‘जनसुराज’ला जननकार

    25-Nov-2024   
Total Views |
prashant kishor jansuraj party


दि. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणूक निकालाबरोबरच उत्तर प्रदेशसह अन्य काही पोटनिवडणुकांचेही जाहीर झाले. त्यामध्ये प्रामुख्याने चर्चा झाली ती उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणूक निकालाची. परंतु, बिहारमधील चार विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीची महाराष्ट्र आणि झारखंडच्या निकालामुळे राष्ट्रीय माध्यमांकडूनही फारशी दखल घेतली गेली नाही. बिहारमध्येही विधानसभेच्या चार मतदारसंघांसाठीच्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर आले. यामध्ये तरारी, रामगढ, इमामगंज, बेलगंज या चार जागांचा समावेश होता. या चारही जागांवर रालोआच्या उमेदवारांनी निर्विवाद वर्चस्व मिळवले. पण, त्याहीपेक्षा सर्वांचे लक्ष लागून होते, ते प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाकडे. कारण, हा पक्ष पहिल्यांदा निवडणुकांच्या मैदानात उतरला होता. त्यामुळे खुद्द निवडणूक रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर यांचा या पोटनिवडणुकीत किती करिश्मा चालतो, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा खिळल्या होत्या. पण, दुर्दैवाने प्रशांत किशोर यांनी सर्वांचाची निराशा केली. चारही जागांवर जनसुराज पक्षाचे उमेदवार पराभूत झालेच, पण चारपैकी तीन जागांवर उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. आता साहजिकच जनसुराज हा नवखा पक्ष असल्यामुळे त्यांच्याकडून फार चमकदार कामगिरीची अपेक्षा नव्हतीच. पण, केवळ या पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर ऊर्फ ‘पीके’ असल्यामुळे या पोटनिवडणुकीकडे अनेकांचे विशेष लक्ष होते. कारण, प्रशांत किशोर यांनी पक्षस्थापनेपूर्वी आणि नंतरही बिहारच्या गावागावांत पदयात्रा काढून आपला पक्ष आणि पक्षाची विचारधारा पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला होता. तसेच, सरकार सत्तेत आल्यास शिक्षणपद्धतीत बदल आणि राज्यातील दारुबंदी हटविण्याची मागणी असे दोन प्रमुख मुद्दे त्यांनी मांडले होते. त्याशिवाय, दलित आणि मुस्लीम व्होटबँकेच्या राजकारणावर राजकीय पोळ्या शेकण्याचीही किशोर यांनी रणनीती निर्धारित केली होती. परंतु, पक्षस्थापनेनंतरच्या या पोटनिवडणुकीमध्ये मात्र प्रशांत किशोर यांची जादू बिहारमध्ये चाललेली दिसत नाही. त्यामुळे बिहारवासीयांनी नवख्या पक्षावर आणि राजकारणातील नवीन चेहर्‍यांवर विश्वास न दर्शविता, भाजप आणि जदयु यांच्या उमेदवारांनाच पसंती दिली असून, लालूंच्या राजदलाही या पोटनिवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही.

तरी अमेरिकेत ‘चॅप्टर’गिरी
 
एकीकडे बिहारच्या विधानसभा पोटनिवडणुकीत यश मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतरही दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी त्यांच्या जनसुराज पक्षाच्या अमेरिकी ‘चॅप्टर’चा नुकताच व्हर्च्युअल शुभारंभ केला. त्यामुळे बिहारमध्येही पुरेसा जनाधार मिळालेला नसताना प्रशांत किशोर यांनी थेट अमेरिकेतील बिहारी नागरिकांना साद घातली आहे. बिहारी नागरिकांना संबोधित करताना किशोर यांनी बिहारमधील समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. तसेच बिहार हे अजूनही ‘फेल्ड स्टेट’ म्हणून का गणले जाते, त्यावरही किशोर यांनी ऊहापोह केला. एवढ्यावरच न थांबता, अमेरिकेतील बिहारी नागरिक राज्यासाठी काहीएक करीत नसल्याचा स्पष्ट आरोप करायलाही किशोर यांनी मागेपुढे पाहिले नाही. जनसुराज पक्षाचा अमेरिकी ‘चॅप्टर’ सुरू करण्यामागेही प्रशांत किशोर यांची एक पद्धतशीर रणनीती दिसते. अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या सुशिक्षित बिहारींची संख्याही तुलनेने मोठी आहे. त्यांच्याही तिथे संघटना वगैरे असून, त्या माध्यमातून बिहार दिवस, अन्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तेव्हा, या वर्गाला संबोधित करून त्यांचे समर्थन मिळविण्याचा किशोर यांनी प्रयत्न केलेला दिसतो. अमेरिकेतील या बिहारी नागरिकांकडून आपल्या पक्षाला केवळ समर्थन नव्हे, तर निधीही देणगी स्वरुपात मिळावा, ही त्यामागची किशोर यांची सुप्त इच्छा असावी. आता अमेरिकी-बिहारींची मने जिंकण्यात ‘पीके’ कितपत यशस्वी होतात, हे भविष्यात दिसून येईलच. पण, तूर्तास किशोर यांनी पुढील वर्षी होणार्‍या बिहार विधानसभेच्या निवडणुकांना गांभीर्याने घेतलेले दिसते. म्हणूनच मागील दोन-अडीच वर्षांपासून ते बिहारच्या गावागावांत स्थानिकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधताना दिसतात. पण, पुढील वर्षी होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता आणण्याचे लक्ष्य किशोर यांनी वेळोवेळी बोलून दाखवले आहे. पण, बिहारमध्ये तळागाळात मांड ठोकलेल्या जदयु, राजद आणि विस्तारलेल्या भाजपसमोर किशोर यांचा कितपत निभाव लागेल, हे येणारा काळच ठरवेल. तरी तूर्तास रणनीतीकार असलेल्या किशोरांची ही अमेरिकी ‘चॅप्टर’गिरी त्यांना आगामी राजकीय वाटचालीत किती साथ देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची