मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मानव, प्राणी आणि पर्यावरण हे तिन्ही मुख्य घटक एकमेकांवर अवलंबून असून एकमेकांशिवाय या तिन्ही घटकांच्या संवर्धनाचे काम होणार नाही, असे मतं ज्येष्ठ वानरवैज्ञानिक आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीदूत डाॅ. जेन गुडाल यांनी मांडले (Dr. jane goodall). त्या मंगळवार दि. १९ नोव्हेंबर रोजी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बोलत होत्या (Dr. jane goodall). ‘जेन गुडाल इन्स्टीट्यूट-इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’अंतर्गत गुडाल मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. (Dr. jane goodall)
डाॅ. जेन गुडाल या ज्येष्ठ वन्यजीव संशोधिका असून ‘प्रायमेट’ म्हणजेच वानर कुळातील प्राण्यांवर केलेल्या अभ्यासासाठी त्या प्रसिद्ध आहेत. विशेष करून आफ्रिकेत चिम्पांझीविषयी केलेल्या संवर्धन आणि संशोधन कार्यासाठी त्या जगप्रसिद्ध आहेत. २००२ साली संयुक्त राष्ट्र परिषदेने त्यांच्या नावाची घोषणा शांतीदूत म्हणून केली. ९० वर्षीय गुडाल या १६ नोव्हेंबरपासून मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. मंगळवारी त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन वनकर्मचाऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. बिबट्यांसोबत सहजीवन करुन माणूस आणि वन्यजीव कसे एकोप्याने जगू शकतात हे जगाला दाखवणारे मुंबई हे एक प्रमुख उदाहरण आहे. वन्यजीव आणि मानव हे दोघेही पर्यावरणाचे अविभाज्य भाग आहेत आणि दोघांनीही एकमेकांसोबत सहजीवन करणे हा एकमेव मार्ग आहे, असे गुडाल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
तरुण मुलं ही वन्यजीव संवर्धनाचे भविष्य आहे. त्यांनी एकत्र येऊन पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर आपल्या हरित क्षेत्रांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. वातावरण बदलामुळे आपल्या समोर निर्माण झालेल्या गंभीर समस्यांचे निरसन आपण संघटित होऊन करणे, आवश्यक असल्याचे गुडाल यांनी सांगितले. या कार्यक्रमात दै. मुंबई तरुण भारतचे विशेष प्रतिनिधी अक्षय मांडवकर यांनी डाॅ. गुडाल यांना त्यांच्याविषयी केलेल्या वार्तांकनाची फोटो फ्रेम भेट म्हणून दिली.