धर्मशील शेतकरी

    25-Nov-2024   
Total Views |
 
MANSA
 
शेतकर्‍यांच्या केळीला त्याच्या प्रतीनुसार योग्य भाव देत पंधरा दिवसांच्या आत त्यांचा मोबदला मिळवून देणार्‍या प्रमोद यशवंत नेमाडे यांच्याविषयी..
 
प्रमोद यांचा जन्म ४ सप्टेंबर १९६३ रोजी यावल येथे झाला. वडील यशवंत हे नामांकित शेतकरी होते व आई सुशीला या गृहिणी होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात वडिलांनी शेतीचे तर आईने संस्कार संपन्नतेचे बीज पेरले. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरवले. वडिलोपार्जित जमीन व संपन्न शेती व्यवसायाची जबाबदारी नकळतपणे, प्रमोद यांच्यावर आली. आईवडिलांचा अविरत कष्टाचा शेती वारसा पुढे अव्यहातपणे चालू ठेवण्यासाठी, त्यांनी बारावी नंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणाला कायमचा रामराम ठोकून ते शेती व्यवसायाकडे वळले. त्यांचे ज्येष्ठ बंधू पुण्यात नोकरी करीत होते. तर दुसरे बंधू कौटुंबिक उत्तरदायित्व सांभाळत होते. त्यामुळे साहजिकच प्रमोद वडिलोपार्जित शेतीच्या व्यवसायाकडे वळले. त्यांचे वडील अनेक वर्ष ‘केळी ग्रुप’चे संचलन करत होते. वडिलांच्या पश्चात हा ‘केळी ग्रुप’ त्यांनी सांभाळायला सुरूवात केली. १९८२ ते २००५ त्यांचे मामा निळकंठ महाजन यांचे ही या कामात सहकार्य लाभले. त्यानंतर २००५ सालापासून हा ‘केळी ग्रुप’ त्यांनी, स्वत: सांभाळण्यास सुरूवात केली. गेली ४२ वर्षे ते या व्यवसायात अविरत कार्यरत असून, आपल्या प्रामाणिक आणि तत्पर कार्यशैलीमुळे व सचोटीच्या व्यवहारामुळे जनमानसात अत्यंत लोकप्रिय असून, विश्वासार्ह नावलैकिक त्यांनी मिळविला आहे. शेतकर्‍यांच्या केळीला त्याच्या प्रतीनुसार योग्य भाव देत असल्याने, ते सर्वांच्या मनात घर करून आहेत. त्यांचा ‘केळी ग्रुप’ शेतकर्‍यांना पंधरा दिवसाच्या आत केळीचा मोबदला प्रदान करणारा व विश्वासार्ह सेवाव्रत चालवणारा, यावलमधील एक मात्र ‘केळी ग्रुप’ आहे. याबरोबरच शेतीच्या व्यवसायातून मिळणार्‍या कमाईतून व शुध्द नफ्यातून नवनवीन भूमीक्षेत्र संपादन केले. तसेच परिसरातील अन्य लोकांची शेती नफा मिळवून देणारी केल्याने, या पद्धतीचा त्यांना व इतरांना खूपच लाभ झाला. हे कार्य करताना त्यांना पाणी समस्येसाठी खूप संघर्ष करावा लागला. पण, हरित विकासाचा ध्यास घेतलेल्या प्रमोद यांनी, त्यावर सुद्धा मात करून आपले उद्दिष्ट सफल केले. शेतीत केळी व कापूस ही मुख्य उत्पादने आणि त्याबरोबर ज्वारी, हरभरा, गहू, मका ही जोड उत्पादने ते घेत असतात. प्रमोद व त्यांचे कनिष्ठ बंधू नित्यनियमाने शेतात जातात. वेळोवेळी पिकावर फवारणी, शेतीची मशागत करण्यासाठी लहान ट्रॅक्टरचा वापर, आधुनिक पद्धतीने शेतीचे नियोजन ते करित असतात. आजमितीस त्यांच्या शेतामध्ये माणसांचा दैनंदिन राबता आहे. त्यांच्याकडे कामगार म्हणून न पाहता, त्यांचे ते एक व्यावसायिक कुटुंब आहे. त्या लोकांच्या कुटुंबांचे अर्थार्जन आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी ते अविरत झटत असतात.
 
वडिलांकडून मिळालेला सामाजिकतेचा वारसा प्रमोद यांनी जपला आहे. गुरूदत्त ‘केळी ग्रुप’चे संस्थापक, संयोजक, आयोजक या नात्याने, शेतकरी आणि गावकर्‍याचे हित ते जपत आहेत. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा बिगर शेती पुरवठा मर्यादित यावल संचालक, शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळा-उपाध्यक्ष, प्राथामिक शाळा यावल-उपाध्यक्ष, स्वामीनारायण मंदिर यावल संचालक, विठ्ठल मंदिर यावल-अध्यक्ष, मनूमंदिर यावल-संचालक अशा विविध संस्थांच्या माध्यमातून, समाजसेवेचे व्रत ते जपत असतात. त्यांच्या प्रगल्भ ज्ञानाचा अनुभव संपन्नतेचा लाभ या संस्थांना सातत्याने होत असतो. कर्तृत्व आणि दातृत्व यांचा सुरेख संगम त्यांच्या ठायी आहे.
 
यावलचे स्वामीनारायण मंदिर व महाजन गल्लीतील विठ्ठल मंदिर या दोन्ही वास्तूच्या निर्मिती कार्यात, त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यावल येथील हनुमान मंदिर त्यांनी स्वखर्चाने बांधून, त्यात रामभक्त श्री हनुमानाची प्राणप्रतिष्ठा करून ते लोकार्पित केले आहे. महादेव मंदिराच्या उभारणीसाठी लोकवर्गणी जमा केली आणि कमी पडलेल्या निधीचे स्वत: आयोजन करून, ते कार्य ही संपन्न केले. यावल स्मशानभूमीत अल्प दरात लाकूड उपलब्ध करून देणे, वजनापेक्षा योग्य त्या प्रमाणात लाकूड उपलब्ध करून देणे, तेथील कामगाराचा पगार देणे, स्मशानभूमीत बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करून देणे ही कामे प्रमोद यांनी केली. एवढेच नाही, तर यावल परिसरातील अध्यात्मिक कार्य सदैव कार्यरत राहण्यासाठी ते स्वत: भागवत व इतर सप्ताह अशा धार्मिक कार्याचे आयोजन करित असतात.
 
मिनाक्षी यांच्यासोबत त्यांचा २ एप्रिल १९८६ रोजी विवाह झाला. त्यानंतर पत्नीने ही त्यांना व्यवसायात साथ दिली. ज्येष्ठ सुपुत्र स्वप्नील त्यांची पत्नी मिनल आणि सुकन्या निकिता यांच्या प्रेमळ सहकार्य आणि सहर्ष पाठिंबा मिळाल्याने, आपण आपली ध्यासपूर्ती करू शकलो असे ते आवर्जून सांगतात. ओम, अथर्व, आणि मिहिरा ही नातवंडे आणि जावई चैतन्य या सर्वांसोबत आनंदाने कौटुंबिक जीवनाचा आनंद ते घेत आहेत. प्रमोद यांना अनेक सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे. स्वामीनारायण मंदिर तसेच जैन इरिगेशन,जळगाव तर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना, सन्मानित करण्यात आले आहे. काळी माती आणि हिरवीगार केळी ही जीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या प्रमोद यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.