सावधान, रझाकारांचे वारसदार महाराष्ट्रात पाय रोवत आहेत!
‘एमआयएम’च्या जागा घटल्या, मतदान वाढले
24-Nov-2024
Total Views | 59
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले असून त्यामध्ये महायुतीने निर्भेळ यश संपादन केले आहे. लोकसभेतील निवडणुकांमध्ये ‘व्होट जिहाद’चा मुद्दा अग्रणी होता. ठिकठिकाणी मुस्लीम मतदार करत असलेल्या एकगठ्ठा मतदानाचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता. या पार्श्वभूमीवर अनेकदा हिंदुंविरोधात वादग्रस्त विधाने करत मुस्लीम मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणार्या ‘ऑल इंडिया-मजलीस-ए-इतेहाद्दुल-मुसलमिन’ अर्थात ‘एमआयएम’च्या ( MIM ) कामगिरीकडेही लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातून ‘एमआयएम’च्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा अवघ्या ७५ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी ‘इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र’ पक्षाच्या असिफ शेख रशिद यांचा पराभव केला. या निवडणुकीत महाराष्ट्रातील ‘एमआयएम’चा चेहरा असलेल्या इम्तियाज जलील यांनाही छत्रपती संभाजीनमगर पूर्व मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या अतुल सावे यांनी २ हजार, १६१ मतांनी त्यांचा पराभव केला. या निवडणुकीमध्ये ‘एमआयएम’ला कामगिरीमध्ये सातत्य राखता आलेले नाही. पण, कमी जागांवर निवडणूक लढवूनही ‘एमआयएम’च्या मतदानामध्ये वाढ झाली आहे. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ४४ ठिकाणी जागा लढवून ‘एमआयएम’ला मिळालेल्या एकूण मतांची संख्या होती ७ लाख, ३७ हजार, ८८८, तर यंदाच्या निवडणुकीत गेल्या विधानसभेच्या तुलनेत कमी म्हणजेच १६ जागा लढवूनदेखील ‘एमआयएम’ला ५ लाख, ४९ हजार, ४४३ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत ‘एमआयएम’ला मिळालेली पाच लाखांच्या आसपासची मते ‘व्होट जिहाद’चे वास्तव मांडण्यास पुरेशी म्हणता येतील.
विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानाचा फायदा लाटण्याच्या उद्देशाने, हिंदूविरोधी गरळ ओकणार्या असदुद्दीन ओवेसी यांनीही प्रचारादरम्यान १५ मिनिटांच्या धमकीचा पुनरुच्चार केला, तर त्यांचे बंधू अकबरुद्दीन यांनीही मनगटी घड्याळ दाखवत हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ध्रुवीकरण होऊन मुस्लीम मतदार संघटित होऊन आपल्या मागे उभी राहतील, हा ओवेसी बंधूंचा आशावाद होता. मात्र, १५ मिनिटांच्या दिलेल्या धमकीवरून देवेंद्र फडणवीसांनी आक्रमकपणे ओवेसी बंधूंना शिंगावर घेतले होते. तसेच सज्जाद नोमानीने एकगठ्ठा मुस्लीम मतांचे आवाहन केल्यानंतर, फडणवीसांनी त्याविरोधात हिंदूंना मतांच्या धर्मयुद्धासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे भाजपच्या मतपेटीवरच याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून एकंदरच मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येते. असे असले तरीही ‘एमआयएम’च्या बाबतीत देशभर ‘ना घर का ना घाट का’ अशी स्थिती कायम आहे. ‘मुस्लिमांचा कैवारी’ होऊ पाहणार्या ‘एमआयएम’ला अजूनही देशातील धर्माच्या नावावर मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. अजूनही सगळेच भारतीय मुस्लीम ‘उम्मा’च्या नावाने ओवेसींच्या मागे उभे न राहता, ते भाजपच्या विरोधात काँग्रेसचीच निवड करतात, असे आजवरचे चित्र आहे. पण, हे किती दिवस, हाच खरा प्रश्न. आज ना उद्या यात बदल होईल. हा बदल करण्यासाठीच हिंदुंविरोधात आक्रमक भाषेचा वापर करून मुस्लीम मतपेढी आपल्यामागे उभे करण्याचे प्रयत्न ओवेसी यांनी केलेले दिसतात. एकूणच, त्यांच्या प्रयत्नांना काही अंशी यश आले असल्याचे चित्र राज्यात आहे.