पक्ष (जेएपी) काँग्रेसमध्ये विलीन केला. काँग्रेसनेही त्यांना पूर्णियातून निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दिला आहे. चिन्हाची वाट पाहत असतानाच पप्पू यादव यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख पुढे ढकलली. मात्र, लालू यादव यांच्या दबावामुळे अखेर काँग्रेसने पप्पू यांना उमेदवारी देण्यास नकार दिला. अर्थात, बिहारमध्ये काँग्रेस परजीवी म्हणता येईल, अशा स्थितीतही नाही. कारण, यावेळी बिहारमधील 40 लोकसभा जागांपैकी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात त्याप्रमाणे, काँग्रेस आता ‘अर्बन नक्षलीं’च्या कब्जात असल्यानेच देशातील उद्योगपतींना अर्थात रोजगारनिर्मिती करणार्यांना राहुल गांधी आता लक्ष्य करत आहेत. मात्र, लवकरच हादेखील मुद्दा जनताच सपशेल नाकारल्याशिवाय राहणार नाही. परिणामी स्वतःची आणि पक्षाची फरफट होणे हे आता राहुल गांधी आणि देशविरोधी इकोसिस्टीमच्या भाळी लिहिलेले आहे.