प्राणायाम हे अष्टांगयोगाचे चौथे आणि अतिशय महत्त्वाचे अंग. प्राणायाम केल्याने मन व शरीर शुद्ध राहते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीर कृश राहायला मदत होते. त्वचा तेजस्वी राहते. जठराग्नी प्रदिप्त होऊन भूकही चांगली लागते. अनेक प्राकृतिक फायद्यांसोबतच प्राणायामाचे अध्यात्मिक फायदेपण आहेत, ज्यांचा सप्तचक्र उद्दिपित करण्यासाठी उपयोग होतो.
प्राणायामाचे जेवढे फायदे आहेत, त्यांपेक्षा अधिक चुकीच्या पद्धतीने केल्यास, नुकसान देखील आहे. त्यामुळे प्राणायामाचे तंत्र हे तज्ज्ञ व अनुभवी योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे व अनपेक्षित नुकसान टाळावे.
प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. काही प्राणायाम करत पद्मासनात पाण्यावर तरंगतादेखील येते. पण, त्याचे तंत्र शिकण्यासाठी अनुभवी मार्गदर्शकाची गरज असते. नुसते पुस्तके वाचून प्रमाणपत्र मिळविणारे शिक्षक याबाबत उपयोगी नाहीत, याची खबरदारी घेणे प्राणायाम शिकणार्यांच्या हिताचे ठरते.
‘प्राणायाम’ शब्दाची फोड करताना ‘प्राण अधिक आयाम’ अशी करता येईल. याठिकाणी प्राण म्हणजे श्वास व आयाम म्हणजे ‘कंट्रोल्ड - टोनिंग ऑफ ब्रेथ.’ म्हणजे श्वासाचा अस्पष्टसा शरीराच्या आत स्पर्श. तो कुठे होतो, ते कुठे व्हायला पाहिजे, त्यानुसार प्राणायामाचे नाव व प्रकार व उपयोगिता ठरते.
शरीरातील ज्या भागांत रोग आहे, त्या भागात आयाम नेऊन तो रोग बरा झाल्याचा योगसाधकास म्हणून अनुभव आहे. त्यासाठी विशिष्ट मुद्रा लावून प्राणायाम करणे आवश्यक असते.
उगाचच कठीण करून सांगणे व समोरच्याला घाबरवणे, हा प्राणायाम शिकविणार्यांचा मनसुबा नसावा. आपण या लेखात सोप्या पद्धतीने, सहज जमेल, अशा रितीने समजून घेण्याचा व तंतोतंत तंत्र शिकण्यासाठीचा प्रयत्न करणार आहोत. अशा चार भागांत आपण हा विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पैकी आजच्या भाग पहिल्या हा विस्तार.
प्राणायाम करताना हातांच्या अनेक प्रकारच्या मुद्रा लावाव्या लागतात. त्यानुसार आयामाची दिशा व प्राणायामाचा उपयोग बदलतो. आयाम हा अनुभवाचा विषय आहे व तो घेताना योगसाधकाने अत्यंत प्रामाणिक व सकारात्मक असणे आवश्यक असते.
शब्दांची मर्यादा व लेखाची लांबी याची मर्यादा लक्षात घेऊन, या लेखात फक्त एक प्राथमिक प्राणायाम व त्याचे शरीर, मन व बुद्धी यांवर होणारे परिणाम तेवढे बघूया.
१) अनुलोम-विलोम : अनुलोम म्हणजे आत व विलोम म्हणजे बाहेर. हा प्राणायाम शिकण्यासाठी प्रात्यक्षिक अर्थ समजणे पुरेसे आहे.
प्राणापानौ समौ कृत्वा
नासाभ्यन्तरचारिणौ॥
गीता-५/२७.
नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून एकाग्र होणे. प्राण म्हणजे वर येणारा श्वास, प्रवाह अपान म्हणजे खाली जाणारा श्वास प्रवाह एवढे लक्षात असावे. ही दोन हत्यारे प्रकृतीने आपल्याला दिली आहेत. ती तांत्रिकरित्या शास्त्रीय पद्धतीने वापरणे, त्यांना प्रकृतीच्या नियमाप्रमाणे वळण देणे म्हणजे प्राणायाम.
श्वासोच्छ्वास हा आपण करीत नाही. तो प्राकृतिकरितीने जीव आत असेपर्यंत होत राहतो. जीव गेला की श्वास थांबतो, हे आपण मृत व्यक्तीकडे बघून समजू शकतो.
वायू म्हणजेच श्वास हा अर्थ घेतला, तर आत जाणारा श्वास सूक्ष्म होईपर्यंत थांबा. सोबतच बाहेर येणारा श्वास समतोल होईल असे बघा. ही ध्यानाची पूर्व तयारी करणे होय.
ध्यानाचा अभ्यास आपण नंतर करणारच आहोत. तत्पूर्वी प्राण व अपान समान करण्यासाठी अनुलोम-विलोम कसा करायचा, ते बघू.
कृती:
१) प्रथम वज्रासनात बसा, अन्यथा साधी मांडी घालून बसलात तरी चालेल.
२) पाठ, मान सरळ रेषेत ठेवा. पण खांदे खेचू नका.
३) उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या साहाय्याने आपल्या नाकामध्ये, जेथे हाडांचा त्रिकोण झाला आहे, तिथे चिमटित धरतो तसे धरा.
४) डोळे बंद ठेवून डावी नाकपुडी उघडा व श्वास जरा जोराने घ्या. खेचताना घर्षणाचा आवाज होईल, तो होऊ द्या. त्यांचे आयाम (अस्पष्टसा स्पर्श) कुठे जाणवतात ते बघा.
५) डावी नाकपुडी बंद करून उजवी उघडा श्वास सौम्य गतीने बाहेर जाऊ द्या. त्यावेळी जोर लावू नका. आवाज करू नका.
६) आता उजव्या नाकपुडीने श्वास जोराने घ्या, आयाम कुठे मिळतात ते बघा. डाव्या नाकपुडीने हळूवार सोडा.
७) अशी सात आवर्तने पूर्ण करा.
८) पुढे ती २१ पर्यंत वाढवा.
फायदे
अ) ‘प्राणप्राणापानौ समौ कृत्वा साधत’. म्हणजे दोन शक्ती प्रवाह ईडा पिंगला (नाड्या), ज्या पाठीच्या कण्यातून वाहतात, ते सम होतात.
ब) शरीराचे तापमान सम होऊन चयापचय उत्तम चालते.
क) श्वास हळूवार सोडल्याने मनाची सहनशीलता वाढून स्वभाव प्रतिसादात्माक बनतो, जो जन्मतः प्रतिक्रियात्मक असतो. त्यामुळे आपापसातील प्रेम, सद्भावना वाढून ऐक्य साधते.
ड) नाडीशोधनाची तयारी होऊन पुढे शक्ती विकास साधतो. (क्रमशः)
डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५