कला, संस्कृती, क्रीडा या क्षेत्रात काहीतरी वेगळे करायचे या भावनेतून नाशिकमधील समविचारी लोकांनी एकत्र येत २०१८ साली आयाम, नाशिकची स्थापना केली. आयाम नाशिकच्या माध्यमातून आजपर्यंत विविध विषयांवर कार्यक्रम झाले. ज्याचे मूळ कायम भारतीयत्व, भारतीय संस्कृती, आपला इतिहास असेच होते. माध्यम अनेक असले तरीही राष्ट्रप्रथम हे एकमेव सूत्र. पुढील महिन्यात ‘गोदावरी संवाद’ ( Godavari Sanvad ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत आयामच्या विविध उपक्रमांसह ‘गोदावरी संवाद’ कार्यक्रमाविषयीची माहिती...
आम्हाला हे सांगताना आनंद होतो की, आयाम नाशिकच्या कार्यक्रमांना नाशिककरांनी कायम भरभरून प्रतिसाद दिला. आयाम ‘अक्षरबाग-वाचनकट्टा’ ज्यामध्ये विविध दर्जेदार पुस्तकांचे अभिवाचन करण्यात येते, ते वाचन संस्कृतीला बळ देणारे ठरले. आयाम ‘अक्षरबाग वाचन कट्टा’ हा कार्यक्रम फक्त नाशिकपुरता मर्यादित न राहता, त्याचे प्रयोग संगमनेर, पुणे, मुंबई आणि दुबई अशा ठिकाणी झाले. आयाम-जागर हा कार्यक्रम प्रत्येक भारतीय नागरिकाची वैचारिक भूक भागविण्याचा उद्देश ठेऊन आखला आहे. आयाम जागरच्या माध्यमातून डॉ. आनंद नाडकर्णी यांची प्रसिद्ध ‘ढहश ॠेश्रवशप कशीळींरसश’ ही व्याख्यानमाला नाशिककरांच्या विशेष पसंतीस उतरली, त्याचबरोबर तत्कालीन बहुचर्चित विषयसुद्धा आयाम जागरच्या मंचावरून वेळोवेळी सादर झालेत. उदाहरणादाखल सीएएवर सुनील देवधर यांचे व्याख्यान. आयाम-मंथन हाही असाच एक मंच आयामने नाशिककरांसाठी उपलब्ध करून दिला. ज्याच्या माध्यमातून विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातात. आयाम दुर्ग-दुर्गा हा आयाम नाशिकचा अनोखा उपक्रम नाशिककर महिलांसाठी आहे. महिलांनी घराबाहेर पडून आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्यावे यासाठी महिलांनी महिलांसाठी चालविलेली ही दुर्गरोहणाची चळवळ आहे. या उपक्रमात सुमारे ७००-८०० महिला एकत्रित जोडल्या गेल्यात. विविध ट्रेकच्या माध्यमातून महिलांनी आपले शारीरिकच नाही, तर मानसिक स्वास्थ्यही कमावले असे दिसून आले. या उपक्रमांच्या मांदियाळीत मागच्या वर्षीपासून नाशिककरांसाठी नाशिकचा स्वतःचा लिटफेस्ट सुरू करण्याचा मानसुद्धा आयाम नाशिकने पटकावला आहे.
