55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अर्थात ‘इफ्फी’ला दि. 20 नोव्हेंबर रोजी दिमाखात सुरुवात झाली असून, या महोत्सवात देशविदेशातील चित्रपटांची मेजवानी चित्रपटप्रेमींना अनुभवायला मिळते आहेच. सोबतच गोव्यातील पारंपरिक संस्कृतीदेखील जपण्याचा विशेष प्रयत्न गोवा सरकारने या महोत्सवात केलेला दिसतो. त्याअंतर्गत शतकानुशतकांची परंपरा असलेले कुणबी कापडाचे आणि इकोफ्रेंडली आकाशकंदिलांचे स्टॉल्स हे लक्षवेधी ठरावे. ‘इफ्फी’ महोत्सवात अशाच कला जगभरातून आलेल्या अतिथींपर्यंत पोहोचविण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. त्याचा थोडक्यात घेतलेला आढावा...
गोव्यातील पर्यटन ते खाद्यसंस्कृती कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. मात्र, काळाच्या ओघात, तंत्रज्ञानाच्या जगात हरवलेल्या गोव्याच्या पारंपरिक कला जपण्याचा प्रयत्न गोव्यातील नागरिक सरकारच्या साहाय्याने करत आहेत.
गोव्याची पारंपरिक शैलीतील प्रसिद्ध ‘कुणबी साडी’ ही गोव्यातील कुणबी जमातीशी संबंधित, गोव्याचे मूळ रहिवासी असलेल्या कुणबी आणि गावडा जमातीमधील स्त्रिया परिधान करतात. हे कापड शतकानुशतके जुने. अगदी पोर्तुगीजांच्या आगमनापूर्वीही ते अस्तित्वात होते आणि याच कापडाला पुन्हा 21व्या शतकात विविध पद्धतीने वापरात आणण्याचा प्रयत्न गोव्यातील कलाकार करत आहेत. कुणबी कापडाचा वापर करून 102 मीटर साडी तयार करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे करणार्या इर्शाद खान यांनी गोव्याची संस्कृती भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. तसेच, महिलांना रोजगार मिळवून देण्याचा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर त्यांना आत्मनिर्भर करण्याचे कामही इर्शाद या व्यवसायातून करत आहेत.
“गोव्यातील जुने कापड कुणबी आता काळाच्या पडद्याआड जात असल्यामुळे लोकांना पुन्हा एकदा त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. कुणबी या कापडापासून आम्ही साड्या तयार करतो, ज्यात कॉटन आणि सिल्कच्या साड्या या कापडाच्या साहाय्याने तयार केल्या जातात. शिवाय, या साड्या १५पेक्षा अधिक महिला हाताने तयार करत असून यातून त्यांना उत्तम रोजगाराची संधीदेखील गोवा सरकारने देऊ केली आहे, असे इर्शाद यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
गोव्याचा इतिहास आणि परंपरा जपण्यासाठी गोवा सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जुन्या सरकारी शाळांमध्ये शासनाच्या हस्तकला विभागातर्फे महिलांना हस्तकला, विणकाम शिकवण्या सुरू केल्या आहेत. कुणबी जे मूळ गोव्याचे फ्रॅब्रिक आहे, ते पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्वरुपात ‘कुणबी गोवा’ या ब्रॅण्डने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कुणबी या फॅब्रिकचा वापर करत साड्या, शाल, ब्लाऊज, स्कार्फ बनवले जात असून गोव्याचा निसर्ग, संस्कृती, क्रोशे विणकाम, स्त्रिया जुन्या काळात वापरत असणारी पारंपरिक भांडी हे सारे काही चित्रांच्या माध्यमातून तयार करून त्यावर कुणबी कापड लावून फ्रेमदेखील तयार केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर मॉर्डन पद्धतीचे दागिनेदेखील या फॅब्रिकच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत.
इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेतून साकारली गोव्याची परंपरा
तसेच, ‘इफ्फी’ महोत्सवात ‘एन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा’च्यावतीने आकाशकंदिलांची स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली असून, यंदा या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. या स्पर्धेची संकल्पना ‘इकोफ्रेंडली कंदील’ अशी असून गोव्यातील प्रत्येक नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. या आकाशकंदील स्पर्धेत गोव्याची संस्कृती, परंपरा, सामाजिक एकता या सगळ्या आयामांचे दर्शन घडवणे हा उद्देश होता. दरम्यान, स्पर्धकांनी बांबू, लाकूड, धान्य, शंख अशा अनेक इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर करत आकर्षक कंदील तयार केले होते. एका स्पर्धकाने गोव्यातील लहराई देवीच्या जत्रेची झलक कंदिलातून मांडली होती. ज्यात त्यांनी शंख, शिंपले, बांबू, लाकूड, कडधान्य, धान्य, कापूस यांचा वापर करून संपूर्ण जत्रा कशी असते, ते दाखवले होते, तर दुसर्या स्पर्धकाने बांबू आणि कागदाचा वापर करून विष्णू देवाचे मंदिर कंदील स्वरुपात उभारले होते, तर आणखी एका स्पर्धकाने शंख-शिंपल्यांच्या मदतीने प्रभू श्री राम, हनुमान, अयोध्या यांच्या प्रतिकृती तयार करत अप्रतिम कंदील बनवले होते.
कुणबी फॅब्रिक परदेशाचा पोहोचविण्याचा निर्धार
गोव्यातील लोप पावत गेलेल्या कुणबी फॅब्रिकच्या नावे मी ‘कुणबी गोवा’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. कुणबी ही गोव्याची शान देशासह परदेशात पोहोचविण्याचा आमचा निर्धार असून त्यासाठी ‘इफ्फी’ हा महोत्सव आणि गोवा सरकारची मदत अत्यंत महत्त्वाची असून मी त्यांची आभारी आहे.
-स्नेहा नाईक, प्रोपरायटर, कुणबी गोवा
कारागिरांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न
‘शिखा कारीगरी’ या ब्रॅण्डच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार फॅब्रिकवर विविध चित्रांच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय, आदिवासी चित्रकला आम्ही जपण्याचा प्रयत्न करत असून ‘पिछवाई’, ‘मधुबनी’, ‘पट्टचित्र’ या कला ज्या कारागिरांना येतात, त्यांना आम्ही व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करत आहोत. - शिखा अजमेरा, फाऊंडर,
शिखा कारीगरी