आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाकडून इस्रायली पंतप्रधान नेतन्याहूंविरोधात अटक वॉरंट जारी!
22-Nov-2024
Total Views | 86
जेरुसलेम : (Israel) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट तसेच हमासच्या लष्करी कमांड यांच्याविरोधात युद्ध आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी हेग स्थित इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी अटक वॉरंट जारी केले आहे.
एकीकडे इस्रायलचे युद्ध अद्यापही थांबलेले नसताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कोर्टाने नेतान्याहू आणि गॅलेंट यांच्यावर मानवतेच्या विरुद्ध वागल्याचा आरोप लावला आहे. त्यात हत्या, शोषण आणि अमानवीय कृत्याचा दाखला दिला आहे. इस्रायलने गाझापट्टीत युद्धकाळात सामान्य नागरिकांना अन्न, पाणी, वैद्यकीय सहायता अशा मुलभूत गोष्टींपासून ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि संकटांना सामोरे जावे लागल्याचे आरोप केले आहेत. यात लहान मुलांचा मृत्यू आणि मानवीय त्रासाचे पुरावे आढळल्याचे कोर्टाने नमूद केले आहे.
आयसीसीच्या अहवालानुसार, नेतान्याहू यांनी जाणूनबुजून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य बनविले, याबाबतचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. दरम्यान, गाझातील युद्धबंदीबाबत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत पॅलेस्टाईनमध्ये युद्ध संपत नाही तोपर्यंत इस्रायल सोबत ओलीस नागरिकांची अदलाबदल करण्याचा कोणताही सामंजस्य करार होणार नसल्याचे हमासचे कार्यवाहक गाझा प्रमुख खलील अल-हय्या यांनी स्पष्ट केले आहे.