मुंबई : वेगाने होणार्या हवामान बदलाच्या परिस्थितीचा लहान मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होणार असल्याचे ‘युनिसेफ’ने ( Unicef ) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा होणारा परिणाम टाळण्यासाठी तत्काळ कृती करण्याची आवश्यकतादेखील त्या अहवालाने नमूद केली आहे.
जागतिक बालदिनाचे औचित्य साधून ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन २०२४’ या अहवालाचे प्रकाशन ‘युनिसेफ’ने केले. त्यामध्ये जागतिक हवामान बदलाचे बालकांवर होणारे परिणाम याचा २०५० पर्यंत आढावा घेण्यात आला आहे. हवामानातील बदलाप्रमाणे जागतिक लोकसंख्येत होणारे बदल, पर्यावरणीय संकट आणि सुरू असलेल्या तांत्रिक प्रगतीचा मुलांच्या वाढीवर कसा परिणाम होईल, यावर या अहवालामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. मुलांना भेडसावणार्या सर्व समस्यांचे स्वरुप आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाजदेखील या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान बदलाचे संकट आधीच गंभीर असून, २०२३ हे ‘आजवरचे सर्वात उष्ण वर्ष’ म्हणून नोंदवले गेले आहे. २०५० ते २०५९ या दशकात हवामान आणि पर्यावरणीय संकटे आणखी व्यापक होतील, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत अतिउष्णतेची लाट, नदीची वाढलेली पातळी, दुप्पट झालेली वणव्यांची संख्या यांचा आजच्या संख्येपेक्षा आठपट जास्त मुलांवर प्रभाव पडणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, या अहवालामध्ये तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा असमतोलदेखील अधोरेखित करण्यात आला आहे. काही देशांमध्ये इंटरनेट कनेक्टिविटी ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, काही देशांमध्ये त्याचा प्रसार निम्म्या लोकसंख्येपर्यंतदेखील झालेला नाही. त्यामुळे लहान मुलांच्या विकासामध्ये या असमतोलाचा फटका बसत असल्याचेदेखील अहवालामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ याचा अतिरेकदेखील लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करत असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.