‘गोदावरी संवाद’च्या माध्यमातून राष्ट्रप्रथम ही संकल्पना मूळाशी ठेवून वेगवेगळ्या सत्रांमधून, भारतीय संस्कृती, भारतीय स्त्री, भारतीय साहित्य, भारतीय इतिहास, आणि भारताची भविष्यातील वाटचाल असे सगळे विषय एकदिवसीय कार्यक्रमात चर्चिले जातात. उत्तर महाराष्ट्रातील ही पहिली वैचारिक चळवळ आयाम नाशिकने उभी केली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. समाजमाध्यमातून विविध स्तरांवरून लादल्या जाणार्या वेगवेगळ्या विचारांची पुट घेऊन आपली तरुण पिढी गोंधळात आहे. तर, भारतीय नागरिक आपले भारतीयत्व धोक्यात आहे का, ही शंका उपस्थित करतो. आयाम नाशिक या आणि अशा प्रस्थापित होऊ पाहणार्या खोट्या विमर्षाचा पर्दाफाश करणे आपली जबाबदारी समजून त्यावर ठोस पाऊले उचलणारी संस्था आहे. समाजात वेगवेगळे विमर्ष (बरेचदा खोटे) स्थापिले जाताना दिसतात. ज्यामुळे येणार्या पिढीची संभ्रम अवस्था निर्माण होताना जाणवते. त्यांच्यापुढे अभ्यासपूर्ण पद्धतीने एखादा विषय मांडणे महत्त्वाचे वाटते. भारताचा इतिहास, सद्य परिस्थिती, भारतासमोरील आव्हाने या सगळ्याविषयीचे अभ्यासपूर्ण विवेचन ठेवणे हा उद्देश ठेवून, तसेच राष्ट्रप्रथम ही संकल्पना मुळाशी ठेवून मागच्या वर्षीपासून ‘गोदावरी संवाद’ हा नाशिकचा पहिला लीटफेस्ट सुरू झाला आणि नाशिकच्या तरुण पिढीला वैचारिक आंदण मिळाले. चर्चा आणि विचारांच्या आदान-प्रदानाचे नवे मापदंड आयाम नाशिकने या माध्यमातून समोर आणले. गोदावरी संवादच्या अगदी पहिल्या वर्षी भारतभरातून राष्ट्रप्रथम याच विचारसरणीचे पाईक आणि नवीन पिढीशी वेगवेगळ्या पातळीवर संवाद साधू शकणार्या अभ्यासकांनी हजेरी लावली. ज्यात प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालय वकील आणि लेखक जे. साई दीपक, अभ्यासक विष्णू जैन, लेखक अभिजित जोग, लेखक आणि सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर शेफालीताई वैद्य, तुषार दामगुडे, लेखक भरत अमदापुरे यांचा समावेश होता. पहिल्याच वर्षीच्या लिटफेस्टमध्ये भारत एक सोच, भारतातील मंदिरांची तोडफोड-कारण मीमांसा, जगाला पोखरणारी डावी वाळवी, ‘वक्फ बोर्ड’ असे सगळे विषय माहितीपूर्ण पद्धतीने मांडले गेले. ही सगळी सत्रे कुठल्याही पद्धतीने निर्णय लादणारी नसून ती विचारधन पुरविणारी ठरली.
‘गोदावरी संवाद’ या लिटफेस्टचे दुसरे आकर्षण म्हणजे या माध्यमातून दिला जाणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान.’ सावरकरांचे विविध पैलू जसे की साहित्य, विज्ञान, अस्पृश्यता निवारण, देशाभिमान, देशसेवा, समाजसेवा अशा सगळ्यात जीव ओतून काम करणार्या एका भारतीय व्यक्तीला हा सन्मान देण्याचा संकल्प आयाम नाशिकने अगदी पहिल्या ‘गोदावरी संवादा’पासून केला. आयाम नाशिक मार्फत पहिला ‘सावरकर सन्मान’ लेफ्ट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांना भारतीय सुरक्षा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला. याही वर्षी ‘सावरकर सन्मान’ गोदावरी संवादचा आकर्षण बिंदू ठरणार याची आयाम नाशिकच्या विश्वस्तांना खात्री वाटते.
सोनाली तेलंग
दि. ८ डिसेंबरची तारीख आजच राखून ठेवावी...
विचारांचे पाठबळ हे समाजाच्या विशेषतः नवीन पिढीच्या समोर सगळ्या तथ्यांसह आणि त्याच्या अभ्यासक मंडळी मार्फत मांडणे ही आपली सामाजिक जबाबदारी आयाम नाशिक अशीच कायम ठेवणार. याही वर्षी रुबिका लियाकत, लेखिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर शेफालीताई वैद्य, लेखक अभिजित जोग, आनंद नरसिंम्हन, लेखक, इतिहास अभ्यासक विक्रम संपत, ओंकार दाभाडकर, लेखक व अभिनेते दिपक करंजीकर आणि आशिष सोनावणे अशा विविध क्षेत्रातील दिग्गज अभ्यासक मंडळी वेगवेगळ्या विषयांवर आपले अभ्यासपूर्ण मत सगळ्यांसमोर ठेवणार आहे. आयाम नाशिकमार्फत नाशिककरांना आवाहन आहे की, त्यांनी दि. ८ डिसेंबर २०२४ ही तारीख ‘गोदावरी संवाद’ कार्यक्रमासाठी आजच राखून ठेवावी.