ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघात एकूण ५६.०५ टक्के मतदान झाले. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात जेमतेम ५० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या खेपेला वाढता टक्का भाजप महायुतीच्या ( Mahayuti ) पथ्यावर पडणार असल्याचा अंदाज राजकीय धुरीण व्यक्त करीत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवरील निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची आहे. सर्वाधिक दहा जागांवर भाजपची लढत मविआतील घटक पक्षांविरुद्ध होत आहे. तर पाच ठिकाणी मनसेही रिंगणात असल्याने लढती रंगतदार झाल्या आहेत.
१८ विधानसभा मतदारसंघात एकूण २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये १७ विद्यमान आमदार तर एका ठिकाणी विद्यमान आमदाराच्या सौभाग्यवती आहेत. दि. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात सर्वाधिक ६९.०१ टक्के मतदान भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात झाले. तर सर्वात कमी ४७.७५ टवके मतदान अंबरनाथ मतदारसंघात झाले आहे. २०१९ सालच्या तुलनेत सहा टक्के मतदान अधिक झाले आहे.
दरम्यान, विद्यमान महायुती सरकारने राबविलेल्या ‘लाडकी बहीण’ तसेच विविध लोकोपयोगी योजनांमुळे मतदार महायुतीच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील मतांचा वाढीव टक्का भाजप महायुतीच्या पथ्यावर पडणार असल्याची शक्यता राजकीय धुरीण व्यक्त करीत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील विधानसभानिहाय टक्केवारी
भिवंडी ग्रामीण - ६९.०१
शहापूर - ६८.३२
भिवंडी पश्चिम - ५४.१
भिवंडी पूर्व - ४९.२
कल्याण पश्चिम - ५४.७५
मुरबाड - ६४.९२
अंबरनाथ - ४७.७५
उल्हासनगर - ५४
कल्याण पूर्व - ५८.५०
डोंबिवली - ५६.१९
कल्याण ग्रामीण - ५७.८१
मिरा-भाईंदर - ५१.७६
ओवळा माजिवडा - ५२.२५
कोपरी पाचपाखाडी - ५९.८५
ठाणे - ५९.०१
मुंब्रा कळवा - ५२.०१
ऐरोली - ५१.५