मुंबई : एकीकडे हिंदुंची मंदिरे ते अगदी सरकारी जमिनींवर दावा करून त्या जमिनी लाटणार्या अन्यायकारी ‘वक्फ बोर्डा’बद्दल ( Waqf Board ) हिंदू समाजातून असंतोष व्यक्त होत आहे. दुसरीकडे पुनर्विकासासाठी पाडलेल्या पुण्यातील एका वस्तीच्या जागेवरच ‘वक्फ बोर्डा’ने दावा केल्याने येथील बेघर कुटुंबांनी आता ‘वक्फ बोर्ड हटाव’चा नारा दिला आहे.
पुनर्विकासासाठी पाडण्यात आलेल्या पुण्यातील वस्तीवर चक्क ‘वक्फ बोर्डा’ने दावा केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. न्यायालयातील या वादामुळे २०१६ पासून ‘झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प’ रखडला असून यात सर्वधर्मीय १३५ कुटुंबांची वाताहत झाली आहे. येथील मुस्लीम रहिवासीच आता ‘वक्फ बोर्ड हटाव’ची मागणी करत असल्याचे नुकत्याच प्रसारित झालेल्या एका व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे.
येथील स्थानिक रहिवासी राजेंद्र तिकोणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कुंभारवाडा परिसरातील ‘पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था’ झोपडपट्टी पुनर्विकासासाठी पाडण्यात आली होती. तेव्हा येथील १३५ कुटुंबांनी नवे घर मिळण्याच्या आशेने इतरत्र स्थलांतर केले. संबंधित मोकळ्या झालेल्या या जागेचा गैरफायदा घेत जमीर शेख नामक एका व्यक्तीने ती जागा ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता असल्याचा न्यायालयीन दावा केला. प्रकरण ‘वक्फ बोर्डा’त असल्याने ना तिथे पुनर्विकास झाला, ना स्थलांतरितांना भाडे मिळाले. त्यामुळे बेघर झालेल्या १३५ कुटुंबांत आज अनेकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर झाल्याचे सांगितले जात आहे.
तिकोणे पुढे म्हणाले की, “शेजारी असलेल्या दर्ग्याचा गैरफायदा घेत ही जागा ‘वक्फ’ची असल्याचा दावा करण्यात आला आहे. दर्ग्यासाठी वजूखाना हवा म्हणून जमीर शेखने जागेवर ‘वक्फ बोर्डा’चा दावा करत १३५ कुटुंबांना बेघर केले आहे. जमीर शेख पूर्वी स्थानिकांच्या बाजूनेच होता. परंतु, आता स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुनर्विकास होऊन घर न मिळाल्याने आतापर्यंत येथील आठ ते नऊजणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.”
न्याय मिळावा इतकीच माफक अपेक्षा
‘वक्फ बोर्ड’ रद्द होऊन आम्हाला आमची घरे मिळावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. गोरगरिबांच्या घरांवर बेकायदा ताबा मिळवून ‘वक्फ बोर्डा’ला काय मिळणार आहे? आम्ही आमच्या वाडवडिलांपासून येथे राहत आहोत. त्यामुळे आमचा कोणीतरी वाली व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा, इतकीच आमची माफक अपेक्षा आहे.
महेंद्र सूर्यवंशी, स्थानिक रहिवासी
‘वक्फ बोर्डा’ने आमची जागा आम्हाला परत द्यावी
गेली १३ वर्षे मी इथे राहत आहे. जर इथे सर्वधर्मीय अनेक वर्षांपासून एकत्रित नांदत असतील, तर घर पाडल्यानंतर ती जागा ‘वक्फ बोर्डा’ने ताब्यात घ्यायचे कारणच काय? इथे सर्वजण हातावर पोट भरणारे लोक आहेत. ‘वक्फ बोर्डा’ने आमची जागा आम्हाला परत द्यावी.