मुंबई : बहुचर्चित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा जवळ आला आहे. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी राज्यभरात एकाच टप्प्यात मतदानप्रक्रिया ( Voting ) पार पडणार असून, २८८ मतदारसंघातील ४ हजार, १३६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तुष्टीकरणाचे राजकारण करून महाराष्ट्राची घडी विस्कटण्याचा प्रयत्न करणार्यांना धडा शिकवण्याची संधी.
अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद घोरी यांसारख्या आक्रांतांनी भारतावर आक्रमणं करून अनेक मंदिरे तोडली, भारताचे तुकडे केले. त्यांतून पाकिस्तान-बांगलादेश निर्माण झाले. हा धोका लक्षात घेऊन हिंदूंनी जातीभेद, विषमता, उमेदवाराची जात न पाहता भारताचे हित, हिंदू समाजाचे हित पाहून मतदान करावे. लोकसभा निवडणुकीदरम्यान इस्लामी संघटनांनी एकगठ्ठा मतदान केल्याने हिंदूंचा पराभव झाला. याखेपेला भेद विसरून १०० टक्के मतदान भारताचे हित पाहून करणे आवश्यक आहे.
‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक राज्यासाठी तर महत्त्वाची आहेच, परंतु त्याचा देशावरही तितकाच परिणाम होणार आहे. देशविरोधी शक्ती महाराष्ट्र आणि भारत देश दुबळा व्हावा, यासाठी मागे लागल्या आहेत. हे जर व्हायला नको असेल, तर महाराष्ट्र आणि भारताच्या बळकटीसाठी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. हा सुटीचा दिवस नाही. आपण बेसावध राहिलो, असंघटित राहिलो, तर भारतीय संस्कृतीलाच सुटी मिळायची वेळ येईल. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी १०० टक्के मतदान आवश्यक आहे.
अविनाश धर्माधिकारी, व्याख्याते आणि माजी सनदी अधिकारी