डोंबिवली : गत निवडणुकीपेक्षा यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानात थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मतदानाचा ( Dombivli Voting ) वाढलेला टक्का हा महायुतीच्या पथ्यावर पडणार आहे, अशी चर्चा शहरात जागोजागी सुरू झाली आहे.
नागरिक मतदानासाठी फारसे बाहेर पडत नाहीत, अशी ओरड नेहमीच मतदारांच्याबाबत होत असते. त्यातूनही काही मतदार मतदानासाठी जातात. मात्र, मतदार यादीत होणारा घोळ, यामुळे त्यांना अनेकदा मतदानाचा हक्क बजावता येत नाही. परिणामी, मतदानाचा टक्का घसरलेला दिसतो. मात्र, यंदा विधानसभा मतदारसंघात उलटे चित्र दिसून आले आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागांपेक्षा अधिक सुशिक्षित मतदारांचे प्रमाण कल्याण-डोंबिवलीत आहे. असे असताना गेल्या दशकभरात झालेल्या निवडणुकांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील मतदानाच्या आकडेवारीने सतत कच खाल्ल्याचे चित्र होते. महाराष्ट्राच्या सर्वात ग्रामीण, दुर्गम भाग अशी ओळख असणार्या गडचिरोलीमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक मतदान होते, तर आपल्याकडे जेमतेम ४० टक्के मतदान होते. इतकी उदासीनता मतदानाबाबत इथल्या मतदारांमध्ये असल्याने साहजिकच निवडणूक आयोगाला ही बाब खटकत होती.
मतदानाचा हा खालावलेला टक्का वाढवण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे प्रयत्न केले. त्याचीच पुनरावृत्ती किंवा त्यापेक्षा अधिक प्रयत्न या विधानसभा निवडणुकीत झालेले पाहायला मिळाले. मतदार राजानेही अखेर आपल्या लोकशाहीने दिलेल्या सर्वात मोठ्या अधिकाराला जागत आपली भूमिका चोख बजावली. त्यामुळेच तर सर्वाधिक सुशिक्षित मतदार असूनही मतदानामध्ये सर्वात मागे, असा माथी बसलेला शिक्का पुसून काढण्यात मतदार यशस्वी झाले आहेत.
निवडणूक यंत्रणांच्या एकत्रित कामाचा परिणाम
कल्याण डोंबिवलीतील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा ११.५७ टक्के, कल्याण पूर्वमध्ये १४.९७ टक्के, डोंबिवलीमध्ये सर्वाधिक म्हणजे १५.४७ टक्के आणि कल्याण ग्रामीणमध्ये ११.४५ टक्के इतकी वाढ यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा ‘स्वीप’ नोडल अधिकारी संजय जाधव यांनी दिली. निवडणूक यंत्रणांच्या एकत्रित कामाचा आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम असल्याचेही ते म्हणाले.
कल्याण-डोंबिवलीत यामुळे वाढला मतदानाचा टक्का
लोकसभा निवडणुकीत नावे नसलेल्या मतदारांची शासन, राजकीय प्रतिनिधी यांच्याकडून झालेली परिणामकारक मतदार नोंदणी, महाविद्यालयीन नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेली नोंदणी, मतदान केंद्रांवर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘अॅशुअर्ड मिनिमम फॅसिलिटीज’ मतदान वाढीसाठी राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाच्या ‘स्वीप’ यंत्रणेकडून दीड-दोन महिन्यांपासून झालेली नियोजनबद्ध प्रभावी जनजागृती, मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी देण्यात आलेला क्यूआर कोडचा आधार, यंदा पहिल्यांदाच मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये उभारण्यात आलेली मतदान केंद्रे, या सर्व कारणांमुळे कल्याण-डोंबिवलीतील मतदानाची आकडेवारी वाढण्यास मदत झाली असली तरी टीमवर्क शिवाय ही गोष्ट साध्य करणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा ‘स्वीप’ नोडल अधिकारी संजय जाधव यांनी दिली.